अमिताभचा करिश्मा, पाच कोटींचे बक्षीस आणि ‘फक्त ज्ञानच तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देऊ शकते’ अशी घोषणा घेऊन कौन बनेगा करोडपतीचे सहावे पर्व आजपासून सुरू होत आहे. ‘हू वाँट्स टु बी अ मिल्यनेअर’ या ब्रिटिश कार्यक्रमाचे स्वरूप जगभरात अनेक देशांनी सही सही उचलले, त्याचा हा भारतीय अवतार. आधीच्या पर्वाप्रमाणे याही पर्वात पुन्हा अनेक प्रश्न विचारले जातील, उत्तरे दिली जातील आणि लाखो रुपयांची बक्षिसे वाटली जातील. आधीच्या पर्वाप्रमाणे याही पर्वाच्या निमित्ताने पुन्हा एक वेगळा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत राहील..

अर्थात, आधीच्याप्रमाणे याही वेळी हा प्रश्न अमिताभ विचारणार नाही; कारण तो सामान्य ज्ञानाचा नाही. चॅनेलवाले विचारणार नाहीत; कारण त्यांच्या व्यापारी गणितात तो बसत नाही. कार्यक्रमात भाग घेणारे विचारणार नाहीत; कारण हा प्रश्न विचारून वा त्याचे उत्तर शोधून त्यांना छदामही मिळणार नाही. कार्यक्रम बघणाऱ्या करोडोंपकी काहींच्या मनात कधी कधी तो येत असेलही. पण अमिताभचा करिश्मा, चकाचक कार्यक्रमाचे संमोहन आणि ‘करोड’ची जादू बाजूला करून तो प्रश्न स्वत:ला वा इतरांना विचारण्याचे भान उरणार नाही.
मात्र हा प्रश्न विचारण्यापूर्वी काही गोष्टी स्वच्छपणे सांगितल्याच पाहिजेत. एक कार्यक्रम म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ हा भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. अकरा वर्षांतील पाचही आवृत्त्यांनी टिकवून धरलेली प्रचंड लोकप्रियता, निर्मितीमूल्ये, खर्च, उत्पन्न, लोकांचा थेट सहभाग, कार्यक्रमाने निर्माण केलेले औत्सुक्य, त्याची जनमानसात होणारी चर्चा, त्याच्या निघालेल्या अनेक आवृत्त्या आणि नकला, त्यातील भाषा आणि शैलीचा जनमानसाने केलेला स्वीकार, टीव्ही कार्यक्रमांसंबधी विचारांमध्ये घडवून आणलेले बदल अशा अनेक निकषांवर ‘कौन बनेगा करोडपती’ हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे हे मान्य केलेच पाहिजे.
पण या झगमगाटात झाकोळला जातोय तो प्रश्न आहे औचित्याचा. ज्ञान, श्रम, कौशल्य आणि त्याबद्दल मिळणाऱ्या मोबदल्याचा. सामान्य ‘ज्ञान’ नव्हे तर सामान्य ‘माहिती’वर आधारित पंधरा प्रश्नांच्या उत्तरांसाठी तब्बल पाच कोटी रुपये ही कल्पनाच उचितपणाच्या चौकटीत न बसणारी. त्यात या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष रूप पाहिले तर ही चौकट जागोजागी तुडविली गेल्याचेच दिसते. एकतर या प्रश्नांपकी अनेक प्रश्न अगदीच सोपे, काही वेळा तर बालिश स्वरूपाचे असतात. उत्तरासाठी चार पर्याय मिळतात. जीवदानाच्या-मदतीच्या चार संधी मिळतात. एका टप्प्यानंतर तर वेळेचेही बंधन राहात नाही. अशा स्थितीत एका साध्याशा प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच-दहा हजार रुपये मिळणे हे कितपत योग्य आहे, याचे उत्तर प्रत्येकाने आपले उत्पन्न आणि त्यासाठी महिनाभर घ्यावे लागणारे शारीरिक-मानसिक-बौद्धिक श्रम यांच्या पाश्र्वभूमीवर शोधावे. अगदी किरकोळ प्रश्नांसाठीही लाइफलाइन वापरत, प्रसंगी तुक्केबाजी करत, अमिताभच्या देहबोलीतून अंदाज बांधत एखाद्याने लाखोंची रक्कम खिशात टाकावी आणि प्रसिद्धी आणि झगमगाटात न्हाऊन निघावे हे सारे औचित्याची चौकट मानणाऱ्या कोणालाही अस्वस्थ करणारे आहे.
प्रश्न कोणाला लाखो-करोडो रुपये मिळण्याचा नाही. पोटात दुखण्याचा तर नाहीच नाही. माहिती, ज्ञान, श्रम, प्रतिभा, धडाडी हे गुण आणि त्या बदल्यात मिळणाऱ्या मोबदल्यात काहीतरी ताíकक आणि नतिक संबंध मानायचा की नाही हा खरा मुद्दा आहे. हे मान्य की हा संबंध ठरविणारे कोणतेही ठोस गणिती सूत्र नाही. असूही शकत नाही. पण समाजाच्या एकूण शहाणपणातून आणि स्थितीतून या संबंधांची एक चौकट निर्माण होत असते. ढोबळ स्वरूपात ती सर्वाच्याच जाणिवेत वावरत असते. मोबदल्याचे सारे व्यवहार त्यात होत राहतात आणि समाजाच्या एकूण स्वास्थ्यासाठी ते त्यात व्हावेही लागतात. परंतु, ही चौकट कितीही लवचिक केली, कितीही ताणली तरी ‘कौन बनेगा करोडपती’तील व्यवहार त्यात बसविता येत नाही. सामान्य ज्ञानावर आधारित केबीसी हा काही पहिला कार्यक्रम नाही. केबीसीच्याच सिद्धार्थ बसूने पूर्वी दूरदर्शनवर ‘क्विझटाइम’सारखे दर्जेदार कार्यक्रम दिले आहेत. बसूचाच मास्टरमाइंड, डेरेक ओब्रायनचा बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट असे अनेक कार्यक्रम चित्रवाणीवर होऊन गेले आहेत. या कार्यक्रमांमधून लागणारी स्पर्धकांची कसोटी अधिक कसोशीची होती. म्हणूनच केबीसीची कल्पना, स्वरूप आणि प्रभाव चिंताजनक वाटू लागतात.    
