राजधानी दिल्लीत नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक कर्तबगार महाराष्ट्रीय गेली काही दशके राहिले, त्यांच्या कर्तृत्व आणि खमकेपणाला सलाम करणारे हे सदर.. पहिले मानकरी आहेत शिल्पकलेच्या बळावर ‘भविष्याचे दार’ उघडणारे दिल्लीकर मराठी कलावंत, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार
‘सारी धरित्रीची स्वप्ने त्याच्या हातून बोलती
भूत-भविष्याची दारे साध्या स्पर्शाने खोलती..’
मातीशी स्पर्शसंवाद करणारे विख्यात शिल्पकार राम सुतार यांच्यातील अभिजात कलावंत कवी बा. भ. बोरकर यांनी बेचाळीस वर्षांपूर्वीच हेरला होता आणि त्यांच्यावर लिहिलेल्या उत्स्फूर्त कवितेत आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. कलाविष्काराचे उत्तुंग शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्र सोडून दिल्ली गाठणारे सुतार यांच्यासाठी साठ-सत्तरीचे दशकाचा तो काळ उमेदीचा आणि संघर्षांचा होता. कलाजगताला त्यांची ओळख पुरतेपणाने पटलेली नव्हती. कलाप्रांतातील बंगाली मठाधीश तसेच नोकरशहा त्यांच्या प्रतिभेला दिल्लीची कवाडे उघडून देण्यास उत्सुक नव्हते. मध्य प्रदेश-राजस्थानमधून वाहणाऱ्या चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाचे उद्घाटन करताना सुतारांनी काँक्रीटमध्ये कोरलेले बंधुत्वाचा संदेश देणारे चंबळदेवीचे शिल्प बघून प्रभावित झालेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची ऐतिहासिक भाक्रानांगल धरणावरही श्रमिकांचे भव्य शिल्प उभारण्याची कल्पना सुतारांना विरोध करणाऱ्या नोकरशाहीने मोडीत काढली होती. लाजपतनगरमधील दोन खोल्यांच्या घरात आपल्या कुटुंबासह शिल्पकलेच्या साधनेत गुंतलेल्या सुतारांच्या कलेला दिल्लीत ओसरीही मिळणार नाही आणि गाशा गुंडाळून ते परत कसे जातील याचेच चोहोबाजूंनी प्रयत्न सुरू होते. बालपणी शिक्षण घेताना तसेच नोकरी-व्यवसायादरम्यान पदोपदी आलेल्या कटू अनुभवांच्या आधारे सुतारांनी दिल्लीतील प्रतिकूल परिस्थितीवर संयमाने मात केली आणि कविवर्य बोरकरांनी कवितेत दिलेली ‘मातीचा राजा’ ही उपाधी सार्थ ठरविली.
आज संसद भवनाच्या प्रवेशद्वारापुढे डोळे मिटून ध्यानमग्न बसलेले महात्मा गांधी यांची सोळा फूट उंच ब्राँझची भव्य शिल्पकृती आणि लोकसभा अध्यक्षांच्या प्रवेशद्वारापुढे डौलात उभा असलेला २१ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राँझच्या पुतळ्यासह संसद भवनाच्या परिसरातील तब्बल सोळा पुतळे पद्मश्री राम सुतार यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. सुतार यांची शिल्पकला जगभर पसरली आहे. सुतारांच्या हातून ‘घडले’ नाहीत, अशा देशातील अव्वल राजकीय नेत्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी भरेल. ऐंशीहून अधिक देशांमध्ये सुतारस्पर्शातून साकारलेले महात्मा गांधींचे पुतळे उभे आहेत. त्यांची शिल्पकला तसेच त्यांच्या स्टुडिओमध्ये आकारास आलेले विविध नेत्यांचे पुतळे प्रत्येक राज्यात स्थानापन्न झाले आहेत. गोंदूर, धुळे, मुंबई, अजिंठा, वेरुळ आणि दिल्ली असा प्रवास करणारे सुतार आपल्या कारकीर्दीला भोवऱ्याची उपमा देतात. भोवऱ्याला जसजशी उतरण मिळेल तसतसा तो फिरत जातो आणि शेवटी एका टप्प्यावर झिंग घेतो, तसे आपल्या बाबतीत घडले आहे, असे ते आपल्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीविषयी मिश्कीलपणे सांगतात. सतत चालत राहिले की मनुष्य कुठल्या कुठे पोहोचतो, यावर तत्त्वज्ञानावर त्यांचा दृढ विश्वास आहे. परिस्थितीचे दु:ख केले नाही आणि मिळेल ते काम उत्तम प्रकारे केले. हेच आपल्या आयुष्याचे बीज ठरले, असे मागे वळून पाहताना त्यांना वाटते.
