आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मुलांना उत्तीर्ण करणारा आणि सर्वाधिक विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी देणारा बारावीचा निकाल लावून महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लाखो पालकांचे दुवे घेतले आहेत. बारावीची परीक्षा देणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यकालीन शिक्षणाची दिशा जवळपास ठरवलेली असते. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत त्यांना अकरावीतच प्रवेश घ्यावा लागतो. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे काही अंशी महत्त्व असते. ते ओळखून परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांच्या पदरात भरघोस गुणांचे दान दिले आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य आणखी उज्ज्वल होईल, असा कोणाचा समज असेल, तर त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. या निकालाचा एक अर्थ असा, की परीक्षा मंडळाला खरे तर शंभर टक्के निकाल लावण्याची इच्छा होती. परंतु जे विद्यार्थी परीक्षेला बसलेच नाहीत किंवा ज्यांच्यावर कॉपीप्रकरणी कारवाई होणे गरजेचे आहे, अशांना उत्तीर्णाच्या यादीतून वगळणे मंडळाला भाग पडले. त्यामुळे खरे तर हा निकाल शंभर टक्केच आहे, असे मानण्यास हरकत नाही. या निकालाचा दुसरा अर्थ असाही आहे, की गेल्या दोन वर्षांत राज्यातील बारावीची परीक्षा देणारी सर्व मुले अचानकपणे प्रचंड हुशार झाली आहेत. हुशार होणे हे चांगले असले, तरीही त्याला कसदार अध्ययनाची बैठक आवश्यक असते. परंतु परीक्षा मंडळाने स्वत:हून सर्वाना हुशार करण्याचे ठरवल्याने २०१३ च्या निकालात तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा दुपटीहून अधिक घट झाली आहे. ही घट अन्य कोणत्या श्रेणीत भरून निघाली, याचा आकडेवारीवरून विचार केला, तर ही सर्व तृतीय श्रेणीतील मुले एकदम विशेष किंवा प्रथम श्रेणीत गेली आहेत. २०१३ मध्ये विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे पन्नास हजार होती, ती यंदा सुमारे ९८ हजार एवढी झाली. म्हणजे त्यात सुमारे पन्नास टक्के वाढ झाली आहे. प्रथम श्रेणीतील विद्यार्थीही तेवढय़ाच प्रमाणात वाढले आहेत.  परीक्षेतील गुणांची ही सापशिडी विद्यार्थ्यांना सुखावणारी असली, तरीही परीक्षेच्या मूल्यांकनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या निकालास आपला निर्णय कारणीभूत झाल्याचे म्हटले असून ते खरे असेल, तर त्यांचा जाहीर सत्कारच करायला हवा. यंदापासून विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याच्या निर्णयाने हा निकाल एवढा चांगला लागला, असे त्यांचे म्हणणे आहे.  प्रत्यक्षात या निकालाने फसवी हुशारी निर्माण होणार असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. परीक्षा ही जर विद्यार्थ्यांने मिळवलेल्या ज्ञानाचा कस तपासणारी असेल तर ती सोपी असता कामा नये. विषय समजला आहे की नाही, हे तपासण्याऐवजी सर्वाना उच्च श्रेणीतच उत्तीर्ण करायचे आहे, असे गृहीत धरून उत्तरपत्रिका तपासण्याचा आदेश असेल, तर त्या निकालास अर्थ तो काय?  एवढे हुशार विद्यार्थी जर या राज्यात असतील, तर त्यांना अवघड वाटते म्हणून केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षेऐवजी (जेईई) राज्याची सोपी अशी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) हवीच कशाला? उत्तम गुण मिळवून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याचे सामथ्र्य जी शिक्षणपद्धती रुजवत नाही, ती निरपेक्ष असू शकत नाही. निकालात गुणांची खिरापत वाटण्याऐवजी संबंधित विद्यार्थ्यांस तो नेमक्या किती खोल पाण्यात उभा आहे, याचे भान देणे यापुढील काळात अधिक आवश्यक आहे.