खरे तर एकटय़ा केबीसीला आरोपीच्या िपजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. प्रोग्रॅम देखो, लाखो जीतो अशा घोषणा देत, कचकडय़ा प्रश्नांवर लाखोंची खिरापत वाटणाऱ्या कार्यक्रमांची संख्या काही कमी नाही. वाहिन्याच कशाला, पाच-पन्नास रुपयांच्या खरेदीवर, एका वाक्याच्या स्लोगनवर लाखाच्या गाडय़ा देणाऱ्या आणि जगाची सफर घडवून आणणाऱ्या इतरही योजनांची संख्या तरी कुठे कमी आहे? दोन मिनिटांच्या उपस्थितीसाठी आणि कमरेच्या दोन लटक्या-झटक्यांसाठी लाखो रुपये वाजवून घेणारे सेलिब्रिटींची संख्याही कुठे कमी आहे? श्रम, प्रतिभा, प्रतिष्ठा आणि त्याला मिळणाऱ्या मोबदल्याची चौकट मोडल्याचा आरोप त्यांच्यावरही निश्चितपणे ठेवता येईलच. पण केबीसीने ही प्रक्रिया ११ वर्षांपूर्वीच सुरू केली, ती रातोरात लाखो सामान्यांच्या घरी नेली, ही जणू सामान्य ज्ञानाची कसोटी आहे असा आभास निर्माण केला आणि अमिताभच्या समावेशाने त्याला प्राइम टाइम प्रतिष्ठा दिली आणि हे सर्व करताना भविष्यासाठी मोबदल्याची सारी स्केलच अचानक आणि अनसíगकपणे बदलून टाकली. केबीसीला एक मुख्य आरोपी करण्याची कारणे ही आहेत.
हे सारे करण्याचा अधिकार वाहिन्यांना आहे काय?  खरेतर कोणालाच नाही. वास्तविक या वाहिन्यांचे अस्तित्व, व्यवहार आणि कार्यक्रम ज्या चौकटीत सुरक्षित आहे त्याबाबत उत्तरदायी असणे त्यांचे कर्तव्यच आहे. प्रत्येक वेळी ते कायदेकानूच्याच भाषेत सांगता येते असे नाही. ते सामूहिक शहाणपणातून समजावून घ्यावे लागते. विवेकाने सांभाळावे लागते. पण केवळ व्यापारी गणितेच समजू शकणाऱ्या आणि त्यांच्याच आधारे सगळ्या गोष्टींचे समर्थन करू पाहणाऱ्या व्यापारी संस्कृतीत अशा विवेकाची अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल. काहींच्या लेखी तर मूर्खपणाचेही.  
पण ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’च्या या अर्निबध खेळात देणाऱ्यापेक्षा जास्त उत्साहाने सामील झाला आहे तो घेणारा. खरी दुर्दैवाची बाब आहे ती हीच. ‘तीस रुपयांची भाजी आणि कामवालीचे तीनचारशे रुपये मोजताना श्रम आणि मोबदल्याच्या कसोटय़ा अगदी कसोशीने लावणाऱ्यांना अशा स्पर्धामधून तीस लाखांची कमाई करताना यात आपल्या श्रमाचे आणि बुद्धीचे योगदान किती?’ असा प्रश्न पडत नसावा काय? अध्र्या-अध्र्या गुणांनी आपल्या ज्ञानाचा दर्जा ठरविणाऱ्या आणि पर्फॉर्मन्सच्या बारीक बारीक निकषांवर पदोन्नती आणि वेतनवाढ मागणाऱ्यांना अशा स्पर्धामधून लाखोंची कमाई करताना ‘आपण याला खरेच लायक आहोत काय?’ असा प्रश्न सतावत नसावा काय? आपल्या श्रमाला, ज्ञानाला, कौशल्याला उचित मोबदला मिळावा हे योग्यच आहे. कालच्यापेक्षा आज जरा जास्त मिळावा ही अपेक्षादेखील रास्त आहे, पण या अपेक्षांची चौकट क्रमश: विस्तारत जावी, इतर क्षेत्रातील व्यवहारांशी सुसंगतपणे विस्तारत जावी, असे अपेक्षित असते. देणाऱ्यांइतकेच हे भान घेणाऱ्यानेही ठेवणे अंतिमत: त्यांच्याच हिताचे ठरत असते.
औचित्याच्या या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. चार पर्याय-चार लाइफलाइन वापरून ते देता येत नाही. म्हणूनच ते लॉकही करता येत नाही. पण म्हणून प्रश्नही लॉक करून ठेवता येत नाही. तो सतत अनलॉक ठेवणे गरजेचे असते. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे..’उचितावेगळे।
अभिलाषे तोंड काळे।
सांगे तरी तुका।
पाहा लाज नाही लोका।।