निर्बुद्ध, एकसाची आणि प्रेक्षकांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणाऱ्या चित्रपटांची मांदियाळी ही ८०, ९० च्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीची ओळख. भिकार निर्मिती आणि वाह्य़ात विनोदी कथानक हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण. या काळातही वेगळे दखलपात्र चित्रपट आले. पण ते अपवाद म्हणून. आचरटपट हाच खरा तेव्हाच्या चित्रपटांचा चेहरा राहिला. याला कारणे अनेक होती. आर्थिक चणचण (आणि काळा पैसाही!), चित्रपटगृहांचा अभाव, हिंदीमुळे आलेला झाकोळ हे तर झालेच. पण खरे कारण चित्रपट या माध्यमाविषयी असलेली दरिद्री जाण हेच होते. मराठी भाषेप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीही मुमुर्षू झाली आहे काय, असे प्रश्न तेव्हा विचारले जात होते. २००४ मध्ये अचानक हे चित्र पालटले. ‘श्वास’ नावाचा एक साधा, सोपा, सरळ असा चित्रपट आला आणि असाही चित्रपट असू शकतो येथपासून असा चित्रपटही तिकीट खिडकीवर चालू शकतो हे भान त्याने मराठी चित्रपटसृष्टीलाच नव्हे, तर येथील आचरटपटांनी रंजल्यागांजल्या प्रेक्षकांनाही दिले. मराठी चित्रपटांच्या निर्माते-दिग्दर्शकांसाठी मधल्या काळात राष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे गुलबकावलीचे फूल झाले होते. ‘श्वास’ने ती पुरस्कार न मिळण्याची परंपराही खंडित केली. २००४ चे सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीचे सुवर्णकमळ आणि सवरेत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार त्याने पटकावला. मरणाची मरगळ आलेली मराठी चित्रसृष्टी त्यानंतर झडझडून जागीच झाली. २००९ मध्ये ‘जोगवा’, २०१० मध्ये ‘मी सिंधुताई सपकाळ’, २०११ मध्ये ‘देऊळ’, ‘शाळा’, ‘बालगंधर्व’, २०१२ मध्ये ‘इन्व्हेस्टमेन्ट’, ‘धग’, २०१२ मध्ये ‘अनुमती’, ‘संहिता’ अशी नावे राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत झळकली. मराठी चित्रपटसृष्टीने खरोखरच वेगळे वळण घेतले आहे, हेच यातून अधोरेखित होत होते. २०१३ साठी ‘फँड्री’, ‘अस्तु’, ‘यलो’ आणि ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांनी याच गोष्टीवर शिक्कामोर्तब केले. ‘श्वास’ हा या दृष्टीने मराठी चित्रपटसृष्टीचा वळणबिंदू म्हणता येईल. परंतु अशा एका चित्रपटाने सगळी चित्रसृष्टी बदलली असे म्हणणे हे भाबडेपणाचे ठरेल. नव्वदोत्तरी कालखंडात भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांची पाश्र्वभूमी चित्रपटांतील या बदलांस आहे, हे नीट ध्यानी घेतले पाहिजे. नव्वदनंतर आलेल्या कोक आणि लिव्हाईसने, मॉल आणि बीपीओंनी येथील नवश्रीमंत वर्गामध्ये मोठा सांस्कृतिक बदल होत होता. चित्रपट हे जनमाध्यम खरे. तो समाजाचा आरसा असेही म्हणतात. परंतु नेमक्या याच बदलत्या काळात मराठी चित्रपटांचा पारा उडालेला होता. हिंदीने केलेली मुख्य आणि समांतर प्रवाहांची मिसळ, आजवर केवळ चित्रपट चळवळींपुरताच मर्यादित असलेल्या जागतिक सिनेमाची सहज उपलब्धता, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये काही प्रमाणात येत असलेली चित्रसमज आणि दुसरीकडे मराठी आचरटपट. असा पर्याय असल्याने लोक मराठीपासून दूर गेले यात काही नवल नाही. ज्या क्षणी मराठी चित्रपट निर्मात्यांना याची जाणीव झाली, त्या क्षणापासून मराठी चित्रपटांना पुन्हा बाळसे आले. ‘श्वास’जवळ आपल्याला तो क्षण सापडतो. हिंदीतील पैसा आज मराठीकडे वळतो आहे. लहान चित्रपटगृहांची संख्या वाढलेली आहे. उपग्रह वाहिन्यांमुळे नवी बाजारपेठ निर्माण झाली आहे. हा काळ प्रयोगशील, वेगळे चित्रपट निर्माण करू इच्छिणारांना धाडस देणाराच ठरला. हे हिंदीत दिसते आहे. मराठीतही तेच घडते आहे. मराठीने ते टिकविले पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीने असे वेगळे चित्रपट देऊन पुढचे पाऊल टाकले आहेच. आता जबाबदारी प्रेक्षकांची आहे. मराठीजन मराठी कला टिकविण्यासाठी थोडे प्रांतवादी झालेच, तर बिघडले कुठे?