नॅसकॉमचे अध्यक्ष असताना प्रसिद्धीझोतात आलेले किरण कर्णिक त्याही आधीची चार दशके भारतातील तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचे एक शिल्पकार होते आणि या बदलांचा लोकांवर काय परिणाम होतो, याचे साक्षीदारही. डॉ. विक्रम साराभाईंसारख्यांचा सहवास काळाने संपवला, तरी तंत्रज्ञान लोकोपयोगी कसे ठरेल, याच्या चिंतनाचा वसा कर्णिकांनी सोडलेला नाही..
अहमदाबादच्या आयआयएममध्ये एमबीए करताना किरण कर्णिक यांना कधी तरी या संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. विक्रम साराभाई यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती.
त्या कुतूहलापोटी कर्णिक अणुऊर्जा विभागात नोकरीसाठी मुलाखतीला गेले. डॉ. साराभाई त्या वेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. कर्णिक यांची मुलाखत त्यांनीच घेतली. सरकारच्या विज्ञान खात्यात व्यावसायिक व्यवस्थापन रुजविण्याची आकर्षक कल्पना मांडून डॉ. साराभाई यांनी कर्णिकांना सरकारी नोकरी स्वीकारायला लावली. दोन र्वष करून बघायची, असे ठरवून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्ताव नाकारून ‘फूलिश आणि आयडियलिस्टिक’ (हा त्यांचाच शब्दप्रयोग) कर्णिकांनी प्रायोगिक तत्त्वावर ही नोकरी पत्करली. पण भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या व्यावसायिकता भिनलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली थेट काम करण्याची संधी मिळाल्याने कर्णिकांची सुरुवातीची ही दोन वर्षे संपली ती तब्बल २३ वर्षांनी. भारतीय अणुऊर्जा आयोग आणि भारतीय अंतराळ संशोधन विभागात व्यावसायिकतेने काम करताना नोकरशाहीचे अडथळे पार करण्यात ते यशस्वी ठरले. कल्पकता आणि प्रयोगशीलता पणाला लावून तंत्रज्ञानाच्या साहय़ाने नवनवे बदल घडवून सर्वसामान्यांचे जीवनमान कसे सुसहय़ होईल, ही तंत्रचिंतनाची वृत्ती किरण कर्णिक यांच्यात रुजली ती कायमची. आपल्या मूलभूत गरजांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी कशी सांगड घालता येईल, याचा ते सतत विचार करीत असतात.
मोबाइलमध्ये कॅमेरा, रेडिओ, संगणक आणि फोनसारख्या सुविधांमध्ये रक्तदाब आणि शरीराचे तापमान तपासण्यासारख्या सुविधांची भर घालता आली तर त्याच्या माध्यमातून खेडय़ातील, दुर्गम भागातील गरिबांना रुग्णालयांशी संपर्क साधून मदत घेणे शक्य होईल.. न्यूयॉर्कसारख्या शहरात एकाकी जीवन जगणाऱ्या गर्भश्रीमंत वृद्धालाही अशाच उपकरणाची गरज असेल. कमी खर्चात सर्वांपर्यंत पोहोचणारी लोकोपयोगी गॅजेटस् विकसित करण्याची कल्पकता भारतीयांमध्ये आहे, असे त्यांना वाटते. दैनंदिन आव्हानांवर कल्पक पळवाटांद्वारे मात करण्याची क्षमता असलेल्या भारतीय मानसिकतेवर त्यांना विश्वास आहे. नव्वदीच्या दशकात मोबाइल जगात सर्वत्र होता. पण मोबाइलचे महागडे दर परवडत नसतानाही त्यावरून फुकटात कसा संपर्क साधायचा याची शक्कल जगात सर्वप्रथम भारतीयांनी शोधून काढली. ‘मिसड् कॉल’च्या माध्यमातून. ही तंत्रज्ञानाची नव्हे तर मनाची कल्पकता- तीही, प्रसंगी नियमाला बगल देण्याच्या मानसिकतेतून आलेली. परंतु कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन भ्रष्टाचारासारख्या सर्वात ज्वलंत समस्येवरही मात करता आली तर देशाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडसर दूर होईल, या कल्पनेने कर्णिक शहारून जातात. ज्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण बदल घडतात. जे असे प्रयोग करतात त्यांना सरकारने आर्थिक साहय़ आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. कल्पक प्रयोगांचा गुणाकार झाला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
