‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग आणि ‘पायोली एक्स्प्रेस’ पी.टी. उषा हा अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा समृद्ध वारसा. पण आतापर्यंत फारच मोजक्या धावपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे हा वारसा कोण पुढे नेईल, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्राला असा कोणताही वारसा नसताना महाराष्ट्राचे काही अ‍ॅथलीट राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. देशातील मॅरेथॉन शर्यतींवर आतापर्यंत सेनादल, पुण्यातील आर्मी स्कूल ऑफ फिझिकल ट्रेनिंग आणि रेल्वेच्या धावपटूंचे वर्चस्व असायचे. पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या अनेक धावपटूंनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत, मोनिका अथरे ही त्यांच्यापैकीच काही उदाहरणे. नुकत्याच मुंबईत झालेल्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीत ललिता बाबर, विजयमाला पाटील आणि रोहिणी राऊत या महाराष्ट्राच्या तीन मुलींनी पूर्ण मॅरेथॉन शर्यतीत भारतीयांच्या गटात अव्वल तीन क्रमांक पटकावत ‘मराठी पाऊल पडते पुढे..’ याचीच झलक दाखवून दिली. अ‍ॅथलेटिक्समध्ये जवळपास ९९ टक्के धावपटू हे खडतर संघर्ष करूनच पुढे आलेले असतात. या तिघीही याला अपवाद नाहीत. मॅरेथॉन शर्यतीचे जेतेपद पटकावणारी सांगली जिल्ह्य़ातली ललिता बाबर सध्या दुष्काळाचे चटके सहन करत आहे. रेल्वेच्या नोकरीसाठी ती मुंबईत असली तरी दुष्काळाची तीव्रता कशी कमी करता येईल, याचाच अधिक विचार ती करत आहे. मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा कुटुंबीयांना कसा फायदा होईल, या विवंचनेत ती अडकली आहे. पाच हजार किंवा दहा हजार मीटर शर्यतीत धावण्याचा ललिताला सराव आहे. पण दुष्काळावर मात करण्यासाठी ती ४२.१९२ कि.मी.च्या मॅरेथॉन शर्यतीतही धावू लागली आहे. मिळालेल्या बक्षिसातून दुष्काळाची झळ कमी करता येईल, हाच तिचा एकमेव उद्देश. मात्र मॅरेथॉन स्पर्धा नसताना आमच्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन तिने केले आहे. मुंबईत राहणाऱ्या विजयमालानेही अनेक अडचणींवर मात करून हे यश संपादन केले आहे. सरावासाठी कोणताही प्रशिक्षक नसताना, चांगले बूट घेण्याची कुवत नसताना विजयमालाने आपला ठसा उमटवला आहे. सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेत तिने आपली मार्गक्रमणा केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर मजल मारणाऱ्या रोहिणी राऊत हिची घरची परिस्थितीसुद्धा हलाखीची आहे. वडील ट्रकचालक, आई गृहिणी, दोन जुळ्या मुली अ‍ॅथलेटिक्सकडे वळलेल्या, आहारावरील प्रत्येकीचा महिन्याचा खर्च १२ हजारांवर गेलेला. त्यामुळे गुणवत्ता असूनही चांगले प्रशिक्षण घेण्यासाठी रोहिणीकडे पैसेच नाहीत. नागपुरात धावण्यासाठी चांगला ट्रॅक नाही, योग्य सोयीसुविधा नाहीत, चांगला प्रशिक्षक नाही. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रोहिणीने या सर्वावर मात करून मुंबई मॅरेथॉनमध्ये आपली छाप पाडली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अनुभवी धावपटूंकडून मार्गदर्शन घ्यायचे आणि त्या आधारावर सराव करायचा आणि स्पर्धेत घवघवीत यश मिळवायचे, हा रोहिणीचा आतापर्यंतचा प्रवास. या तिघींपाठोपाठ नाशिकची मोनिका अथरे, सचिन पाटील यांनी अर्धमॅरेथॉन शर्यतीत चांगले यश संपादन केले. मात्र राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या धावपटूंनी गगनभरारी घेतली असली तरी त्यांच्या जिद्दीला पुरस्कर्त्यांची साथ हवी आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून त्यांना ना मदत केली जाते ना मार्गदर्शन. बूट आणि महिन्याचा आहाराचा खर्च पेलताना त्यांची दमछाक होत आहे. या धावणाऱ्या पावलांना पुरस्कर्त्यांचे बळ मिळाले तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धापाठोपाठ ऑलिम्पिकमध्येही देशाचा तिरंगा फडकण्यास मदत होईल.