देशाच्या ईशान्येकडील कोपऱ्यात विसावलेल्या अन् ‘सात बहिणींचा प्रदेश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यांतील नैसर्गिक सौंदर्याचा ठेवा जसा कधी फारसा उघड झाला नाही, तद्वतच त्या परिसरातील बौद्धिक क्षमतेची चुणूकही आजवर दुर्लक्षित राहिली. लष्करातील मेजर जनरल कोनसाम हिमालय सिंग यांना लेफ्टनंट जनरल पदावर मिळालेली बढती, हे त्याचे उदाहरण. भारतीय लष्करात इतक्या महत्त्वपूर्ण पदावर पोहोचलेले ईशान्येकडील राज्यातील ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत (हवाई दलात या पदाच्या समकक्ष मानल्या जाणाऱ्या पदापर्यंत दोन अधिकाऱ्यांनी आधी मजल मारली होती). ईशान्येकडील राज्यांतील तरुण व लष्करी अधिकारी त्यांच्या या यशापासून स्फूर्ती घेऊ शकतील.
सध्या भोपाळमधील ‘२१ स्ट्राइक कोअर’ची धुरा सांभाळणारे कोनसाम हिमालय सिंग (५६) हे मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील चरंगपत गावचे. तेथेच प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे लष्करात सेवा करण्याच्या हेतूने त्यांनी आसामातील गोलपारा सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. तेथून राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनीत ते गेले व १९७८ मध्ये लष्कराच्या २-राजपूत रेजिमेंटमध्ये दाखल झाले. सियाचीन भागात २७-राजपूत रेजिमेंटचे नेतृत्व करताना त्यांना युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पाच वर्षे या ठिकाणी त्यांनी काम केले. कारगिल युद्धातही ते सहभागी झाले होते. विविध सीमावर्ती भागांत सिंग यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याची दखल घेऊन २०१३मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने सिंग यांना सन्मानित करण्यात आले. पायदळातील कौशल्यवान जवान, जम्मू-काश्मीरमधील लष्करी कारवाईतील तज्ज्ञ अशी बनलेली ओळख त्यांच्यातील गुणवत्ता व कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी पुरेशी ठरावी.
आसाम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा व सिक्कीम या भागांत नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल ठेवा दडलेला आहे. या राज्यांमध्ये बौद्धिक व लष्करी क्षमताही तितकीच ठासून भरलेली आहे. परंतु हा प्रदेश क्वचितच चर्चेत येतो. मुष्टियुद्धात भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी मेरी कोम कधी या चर्चेच्या केंद्रस्थानी असते, तर आता सिंग यांच्याभोवती चर्चेचे वलय फिरू शकेल. देशाच्या राजधानीत वांशिक भेदभावाची वागणूक मिळत असल्याची भावना ईशान्येकडील विद्यार्थ्यांमध्ये बळावत आहे. याच सुमारास त्या भागातून आलेल्या सिंग यांच्या खांद्यावर लष्करातील अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी येऊन पडली आहे. या दोन्ही घटनांचा परस्परांशी तसा कोणताही संबंध नाही. मात्र उपरोक्त भागातील विद्यार्थ्यांना ही घटना दिलासा व प्रेरणा देणारी ठरू शकेल.