बालपणी व तरुण वयात शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचे संस्कार झालेले सुतार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदूरचा. १९ फेब्रुवारी १९२५ चा. सुतार, लोहारकामांसोबत शेती करणारे वनजी हंसराज सुतार यांच्या चार मुले व चार मुली अशा आठ भावंडांमध्ये ते दुसरे. बैलगाडय़ा, टांगे, शेतीची अवजारे बनविण्याची कामे वडील करायचे. राम सुतार यांच्यात सुतारी, लोहारी, वास्तुशास्त्र, अभियांत्रिकी हे गुण जात्याच होते. भाता फुंकून, हातोडा मारून, शेतीची कामे करून ते वडिलांच्या कामात हातभार लावायचे. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा नसतानाही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही आणि प्रसंगी दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण पूर्ण केले. बालवयातच शाळेच्या पाटीवर भवानी तलवार स्वीकारणाऱ्या छत्रपतींचे चित्र कोरून त्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक पेश केली होती. या उपजत गुणांच्या जोरावर मुंबईच्या जे.जे. स्कूलमधून शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत ते १९५२ साली अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात अजिंठा व वेरुळच्या लेण्यांमधील छिन्नविच्छिन्न झालेल्या शिल्पांना पूर्ववत करण्याचे अवघड काम करता करता त्यांच्यातील शिल्पकार कलेच्या प्रांतातील नवनव्या आव्हानांचा पाठलाग करीत थेट दिल्लीपर्यंत धडकला. वेरुळमधील पुरातत्त्व विभागाची नोकरी सोडून ते नोव्हेंबर १९५९ मध्ये दिल्लीतील दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालयात तांत्रिक सहायक म्हणून रुजू झाले. पण फारसे काम नसल्यामुळे त्यांच्यातील शिल्पकार अस्वस्थ झाला नव्हता. योगायोगाने त्याच वेळी प्रगती मैदानावर भरणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी जोडपे तसेच कष्टकरी शेतकरी अशी त्यांची दोन शिल्पे निवडली गेली. सरकारी नोकरीत असताना बाहेरची कामे करण्यास मनाई असल्यामुळे त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. सुतारांनी घडविलेल्या शिल्पकृतींची प्रशंसा भरपूर तर झाली, पण त्यांचा नोकरीचा दोर कापला गेला होता. आता व्यावसायिक शिल्पकार म्हणूनच पुढचा प्रवास करणे त्यांना क्रमप्राप्त होते. त्या वेळी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात आर्किटेक्ट असलेले जोगळेकर यांनी सुतार यांना केंद्र सरकारतर्फे, अशोकस्तंभ बनविण्याचे काम दिले. खरे तर खूप अशोकस्तंभ बनवायचे होते. पण हा प्रकल्प दोन अशोकस्तंभ तयार केल्यानंतरच बारगळला आणि सुतारांना कामाच्या शोधासाठी भोपाळ गाठावे लागले. मध्य प्रदेश सरकारने चंबळ नदीवर गांधीसागर धरण बांधायला सुरुवात केली होती. या धरणासाठी दहा हजार रुपयांमध्ये चंबळदेवीचे ४५ फूट उंचीचे शिल्प काँक्रीटमध्ये कोरण्याचे आव्हान सुतारांनी स्वीकारले आणि ते दिवसरात्र १०-१२ तास एकटय़ाने मेहनत करून १८ महिन्यांत पूर्णही केले. त्याच शिल्पाने त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीला कलाटणी दिली. चंबळदेवी आणि तिला कवटाळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन मुलांच्या शिल्पातून बंधुत्वभाव व्यक्त करणाऱ्या सुतारांविषयी पंडित नेहरूंच्या मनात आदरभाव निर्माण झाला. पण नोकरशाही आणि काही वंग-कलावंतांनी सुतारांचा विविध कारणांनी पिच्छा पुरविला तेव्हा पंडित नेहरूही त्यांची फारशी मदत करू शकले नाहीत. भाक्रा धरणावर सुतारांनी साकारलेले श्रमिकांची शिल्पकृती उभारण्याचे नेहरूंचे ध्येयही पूर्ण झाले नाही आणि दुर्दैवाने या धरणावर नेहरूंचाच १८ फूट उंचीचा पुतळा करण्याची जबाबदारी सुतार यांना पार पाडावी लागली. विपरीत परिस्थितीशी संघर्ष करीत तावूनसुलाखून निघालेल्या सुतारांचे कौशल्य अखेर काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
विविध प्रकल्पांनिमित्त सुतारांचा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी या पंतप्रधानांसह सर्वच बडय़ा राजकीय नेत्यांशी संपर्क आला. वाजपेयींच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आदरभाव होता. आपल्याला अटलजींचे आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे पुतळे करायचे आहेत, असे ते आवर्जून सांगतात.
शिल्पकलेतील बदलत्या ट्रेंड्सबद्दल तरुणाच्या उत्साहाने भरभरून बोलतात. ज्यांनी देश आणि समाज घडविला, अशा थोरामोठय़ांचे पुतळे घडविण्यासाठी मातीशी संवाद साधण्याची त्यांची साधना वयाच्या ८८ व्या वर्षीही अखंड सुरू आहे. पाटण्यात महात्मा गांधी आणि त्यांना सतत विरोध करणाऱ्या बंगाल्यांच्या कोलकाता विमानतळावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचे प्रकल्प पूर्णत्वाला जात आहेत. या कामात त्यांचे आर्किटेक्ट पुत्र अनिल सदैव हातभार लावत असतात. अनिल आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत, असे अभिमानाने सांगणारे सुतार यांच्या दिल्ली, नोईडा, फरिदाबाद, साहिबाबाद येथे शिल्पसाधनेसाठी केलेल्या मुशाफिरीत अनिल सुतारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘माणसांशी बोलताना शब्दाशब्दांशी गोंधळे
पण मातीशी बोलता त्याचा दिवस मावळे,’
आजही तेवढय़ाच उत्साहाने कामात गढून जाणाऱ्या सुतारांनी बा. भ. बोरकरांना चार दशकांपूर्वी लिहिलेल्या कवितेतील या ओळी सार्थ ठरविल्या आहेत.