हरयाणातील राजकीय वर्तुळातही भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे नाव तसे अपरिचितच, पण रा. स्व. संघ व भाजप यांचे संघटन उभारण्यात पडद्यामागून त्यांनी मोठे काम केले आहे. कुणाचाही मुलाहिजा न बाळगणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हरयाणात जाटांचे राजकारण असताना आता खट्टर यांच्या रूपाने तिथे पंजाबी मुख्यमंत्री कार्यभार स्वीकारत आहे.
खट्टर १९७७ मध्ये संघात आले व १९८० मध्ये पूर्ण वेळ प्रचारक झाले. मोदी यांच्याबरोबर त्यांनी १९९० मध्ये हरयाणात काम केले. गुजरातेत कच्छमध्ये भूकंपाच्या वेळी काम केले. छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, दिल्ली या राज्यांत त्यांनी नंतर काम केले. १९९४ मध्ये ते भाजपमध्ये आले व महत्त्वाची संघटनात्मक पदे सांभाळली. हरयाणाच्या प्रचार समितीचे ते प्रमुख होते. त्यांच्यामुळे लोकसभेला त्या राज्यात भाजपला सात जागा मिळाल्या. खट्टर यांना तंत्रज्ञानाची आवड आहे, त्यांचे संकेतस्थळही आहे, प्रचार मोहिमांत त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.
खट्टर घराण्याचे पंजाबातील मूळ गाव पाकिस्तानात गेले, तर मनोहरलाल यांचा जन्म हरयाणाच्या रोहतक जिल्ह्य़ात निंदाना खेडय़ात झाला. शाळेत वादविवाद व चर्चात ते आघाडीवर असत. वडिलांनी विरोध केल्यानंतर आईकडून पैसे उसने घेऊन रोहतक येथील नेकी राम शर्मा सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेऊन ते त्यांच्या कुटुंबात प्रथमच दहावीच्या पुढे शिकले. नंतर ते वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी दिल्लीला निघाले; दिल्लीत नातेवाइकांनी त्यांना डॉक्टरकीसाठी सात ते नऊ वर्षे निर्थक घालवण्याबाबत प्रश्न विचारले त्यामुळे त्यांचे मन व्यवसायाकडे वळले. त्यांनी सदर बझार येथे दुकान सुरू केले व त्यात यश आल्यामुळे कुटुंबाची कर्जे चुकती करून, बहिणीचे लग्न करून देऊन दोन भावंडांना दिल्लीत आणले. १९७५ मध्ये आणीबाणी लागली, ती दोन वर्षे चालली. त्यानंतर वयाच्या एकविसाव्या वर्षी ते राजकारणात आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहिले.
खट्टर यांना युती, आघाडीचे राजकारण मान्य नाही. १९९६ मध्ये भाजपने बन्सीलाल यांच्या हरयाणा विकास पक्षाबरोबर युती केली, पण खट्टर यांच्या मते ती महागात पडली. नंतर चौताला यांना भाजपने बाहेरून पाठिंबा दिला. भाजपच्या अंत्योदय योजनेचे नेतृत्व त्यांनी राष्ट्रीय पातळीवर केले आहे. उत्तम प्रशासन व सर्वाचा विकास असेच आश्वासन त्यांनी प्रचारात दिले आहे. अलीकडेच ‘मुलींनी योग्य पोशाख केला तर बलात्कार टळतील’ या वक्तव्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते, पण त्यांचा राजकीय कल वादांची शक्यताच टाळण्याकडे आहे.