त्यांनाही वाईट वाटलेच असेल..  
तेजस वाडेकर यांनी ‘लोकमानस’साठी पत्राऐवजी पाठवलेले चित्र.

शिवसेना समर्थकांनी हेही वाचावे..
‘सूर्याची पिल्ले’ हा लोकसत्ता (१९ नोव्हे.) तील अग्रलेख, ४० हून अधिक वर्षांपूर्वी स्थापना होऊन आजही कुमार अवस्थेतच असलेल्या शिवसेना संघटनेच्या समर्थकांनी आवर्जून वाचावा. सेनाप्रमुखांची प्रकृती चिंताजनक असताना तळागाळातील शिवसनिक भावनेच्या आहारी जाणे स्वाभाविक असले तरी सेनाप्रमुखांच्या सान्निध्यातील मंडळींनी ऊठसूट विधाने करून गोंधळ उठवण्याची दृश्ये चित्रवाणीच्या पडद्यावर पाहायला मिळणे अनाकलनीय होते. युती सरकारातील माजी मंत्री, मुंबईचे माजी महापौर आणि सेनेचे एक प्रमुख समजले जाणारे नेते दिवाकर रावते जेव्हा ‘सेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत’ असे सांगताना दिसले तेव्हा तर गोंधळात अधिकच भर पडली ! प्रवक्ते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी वेळोवेळी केलेली विधाने ऐकल्यावर परिस्थितीचे गांभीर्य त्यांना कितपत आहे याचीच शंका येत होती. वास्तविक राजकारणातील अतिमहत्त्वाची व्यक्ती समजल्या जाणाऱ्या सेनाप्रमुखांच्या प्रकृतीचा विषय तितकाच महत्त्वाचा होता यात तिळमात्र शंका नाही. राज्यपाल, मुख्यमंत्री यांनाही सेनाप्रमुखांच्या उपचारकक्षात जाण्यास मज्जाव होता यावरून परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात येत होते. असे असताना सेनाप्रमुखांच्या प्रकृतीविषयी वैद्यकीय अहवाल (मेडिकल बुलेटिन) वेळोवेळी प्रसिद्ध करणे अत्यावश्यक होते.
– मुरली पाठक, विलेपाल्रे (पूर्व)

भाबडेपण काही कामाचे नाही
बाळासाहेबांच्या अलौकिक कर्तृत्वाची दखल घेणारा ‘सूर्याची पिल्ले’ हा अग्रलेख अनेक वाचकांना आपल्या मनातील भावना जाहीरपणे व्यक्त झाल्याचा दिलासा देणारा होता. सूर्याच्या परावर्तित किरणांमध्ये स्वतला प्रकाशमान करून घेण्याची अहमहमिका लागलेल्या तथाकथित नेत्यांना या अग्रलेखाने चांगलाच चोप दिला आहे. शिवसेनेचे उत्तराधिकारी म्हणवून घेणाऱ्या सर्वच ‘कार्यकर्त्यांनी’ हा अग्रलेख भविष्यातील वाटचालीतील मार्गदर्शक म्हणून जपून ठेवावा आणि वारंवार वाचून, आपल्याकडून त्याच त्याच बालिश, अपरिपक्वतेतून घडणाऱ्या चुकांची पुनरावृत्ती तर होत नाही ना, याचा आढावा घेत राहावे.
 बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान एका मराठी वाहिनीने गिरीश कुबेर यांची दूरध्वनीवरून मुलाखत घेतली, त्यावेळी जनतेच्या ‘राजकीय भाबडेपणा’वर कुबेरांनी केलेले वक्तव्य, त्यानंतर वाहिनीने आवरती घेतलेली मुलाखत हा सारा प्रकार दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखाची वाट पाहण्यास लावणारा होता हे मुद्दाम नमूद केले पाहिजे. सूर्याच्या प्रकाशात चमकणाऱ्यांनी स्वत सूर्य होण्याची स्वप्ने पाहू नयेत आणि आमचा सूर्य कसा प्रकाशमान होता याचे भांडवल करून स्वतची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये.. तसे घडू लागलेच, तर समाजाने भाबडेपणाने ते स्वीकारू नये, असाच संदेश हा अग्रलेख देऊन गेला.   
– प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक

हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
बाळासाहेब ठाकरे आता आपल्यात नाहीत. शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि राज्यातच नाही तर देशातील राजकारणावर आपला ठसा उमटवला. आपल्या दिलदार आणि कलासक्त स्वभावामुळे पक्षाच्या, धर्म जातीच्या िभती ओलांडून त्यांना समाजातील सर्व स्तरांतील लोकांचे प्रेम मिळाले. मराठी माणूस आणि िहदू समाज यांच्या त्यांच्या व्याख्या संकुचित नव्हत्या आणि हेच या पक्षाचे मोठे सामथ्र्य आहे. सत्ता महत्त्वाकांक्षेमुळे त्यांच्याच घराण्यात निर्माण झालेली दरी आता अधिक रुंदावण्यात अर्थ नाही.
मराठी माणूस हा या देशातील, राज्यातील महत्त्वाच्या जागी बसला पाहिजे, तो समृद्ध झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर उद्धव आणि राज यांनी आता बेगडी आत्मसन्मानाच्या कोशातून बाहेर यायला हवे. राज्यात सत्ता मिळो अथवा ना मिळो पण मराठी एकजूट दाखवण्याची ही संधी त्यांनी घेतली पाहिजे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी या बंधूंनी आता एकेक पाऊल पुढे यायला हवे. अंत्ययात्रेत उद्धव आणि राज यांनी ज्याप्रमाणे आपली जबाबदारी वाटून घेतली तशीच आता भावी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात वाटून घेतली पाहिजे आणि हीच िहदुहृदयसम्राटाला खरी श्रद्धांजली ठरेल.
– शुभा परांजपे, पुणे  

..पण जनमनावर पकड कायम!
  लाखो मराठी माणसांना त्यांची अस्मिता जागृत करून ताठ मानेने जगायला शिकवणारे बाळासाहेब त्यांना शेवटचे दोन-तीन दिवस मात्र आशा-निराशेच्या िहदोळ्यावर झुलवत ठेवून अखेर शेवटच्या प्रवासाला निघून गेले. ४६ वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन झाली तेव्हा मराठी माणसावर अन्याय (विशेषत: नोकऱ्यांच्या बाबतीत आणि प्रामुख्याने दाक्षिणात्यांकडून) होत होता. त्याला तोंड फोडणारे व्यासपीठ शिवसेनेच्या रूपाने बाळासाहेबांनी दिले.
प्रबोधनकारांमुळे अनेक विचारवंतांशी लहानपणापासून आलेले संबंध, स्वत: एक कलाकार असल्यामुळे मिळालेली वेगळी दृष्टी यांचा आपल्या नियोजित कार्यात त्यांना खूपच उपयोग झाला. आधी केवळ समाजकारण हा उद्देश सांगणाऱ्या बाळासाहेबांना लवकरच राजकारणात उडी घ्यावीच लागली. कामगार क्षेत्र, विद्यार्थी क्षेत्र, चित्रपट क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, आर्थिक संस्था या सर्वामध्ये शिवसेनेचे कार्य सुरू करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवली. त्यांच्या राजकीय वाटचालीत आणीबाणीत इंदिरा गांधींना दिलेला पािठबा, चंद्रिका केनिया, प्रीतिश नंदी इ. अमराठी लोकांना दिलेली उमेदवारी, संजय दत्तचे केलेले समर्थन, प्रतिभाताई पाटील वा प्रणब मुखर्जीना दिलेला पाठिंबा हे त्यांचे निर्णय थोडे वादग्रस्त ठरले, कदाचित त्यांनाही त्याचे समर्थन करणे अवघड ठरले असेल, पण महत्त्वाची गोष्ट ही की, तरीही जनमनावरची त्यांची पकड ढिली झाली नाही. त्यांची जागा कुणी घेऊ शकणार नाही हे निश्चित.
 – राम ना. गोगटे, वांद्रे (पू)

शिवसैनिकांच्या संयमाला सलाम!
‘सूर्याची पिल्ले..?’ हा अग्रलेख वास्तववादी आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रस्थान निसर्गनियमाला धरून होते. त्याचे दुख न सोसवणारे आहे. या दिवसांत सामान्य शिसनिकांनी जो संयम दाखविला त्याला सलाम! बाळासाहेब जिवंत असतानाच काही शहाणे चित्रवाणी वाहिन्यांवर त्यांना अखेरचा निरोप दिल्यासारखे बोलत होते. संजय राऊत यांचे बोलणे-वागणे म्हणजे परिस्थितीची जाणीव नसल्यासारखे भासत होते. या उलट आदित्य ठाकरे आपल्या ट्विटरवर म्हणाला, ‘आपण आशावादी राहू या’ हा आदर्श वाखण्याजोगा आहे.
ज्या शिवसनिकांनी बाळासाहेबांवर जीव ओतला ते मातोश्री समोर पोलिसांच्या नजरेखाली तर  नट-नटय़ा  चित्रवाणी वाहिन्यांना मुखवटे दाखवत जाता-येत दिसत होते. या एकूण वातावरणात शिवसेनचे वरिष्ठ नेते गोंधळले दिसले.
– मार्कुस डाबरे, पापडी, वसई