भारताच्या प्रक्षेपण आणि आऊटसोर्सिग क्षेत्रातील बडे प्रस्थ अशी ओळख प्रस्थापित करणारे किरण कर्णिक नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस कंपनीज्) या भारताच्या माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि सेवाक्षेत्राशी संबंधित नावाजलेल्या चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष म्हणून परिचित आहेत. हल्ली ते दारिद्रय़ आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ऑक्सफॅम इंडिया, दिल्लीतील इंडिया हॅबिटाट सेंटर आणि दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या इंद्रप्रस्थ इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थांचे अध्यक्ष आहेत. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे संचालक आणि अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांवर स्वतंत्र संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांमध्ये सक्रिय आहेत. २००९ साली भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला काळिमा फासणारा सत्यम कॉम्प्युटर्सचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा केंद्र सरकारने सत्यमला सावरण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ नेमले. कर्णिक यांनी सहा महिन्यांत सत्यम कॉम्प्युटर्सचे पुनर्वसन करून ही कंपनी विकण्यात यश मिळविले. अनेक महत्त्वाच्या सरकारी समित्यांवर कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे तसेच राष्ट्रीय नवप्रवर्तन परिषदेचे (नॅशनल इनोव्हेशन कौन्सिल) ते सदस्य आहेत. २००१ ते २००८ दरम्यान नॅसकॉमचे अध्यक्ष असताना त्यांच्या कारकिर्दीत माहिती तंत्रज्ञान उद्योगाची निर्यात आठपटींनी वाढून ५० अब्ज डॉलरवर पोहोचली. नॅसकॉमच्या माध्यमातून कर्णिक यांनी भारतीय तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा जगाला परिचय घडविण्यात मोलाची भूमिका बजावली.
किरण यांचा जन्म १६ मार्च १९४७ चा. जन्म मुंबईत, पण रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरीला असलेले वडील शरदचंद्र यांच्या चेन्नई, त्रिवेंद्रम आणि कोलकात्याला बदल्या झाल्याने त्यांना महाराष्ट्रात वास्तव्याची फारशी संधीच मिळाली नाही. वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षांपर्यंत तुम्ही कुठे वाढता यावर तुमचे व्यक्तिमत्त्व घडते, असे ते सांगतात. नक्षल समस्या शिगेला पोहोचल्यामुळे त्यांना कोलकात्याऐवजी दोन वर्षे नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात शिकावे लागले. त्यांचे थोरले बंधू दीपक त्या वेळी नागपूरच्या फ्लाइंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत होते. वडिलांची बदली परत मुंबईला झाल्यानंतर किरण कर्णिक यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बी.एस्सी. ऑनर्स आणि अहमदाबाद आयआयएममधून एमबीए केले. किरण कर्णिक यांच्या वडिलांचे नातेवाईक इंदूरकडचे, तर आई सुमती सबनीस यांचे माहेर कोल्हापूरचे. कर्णिकांचे आजोबा कोल्हापूरचे दिवाण, तर मामा रवींद्र सबनीस महापौर होते. बालपणी मद्रासहून कोल्हापूरला आजोळी महिनाभराच्या सुटय़ांसाठी जाण्याच्या आठवणींनी ते मोहरून जातात. तीन भाऊ आणि एक बहीण यांच्यात किरण सर्वात धाकटे. थोरले भाऊ दीपक हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त होऊन आता पुण्यात िहजेवाडीपाशी राहतात. फार्मास्युटिकल्समध्ये कारकीर्द करणारे दुसरे बंधू प्रकाश बडोद्यात वास्तव्याला आहेत. त्यांच्या भगिनी कांचन देशपांडे अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. किरण कर्णिक यांच्या पत्नी सुनीती ठाण्याच्या ताम्हणे कुटुंबातल्या. सुनीती यांची बहीण निर्मला आणि बंधू श्रीकांत अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. श्रीकांत यांनी आयआयटी व एमबीए करून अमेरिकेत आयबीएममध्ये नोकरी मिळविली. पण वैद्यकीय क्षेत्राचे आकर्षण निर्माण झाल्याने वयाच्या ३५ व्या वर्षी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत ते डॉक्टर म्हणून प्रस्थापित झाले आहेत. सुनीती स्वयंसेवी संस्था ‘सेवा’ आणि ब्लाइंड असोसिएशनशी संबद्ध आहेत. सुनीती यांचे काही नातेवाईक पुण्यात आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर, दिलीप पाडगावकर, विजय केळकर ही कर्णिकांची दिल्लीतील मराठी मित्रमंडळी. पुण्यात कल्याणीनगरमध्ये त्यांचे घर आहे. अमेरिकेहून बहीण आल्यावर डिसेंबर महिन्यात कर्णिक कुटुंब तिथे राहायला जाते. कर्णिक यांच्या एकुलत्या एक कन्या केतकी दिल्लीत एनडीटीव्ही समूहात ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत.  
