एकदा सत्तेची चव चाखली की मग कोण रावण आणि कोण बिभीषण? सध्या भारतीय जनता पक्षाची अवस्था अशी झाली असून, राजकारण्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे त्रिकालाबाधित सत्य पुन्हा एकदा लोकांच्या नजरेसमोर आले आहे. कालपर्यंत राजकारणातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण यावर तावातावाने बोलणारी भाजपाई मंडळी आज त्याच भ्रष्टाचाऱ्यांच्या आणि माफिया गुंडांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यात आपण काही गैर करतो आहोत हेही या नेत्यांना जाणवेनासे झाले आहे. लंकादहन करण्यासाठी काही बिभीषण आवश्यक असतात, हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे छुपे उमेदवार देवेंद्र  फडणवीस यांचे आयारामांना पाठीशी घालणारे उद्गार याच पठडीतले. पक्षाध्यक्ष अमित शहा हे फडणवीस यांच्यासारखे वाक्चतुर नाहीत. त्यामुळे ते जे काही करायचे ते न बोलता करतात. त्या मौनरागास अनुसरून त्यांनी हरियाणातील प्रचारसभांमधून डी. पी. यादव नामक माफियाला फिरविले. कदाचित हा पोटनिवडणुकांच्या निकालाचा परिणाम असावा. परंतु कालपर्यंत मोदीलाटेवर तरंगत असलेल्या भाजपला आता जातींच्या मतपेढय़ांचा मोह पडू लागला आहे. त्यातूनच हरियाणातील यादव समुदायावर प्रभाव टाकण्यासाठी म्हणून शहा यांनी यादव यांना व्यासपीठावरून मिरवले. तसे नसेल तर कदाचित यादव यांच्या धरमपाल या नावाचा मोह शहा यांना झाला असावा. अन्यथा १५ ते २० खून, दारूचा व्यवसाय, तस्करी, दरोडे अशा आरोपांची माळ गळ्यात असलेल्या या गाझियाबादी गुंडाचा कर हा करी त्यांनी कशाला धरला असता? या भाजपच्या बिभीषणाचा पुत्रही तितकाच गुंडा असून, त्याचाही उत्तर प्रदेशी झेंडा आहे. विकास यादव हे त्याचे नाव. शाळेत असल्यापासूनच त्याचे पाय पाळण्यात दिसत होते असे म्हणतात. तेथे मुलींच्या स्वच्छतागृहात घुसून िधगाणा घालणे हा त्याचा छंद होता. मोठेपणी त्यांनी खानदान की इज्जत टिकविण्यासाठी आपल्या बहिणीच्या प्रियकराचा- नितीश कटारा याचा खून केला. अशा पुत्राच्या बापाला भाजपच्या व्यासपीठावर आणण्याचे शहा यांना एरवी कशाला सुचले असते? अर्थात ही त्यांची पहिलीच वेळ नाही. भाजपमध्ये मोदी-शहा यांचा उदय झाल्यानंतरच्या काळात यापूर्वी एकदा या बाहुबली नेत्याला भाजपमध्ये पावन करून घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी त्याला विरोध झाला. आता मात्र शहा यांची मांड पक्षावर पक्की असल्याने त्यांनी यादव यांना पुन्हा पावन करण्याचे मनसुबे रचले असावेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील वृत्तानुसार, शहा यांच्या हेलिकॉप्टरमधून, त्यांच्या सोबतच यादव प्रचारस्थळी आले. तेव्हा यादव हे बिनबुलाए मेहमान होते वगरे आयोजकांचे खुलासे केविलवाणेच ठरतात. पण त्याहून केविलवाणा ठरतो तो भाजपचा नेहमीचा बचाव. अन्य पक्ष भ्रष्ट आहेत, तेथे गुंडांचे सेनापती आहेत म्हणून आम्हीही तसेच करणार असे भाजपला म्हणायचे असेल तर भाग वेगळा. पण मग त्यांच्याहून आम्ही वेगळे असा आव तरी आणता कामा नये. खरे तर ज्या पक्षाच्या २८१ पकी ९८ खासदारांवर फौजदारी गुन्ह्य़ांची नोंद आहे त्यांना आपल्या स्वच्छतेचा टेंभा मिरवताच येणार नाही. त्यांनी आपले स्वच्छता अभियान रस्ते आणि स्थानकांतील कचरा उचलण्यापुरतेच मर्यादित ठेवावे. साध्य आणि साधन यांची शुचिता मानणाऱ्या गांधींचे नाव घेण्यात हल्ली पंतप्रधान मोदी सर्वात पुढे असतात. ही शुचिता राजकारणातही आणायची तर त्यासाठी मोठे धाडस असावे लागते. तेव्हा ‘हाती धरून झाडू तू मार्ग झाडलासि’ अशा प्रकारची स्वच्छता मोहीम बरी. ती परवडते. त्याची छायाचित्रे ट्विटरवरून प्रसिद्धही करता येतात. आपल्या सत्ताकारणातील गटारघाण झाकण्यासाठी अशा कार्यक्रमांचा सुगंध चांगलाच कामी येतो.