मार्क ट्वेन यांना लाभलेल्या उदंड लोकप्रियेत त्यांच्या वाङ्मयीन गुणवत्तेप्रमाणेच त्यांच्या बहुस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचाही वाटा होता. ट्वेन हे अमेरिकी जनतेचे सांस्कृतिक दैवत आहे. अगदी गरिबीत जन्माला येऊनही स्वकर्तृत्वाने भौतिक यश प्राप्त करणे हे सर्वसामान्य अमेरिकी माणसाचे ध्येय असते. त्याला अनुरूप असाच ट्वेनचा जीवनक्रम असल्याने ते त्यांना आपल्या जवळच्या आप्ताप्रमाणे वाटतात. त्यामुळेच की काय, अमेरिकी माणसाच्या मनात ट्वेनविषयी आदराची आणि जिव्हाळ्याची भावना आजही जितीजागती आहे. त्याचे प्रत्यंतर दोन वर्षांपूर्वी ट्वेनची स्मृतिशताब्दी साजरी झाली तेव्हा आले. त्यानिमित्ताने त्यांच्या पुस्तकांच्या निरनिराळ्या आवृत्त्या निघाल्या, पुन्हा एकवार त्यांच्या लेखनाची समीक्षा केली गेली. नव्याने संशोधन करून लिहिलेली त्यांची काही चरित्रेही प्रसिद्ध झाली. मायकेल शेल्डन यांनी लिहिलेले ‘मार्क ट्वेन – मॅन इन व्हाइट’ हे चरित्र त्यानंतर काही काळाने प्रसिद्ध झाले. ट्वेन यांच्या अप्रकाशित दैनंदिन्या आणि पत्रव्यवहार यांच्या आधारे त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या सुमारे चार वर्षांचा आढावा यात तपशीलवार घेतला गेला आहे.
वयाची सत्तरी पार केल्यावरही ट्वेन यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. अमाप वाङ्मयीन यश, लोकप्रियता आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचे झगमगते वलय त्यांना लाभले होते. कुशाग्र बुद्धिमत्ता, विनोदी स्वभाव, संभाषणचातुर्य आणि अद्ययावत पांढरीशुभ्र वेशभूषा यामुळे ते सहजच कोणावरही प्रभाव टाकत. त्यामुळे त्यांच्याकडे आपोआपच साहित्यिकांचे नेतृत्व आले. त्या काळी लेखकांच्या स्वामित्वधनाचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. अनेक प्रकाशक लेखकाला न विचारता चोरून त्याची पुस्तके प्रसिद्ध करत. या बेकायदेशीर व्यवहारात प्रकाशक श्रीमंत होत, तर लेखकाला काहीच मिळकत होत नसे. अमेरिकी सरकारचे स्वामित्वधनविषयक कायदे लेखकांच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. तत्कालीन कायद्यानुसार पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर ४२ वर्षे लेखकाचा त्यावर हक्क मानला जात होता. ऐन तारुण्यात एखाद्या लेखकाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि तो दीर्घकाळ जगला, तर त्या पुस्तकावर आपला हक्क नसल्याचे त्याला वृद्धापकाळी पाहावे लागत असे. ट्वेनने या कायद्याच्या विरोधात अनेक लेख लिहिले व भाषणे केली. डिसेंबर १९०६ मध्ये ‘लायब्ररी ऑफ अमेरिकन काँग्रेस’च्या सभेत लेखकांच्या स्वामित्वधनाचा मुद्दा चर्चेला आला असता, ट्वेन यांना साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले. लेखकाच्या मृत्यूनंतर किमान ५० वर्षे पुस्तकाच्या स्वामित्वाचे हक्क त्याच्या वारसाकडे राहिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी त्या प्रसंगी केली. ट्वेनच्या अभ्यासपूर्ण साक्षीने आणि तर्कशुद्ध युक्तिवादामुळे  सदस्य प्रभावित झाले, पण प्रकाशक मंडळींच्या दबावामुळे त्यांची ही मागणी मान्य होऊ शकली नाही.