सत्तरीच्या दशकात अंतराळ विभागात असताना कर्णिक यांनी उपग्रह दूरचित्रवाहिन्यांवर प्रयोग सुरू केले. उपग्रह तंत्रज्ञान त्या वेळी भारतात उपलब्धही नव्हते. ‘नासा’ उपग्रहाच्या साहय़ाने भारतातील दुर्गम भागात आणि वीज नसलेल्या बिहार, ओडिशासारख्या भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दूरदर्शन सुरू केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देशाच्या विकासासाठी कसा वापर करता येईल, यावर सहा राज्यांमध्ये २५०० गावांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि कृषी यांच्यावर विविध भाषांमध्ये टेलिव्हिजनचे संच वीजदेखील नसताना, बॅटरीवर चालविण्याचे प्रयोग केले. त्या वेळी हलते चित्र पाहणे ही लोकांसाठी जादू होती. दिल्लीच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी कृषिदर्शन कार्यक्रम सुरू केला. दिल्लीशेजारच्या ८० गावांमध्ये समुदायांसाठी प्रयोग सुरू केला. त्या वेळी डॉ. स्वामिनाथन इकारचे अध्यक्ष होते. आकाशवाणीच्या माध्यमातून अणुऊर्जा विभागाने हा प्रयोग राबविला. या कार्यक्रमाचे वर्षभरानंतर मूल्यांकन केले तेव्हा त्याचा प्रचंड प्रभाव पडला होता. दुसऱ्या हरित क्रांतीची त्या वेळी नुकतीच सुरुवात होती. हे तंत्रज्ञान सर्वदूर राबविणे आर्थिकदृष्टय़ा शक्य आहे काय, सामाजिक आवश्यकता कोणत्या आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेणे शक्य झाले. त्याव्यतिरिक्त रिमोट सेन्सिंग, अंतराळ विभागाचे धोरण निर्धारित करण्याचे त्यांचे काम सुरूच होते. १९९१ ते १९९५ दरम्यान कन्सोर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशनचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहय़ाने कंट्रीवाइड क्लासरूम आणि अन्य शैक्षणिक उपक्रम राबविले. अंतराळ आणि अणुऊर्जा विभागातून ते दूरदर्शनमध्ये काम करताना दिल्लीतील नोकरशाहीने बरेच वैफल्य आणल्याचे ते सांगतात. पण हाच अनुभव त्यांना नंतर अतिशय उपयुक्त ठरला. १९९५ साली दक्षिण आशियात डिस्कव्हरी वाहिनी सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. खासगी, व्यावसायिक वाहिनी असूनही चौकटीबाहेर न जाणाऱ्या डिस्कव्हरीची अमेरिकेतील कार्यशैली पाहून ते प्रभावित झाले. डिस्कव्हरीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी सहा वर्षे काम केले. गंभीर वाहिनी असूनही ती यशस्वी होऊ शकते आणि नफाही कमावू शकते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदूीत डिस्कव्हरी वाहिनी सुरू करायला चांगलाच विरोध झाला होता. पण तो त्यांनी मोडून काढला आणि इंग्रजीपेक्षा हिंदूीत ही वाहिनी फायद्यात येऊ शकते हे सिद्ध करून दाखविले. बीबीसीच्या सहकार्याने त्यांनी अ‍ॅनिमल प्लॅनेट वाहिनीही सुरू केली. २००१ साली त्यांनी डिस्कव्हरी सोडले. पण देवांग मेहता यांच्या अकाली निधनामुळे त्यांना नॅसकॉमची सूत्रे हाती घ्यावी लागली.
चार दशकांच्या वाटचालीत आपण अफलातून बदलांचे साक्षीदार ठरलो, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. हा बदल एवढा व्यापक आहे की आज शब्दकोशातील शब्दही बदलले आहेत. ‘डायल’ हा शब्द नव्या पिढीला ठाऊक नाही. विंडोज् आणि गेट्स या शब्दांचे अर्थ आज वेगळे ठरले आहेत. भारतीय जीवनशैली आमूलाग्र बदलली आहे. लोकांमध्ये पूर्वीचा भिडस्तपणा संपून जबरदस्त आत्मविश्वास बघायला मिळतो आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच हा बदल घडला आणि जगात भारताची प्रतिमा बदलली, असे त्यांना वाटते. प्रत्येकाने सतत काही तरी नवे, वेगळे शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखे असल्यामुळे अंगी आपोआपच नम्रपणा बाणवला जातो, हा निरंतर नवक्लृप्त्यांचा वेध घेण्यात गुंतलेल्या किरण कर्णिकांचा यशाचा व्यावहारिक मंत्र आहे.