वांशिक संबंधांच्या बाबतीत एक देश म्हणून गेल्या काही दशकांमध्ये आपण खूपच प्रगती केली आहे, पण त्याबाबतीत अजूनही काही समस्या आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणत असले तरी ते पूर्णसत्य म्हणून मानता येणार नाही. सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या दंगलींनीच वांशिक संबंधांबाबतच्या कथित प्रगतीच्या दाव्यातील फोलपण सिद्ध केले आहे. सहा वर्षांपूर्वीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कालखंडात खुद्द बराक हुसेन ओबामा यांनाही देशातील ‘व्हाइट अँग्लो सॅक्सनां’च्या मनांत रुजलेल्या वंशभेदाचा प्रत्यय आला होता. त्यावर मात करून ते निवडून आले. केवळ गौरेतरच नव्हे, तर गोऱ्यांनीही त्यांना मतदान केल्यामुळेच ते निवडून आले. पण त्याचा अर्थ वंशभेद कमी झाला असा नाही. जाती, धर्म, वंश यांच्यावरून समाजात भेदांनी मूळ धरले असेल, तर केवळ प्रतीकात्मक गोष्टींनी ते भेद कमी होत नसतात. फार फार तर काही काळ त्यांचा डंख कमी झाल्यासारखा दिसतो. वेळ येताच तो सगळा लाव्हा वर उफाळून येतो. सोमवारी रात्री अमेरिकेतील मिसुरीतील फर्गसन शहरासह लॉस एंजलिस, न्यूयॉर्क, सिएटल, फिलाडेल्फिया आणि शिकागो अशा अनेक शहरांत जाळपोळ, तोडफोड, हिंसक निदर्शने असे प्रकार घडले. ती आग अजूनही विझलेली नाही. फर्गसनमधील एका १८ वर्षीय नि:शस्त्र कृष्णवर्णीय तरुणाला पोलिसांनी गेल्या ऑगस्टमध्ये गोळ्या घालून ठार मारले. त्या प्रकरणी ‘संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करू नये’ असा निर्णय ज्युरींनी दिला. हा निकाल येताच कृष्णवर्णीयांच्या असंतोषाचा भडका उडाला आणि दंगल पेटली. अशा हिंसक प्रतिक्रियांचे समर्थन होऊच शकत नाही. व्यवस्थेने आमची निराशा केली, असे गौरेतर निदर्शकांचे म्हणणे आहे. त्यात तथ्यही आहे. व्यवस्थेच्या पायाशी असणाऱ्यांना व्यवस्थेकडून असे अनेकदा निराश व्हावे लागते, हा इतिहास आहे. अमेरिकेत गुलाम म्हणून आणण्यात आलेल्या कृष्णवर्णीयांना किमान माणसाचे जगणे मिळावे यासाठीही मोठा लढा द्यावा लागला हाही अगदी कालचा इतिहास आहे. पण याच व्यवस्थेतून त्यांना त्यांचे माणूस म्हणून असणारे हक्क मिळावेत यासाठीही प्रयत्न झालेले आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था भांडवलशाही. तरीही तेथे गौरेतर अल्पसंख्याकांसाठी आरक्षण आहे. अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन म्हटले जाणारे हे आरक्षणाचे धोरण मूलत: भांडवलदारांच्या चांगुलपणावर आधारित असले तरी त्याला कायद्याचे बळ आहे. त्याचा म्हणावा तितका फायदा झाला नाही हे तर खरेच आहे. सामाजिक न्यायाच्या पातळीवर केवळ काळेच नव्हे तर गोरे सोडून पिवळे, तांबडे, तपकिरी कातडीचे लोक उपेक्षित आहेत. हे अमेरिकेतील वास्तव आहे. मायकल ब्राऊन या कृष्णवर्णीय तरुणाला डॅरेन विल्सन हा पोलीस अधिकारी गोळ्या घालतो या घटनेने त्याच वास्तवावरचा पडदा पुन्हा एकदा दूर केला. आणि दंगल पेटली. तरीही हे तात्कालिकच कारण म्हणायचे. अमेरिकेतील २००८ सालची आर्थिक मंदीची लाट, स्थलांतरितांचा प्रश्न, दुसरीकडे आर्थिक, परराष्ट्र आणि संरक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रांतील अमेरिकी वर्चस्वाला बसत असलेले फटके, त्यातून ओबामांच्या नेतृत्वाबद्दलच निर्माण झालेले प्रश्न, उजव्या शक्तींचा वाढता प्रभाव अशा अनेक गोष्टींमुळे तेथील गौरेतरांच्या भावना आणि विचारविश्वाला बसत असलेले झटके हे सध्याच्या असंतोषाचे प्रमुख कारण आहे. १९९२ मध्ये रॉडनी किंग या कृष्णवर्णीय नागरिकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर लॉस एंजलिस पेटले होते. ती दंगल हा अमेरिकेसाठी एक कलंकच होता. त्याहीनंतर अमेरिका फारशी बदललेली नाही हेच ताज्या घटनांतून दिसत आहे. आग पेटविणारी चकमक बदलत आहे, आग मात्र तीच आहे, हीच आजची अमेरिकेतील परिस्थिती आहे.