मनपरिवर्तन ही एका रात्रीत पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे चालविल्या जाणाऱ्या लोकशिक्षणाच्या असंख्य मोहिमांचा परिणाम तातडीने दिसत नसला, तरी असंख्य मनांच्या संवेदनांवर फुंकर मारण्याची, त्या जाग्या करण्याची शक्ती त्या मोहिमांमध्ये असते. मुळात, प्रत्येक सजीवाच्या मनात संवेदनांचा एक कोपरा असतोच, आणि मानवी मन अन्य प्राण्यांपेक्षा प्रगल्भ असल्याने, मानवी संवेदनांचा हा कोपरा नेहमीच जागा असतो. लोकशिक्षणाच्या मोहिमा नेमका याचाच लाभ साधण्याचा प्रयत्न करत असतात. एखादी गोष्ट मनावर ठसविण्यासाठी त्या गोष्टीचे असंख्य बरेवाईट कंगोरे मनामनावर ठसविले गेले, तर या संवेदनांना पाझर फुटू शकतो, हे सांगण्यासाठी आता नव्या संशोधनाची आवश्यकता राहिलेली नाही. या संवेदनांना विधायक साद घालण्यासाठी सदुपयोगाच्या हेतूने अशा मोहिमा राबविल्यास त्याचा अनुकूल परिणाम दिसू शकतो. ज्या समाजात स्त्रीला देवतेचे स्थान दिले जाते, त्याच समाजात मुलगा नसेल तर मेल्यानंतर मोक्ष नाही अशी समजूतही रुजविली गेली आहे. या वेडगळ समजुतीमुळे आजवर झालेल्या असंख्य स्त्री भ्रूणहत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी बाब आहे, हे ठसविण्याच्या मोहिमा सुरू असतानाच, बीड शहरात एक डॉक्टर दाम्पत्यच या पाशवी मनोवृत्तीला खतपाणी घालत पैशाच्या राशी जमा करत असल्याची लज्जास्पद बाब पुढे आली.  निर्थक रूढी-परंपरांच्या पगडय़ापायी माणसाची मजल कोणत्या थराला जाते याचेही जिवंत उदाहरण आहे. एका बाजूला असे कलंक ठळक होत असतानाही, स्त्री भ्रूणहत्याविरोधी लोकशिक्षण मोहिमांचा परिणामदेखील जिवंत होऊ लागला होता, हे नांदेड जिल्ह्य़ाच्या लोहा तालुक्यातील एका गरीब कुटुंबाने दाखवून दिले. ज्या मनांच्या संवेदना जाग्या असतात, अशी मने अशा विपरीत घटनांनी विदीर्ण होतात, त्यांना वेदनांचाच पश्चात्तापाचा पाझर फुटतो. माळकोळी नावाच्या एका लहानशा खेडय़ात चरितार्थ चालविणाऱ्या जालिंदर कागणे यांचे कुटुंबच या दृष्टीने एक वेगळा आदर्श ठरले आहे. गावातील दारूबंदीसाठी तुरुंगवास सोसणाऱ्या आईवडिलांचा वारसा लाभलेले जालिंदर कागणे स्त्री भ्रूणहत्यांचा धंदा करणाऱ्या बीडमधील डॉक्टर दाम्पत्याच्या अघोरी कथांनी अस्वस्थ झाले, आणि समाजाचे पाप आपल्या शिरावर घेऊन पापक्षालनाच्या भावनेने त्यांना पछाडले. मनाला होणारे क्लेश केवळ शब्दांतून व्यक्त न करता, १४ वर्षांपूर्वी विवाहप्रसंगी हुंडय़ापोटी घेतलेली लाखाची रक्कम परत करण्याच्या त्यांच्या एका निर्णयातच त्यांच्या वेदनांचे प्रतिबिंब उमटलेले आहे. स्त्री भ्रूणहत्या हा जेवढा अघोरी प्रकार आहे, तेवढीच हुंडय़ाची प्रथादेखील अघोरी म्हणावी लागेल. या प्रथेपायीच जन्माला येणारी मुलगी ओझ्यासमान ठरून ‘नकोशी’ होऊ लागते. त्यामुळे खरे तर, ‘हुंडा’ ही प्रथाच ‘मुलगी नको’ या मानसिकतेचे नाइलाजाने रुजलेले मूळ आहे. जालिंदर कागणे यांना कदाचित याच भावनेमुळे हुंडा घेतल्याचा पश्चात्ताप झाला असावा. हुंडय़ाची रक्कम परत करून आत्मक्लेशास कारणीभूत ठरणाऱ्या पश्चात्तापातून मुक्ती मिळविण्याचा त्यांचा मार्ग समाजाने अनुसरावा असा आदर्श ठरणार आहे. त्यांच्या या आदर्शाचा प्रसार झाला पाहिजे. त्यातूनही मनपरिवर्तनाची एक नवी प्रक्रिया सुरू होईल, आणि मनपरिवर्तनाचे संथ परंतु प्रभावी साधन असलेल्या मोहिमांचे यशदेखील अधोरेखित होईल. कदाचित, मनपरिवर्तनाची नवी चळवळदेखील रुजू शकेल..