आपल्या नावातच वाद्याचे नाव जोडले जाण्याचे भाग्य फक्त यू श्रीनिवास यांच्याच वाटय़ाला आले. त्यांचे नाव मेंडोलिन यू श्रीनिवास असे झाले आणि त्यांचे सारे अस्तित्वच त्या वाद्याशी निगडित झाले. जे वाद्य भारतीय संगीत व्यक्त करण्यासाठी निर्माणच झाले नाही, असे मेंडोलिन श्रीनिवास यांच्या हाती आले तेव्हा ते पुरे दहा वर्षांचेही नव्हते. पण कसे कोण जाणे, त्या वाद्याने त्यांच्या विचारविश्वाचा सारा आसमंत व्यापून गेला आणि कर्नाटक संगीतातील अतिशय अवघड आणि अनवट पद्धत लीलया सादर करण्याचे कसब त्यांच्या अंगी आले.
भारतीय संगीताच्या इतिहासात आपले नाव असे झळकावे, यासाठी सारी हयात घालवणाऱ्यांच्या भाळी नसलेले सगळे कोडकौतुक श्रीनिवास यांच्या वाटय़ाला आले, याचे कारण केवळ त्या वाद्यावरील त्यांचे प्रभुत्व एवढेच नव्हते. ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर भारतात आलेल्या अशा अनेक वाद्यांचे भारतीयीकरण करण्यात येथील कलावंतांनी आपली प्रतिभा उपयोगात आणली होती. मग ते हार्मोनिअम असो की व्हायोलिन. या वाद्यांवरील भारतीय संगीताचा आविष्कार ऐकल्यानंतर ब्रिटिशांची सगळी बोटे आश्चर्याने तोंडात जातील, असे कलावंत भारतात निर्माण झाले. हार्मोनिअमने हिंदुस्थानी संगीताची कास धरली, तर व्हायोलिनने कर्नाटक संगीतातील अढळपद मिळवले. मेंडोलिन या वाद्याचा बाजच निराळा! दिसायला ते आपल्या सरोदसारखे असले, तरीही त्यातील तारांच्या झंकारातून येणारा स्वरध्वनी भारतीय संगीताच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वामध्ये सहजपणे विरघळून जाणारा नाही. तरीही यू श्रीनिवास यांनी त्या वाद्यावर जी कमाल केली, ती अभूतपूर्व म्हणायला हवी. वयाच्या नवव्या वर्षीच रसिकांना अचंबित करायला लावणारे हे वादन जगभरातील सगळ्या रसिकांसाठी एक वेगळा अनुभव होता. पद्मश्री, संगीतरत्न, सनातन संगीत पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार यू श्रीनिवास यांचीच वाट पाहात होते. त्यामुळे ते मिळणे ही फार महत्त्वाची बाब नव्हती. परंतु मेंडोलिन या वाद्यावर पाश्चात्त्य संगीतात भारतीय संगीताच्या मदतीने प्रयोग करताना, जगातल्या दोन संगीत परंपरांना एकत्र आणण्याची किमया त्यांनी घडवून आणली. रविशंकर, झाकीर हुसेन यांच्याकडे असलेली वाद्ये भारतीय होती. पण श्रीनिवास यांच्या हातातील वाद्यही पाश्चात्त्यच होते आणि त्याच्यावर ते वाजवत होते, ते कर्नाटक संगीत. सिम्फनी आणि हार्मनी या जागतिक संगीतातील दोन प्रवाहांचा हा मिलाफ पाश्चात्त्य बनावटीच्या वाद्यांच्याच मदतीने होणे हे क्वचित घडून येणारे रसायन श्रीनिवास यांनी बनवले. वयाच्या अवघ्या पंचेचाळिसाव्या वर्षी त्यांचे निधन होणे ही नुसती चटका लावणारी घटना नाही, तर एका नव्या संगीत परंपरेच्या आगमन काळात घडून आलेली दुर्घटना आहे.