खरं, शुद्ध, निरपेक्ष असं प्रेम आपण कुणावरच करीत नाही. मग भगवंतावर अर्थात श्रीमहाराजांवर तरी ते कसं करणार? पण आपलं ध्येय मात्र ते असलं पाहिजे. तो ध्येयपथ म्हणजेच प्रपंचात राहून परमार्थ साधण्याची कला, व्यवहारात राहून त्याच्या आहारी न जाण्याची कला आपण श्रीमहाराजांच्या आधारे आपण पुढील आठवडय़ापासून जाणून घेणार आहोत. त्याकडे जाण्याआधी या प्रेमचर्चेतली दुसरी बाजूही पाहू. आपण श्रीमहाराजांवर खरं प्रेम करीत नाही पण ते करतात! या शुद्ध प्रेमामुळेच ते कधीच कुणाला अव्हेरत नाहीत. एखाद्या माणसातल्या एखाद्या दुर्गुणाचीदेखील मनात चीड निर्माण झाली तर आपण त्याला जवळपासही फिरकू देत नाही. त्याच्यावर प्रेम करण्याची गोष्ट तर दूरच. पण कित्येक दुर्गुण आपल्या हाडीमांसी खिळले असतानाही श्रीमहाराज आपल्याला अव्हेरत नाहीत, उलट परोपरीनं समजावून आयुष्याचं सार्थक करून घ्यायची प्रेरणा देत राहतात. त्यांच्या त्या प्रेमाची आपल्याला कल्पनाही येत नाही. एकदा श्रीमहाराज म्हणाले, ‘‘संत भगवंताशी तद्रूप असतात हे खरे, पण त्यांच्या हातून घडणार नाही अशी एकच गोष्ट आहे. त्यांच्याशी कोणी कसाही वागो, ते त्याचे अनहित करणार नाहीत. कोणाचे अनहित व्हावे, हा विचारदेखील संतांच्या मनाला शिवत नाही. सर्व भूतमात्रांचे कल्याण व्हावे ही एकच पवित्र प्रेरणा त्यांच्या जीवनात उरल्याकारणाने सुष्ट व दुष्ट जिवांबद्दल त्यांच्या अंत:करणात अपार करुणा असते. तिच्या पायी ते कोणाचाही अव्हेर करीत नाहीत.’’ (हृद्य आठवणी, क्र. २२६) या करुणेमुळेच तर आपण त्यांच्यासमोर टिकून आहोत! एकदा गोंदवल्यात रामशास्त्री गिजरे आणि काका फडके यांचं कडाक्याचं भांडण झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की काका संतापानं थरथरत श्रीमहाराजांसमोर आले आणि ओरडतच म्हणाले, ‘‘महाराज ही असली तामसी माणसं आपण कशाला जवळ बाळगली आहेत? यांना काय परमार्थ साधणार आहे?’’ श्रीमहाराज शांतपणे म्हणाले, ‘‘काका, चालताना रस्त्यात पडलेलं हाड लागलं तर त्याचा विटाळ होतो, पण तोंडात असणारे आपले दात हाडेच आहेत, त्यांचा विटाळ आपण मानतो का? काही झाले तरी शास्त्रीबुवाला मी आपला म्हटलं आहे. आज नाही तर उद्या, नाहीतर अंतकाळी तरी त्याच्यात सुधारणा झाल्यावाचून राहणार नाही. तो भगवंताचे नाम घेतो आहे ना! अर्थात रामाचे लक्ष त्याच्याकडे आहे. म्हणजे तो सुधारण्याच्या मार्गावर आहे. बरे तो तामसी म्हणून मी जर सोडला तर त्याला जगात कोण जवळ उभं करील? येऊन जाऊन काय, असली माणसं मला कमीपणा आणतात हेच तुमचं म्हणणं ना? विषयी माणसांवर माझा मोठेपणा आणि कमीपणा अवलंबून आहे, असे का तुम्हाला वाटते? मी स्वत: जर सर्वस्वी रामाला वाहिलेला आहे तर माझा मोठेपणा तो सांभाळील. त्याची काळजी मी करीत नाही. मग तुम्ही तरी का करता?’’ (श्रीगोंदवलेकर महाराज चरित्र/ प्रकरण नववे) श्रीमहाराजांच्या करुणासिंधू रूपाचीच प्रचीती या वाक्यांतून येते.