लेखकाच्या स्वामित्वधनाविषयी जागरूक असलेले ट्वेन प्रत्यक्षात मात्र अतिशय अव्यवहारी होते. कालांतराने ते अमेरिकेत आणि युरोपात वक्ते म्हणून मान्यता पावले आणि त्यांच्या संपत्तीचा गुणाकार होत गेला. पण अव्यवहारीपणामुळे आणि आर्थिक नियोजनाअभावी ते नेहमीच कर्जबाजारी असत. पैसा मिळू लागल्यावर त्यांना भरमसाट खर्च करण्याची सवय लागली. अशातच त्यांचे आर्थिक गुंतवणुकीचे काही व्यवहार पूर्णत: फसले. ट्वेन यांनी घडय़ाळ निर्मितीच्या कारखान्यात आणि वाफेपासून वीज तयार करण्याच्या प्रकल्पात फार मोठी रक्कम गुंतवली होती. घडय़ाळ निर्मितीचा कारखाना वर्षभरात बंद पडला आणि वाफेपासून वीज तयार करण्याचे यंत्र कधीच अस्तित्वात येऊ शकले नाही. मुद्रण आणि प्रकाशन व्यवसायात गुंतवलेले त्यांचे तीन लाख डॉलरही असेच बुडाले. त्यामुळे ट्वेन उतारवयात कर्जबाजारी झाले. रोजचा घरखर्च चालवण्याइतपतही पैसे त्यांच्याजवळ उरले नाहीत. तो काळ आर्थिक मंदीचा होता आणि अनेक कर्जबाजारी माणसे दिवाळे काढून मोकळे झाले होते, पण ट्वेन यांना हा मार्ग मुळीच मानवला नाही.  प्रकृती बरी नसतानाही भाषणांचे कार्यक्रम व पुस्तकलेखन करून त्यांनी पैसे उभे करून सावकारांचे देणे दिले.
आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत ट्वेन अमेरिकेच्या अध्यक्षापेक्षाही अधिक लोकप्रिय होते. त्यांच्या प्रसिद्धीचा परिघ अमेरिकेबाहेरही विस्तारला होता. १९०७मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली आणि इंग्लंडच्या राजघराण्यानेही त्यांचा यथोचित सत्कार केला. सार्वजनिक जीवनात अतिशय आनंदी असलेले ट्वेन मात्र या दिवसांत  व्यक्तिगत जीवनात अतिशय दु:खी होते. कुटुंबातील जिवलग व्यक्तींच्या एकापाठोपाठ एक झालेल्या मृत्यूंमुळे ते मानसिकदृष्टय़ा उद्ध्वस्त होत चालले होते. १८९६ लाडकी मुलगी सुसी मेंदुज्वराच्या विकाराने मरण पावली आणि १९०४ मध्ये त्यांना पत्नीवियोगाला सामोरे जावे लागले. घरात क्लारा आणि जीन या दोन मुली होत्या. त्यांच्याशी ट्वेनचा संवाद दिवसेंदिवस कमी होत गेला. परिणामी इसाबेल ही त्यांची सचिव घरात मालकिणीच्या तोऱ्यात वागू लागली आणि राल्फ अ‍ॅशक्राफ्ट हा कायदेशीर सल्लागार घरगुती व्यवहारात अतिरिक्त हस्तक्षेप करू लागला. जीनला अपस्माराचे झटके येत, तर क्लारा ही काहीशी विचित्र स्वभावाची होती. यामुळे घरातील सुसंवाद संपला. अर्थात याला ट्वेनही काही प्रमाणात जबाबदार होते. वृद्धापकाळामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा झाला होता. शिवाय मुलींना आवश्यक खर्चासाठी पैसे देतानाही ते हात आखडता घेत. परिणामी मुलींच्या मनात कडवटपणा निर्माण झाला. कुटुंब कलहाला कंटाळून ट्वेन यांनी आपला मित्र हेन्री रॉजर्सच्या घरात मुक्काम हलवला. जीन आणि रॉजर्स यांचे १९०९मध्ये निधन झाले.
त्यानंतर ट्वेन यांनी अखेरची निरवानिरव सुरू केली. १८३५मध्ये हॅलेचा धूमकेतू दिसत असताना आपला जन्म झाला असल्याने १९१०मध्ये हॅलेचा धूमकेतू पाहूनच आपला मृत्यू होईल, असे ट्वेन म्हणत. नेमके तसेच घडले. २१ एप्रिल १९१० रोजी ट्वेन मरण पावले, तेव्हा आकाशात उगवलेला हॅलेचा धूमकेतू अस्तमान पावत होता!
ट्वेन यांचे हे चरित्र कमालीचे वाचनीय झाले आहे, ते त्यांच्या आयुष्यातील अशा अनेकविध, वैचित्र्यपूर्ण घटनांमुळे!

मार्क ट्वेन – मॅन इन व्हाइट :
मायकेल शेल्डन,
रॅण्डम हाउस,
पाने : ५२८, किंमत : ३० डॉलर.