आफ्रिकन-अमेरिकन माया अँजलो आत्मकथाकार, कवयित्री, गीतकार, नर्तिका, चित्रपट-दूरदर्शन दिग्दर्शक-अभिनेत्री-निर्माती, गायिका, राजकीय कार्यकर्ती आणि मानवाधिकार चळवळीची प्रणेती-विस्तारक होती. तिचं साहित्य लोकमान्य तर आहेच, पण ते समीक्षकमान्यही आहे.
सामान्यत: एखादा माणूस एका क्षेत्रात नैपुण्य मिळवतो आणि त्या क्षेत्रात अजोड कामगिरी करून विख्यात होतो. माया अँजलो या सामान्य नियमाला असलेला अत्यंत श्रेष्ठ असा अपवाद आहे.
तिचा जन्म ४ एप्रिल १९२८ रोजी सेंट लुईस, मिसुरी येथे झाला. तिचं जन्मनाव मार्गरेट जॉन्सनं; पण वयाच्या विशीच्या आसपास तिला आता जगभर प्रसिद्ध असलेलं ‘माया अँजलो’ हे नामाभिधान प्राप्त झालं. त्याला कारण झालं ते ‘पर्पल ओनिअन कॅबरे’मधलं तिचं नृत्य. हे नामकरण तिच्या भावाने केलं. मायाचे वडील बेली जॉन्सन हे नौदलात आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. तिच्या आईचं नाव होतं विवियन जॉन्सन! ती एक साधी गृहिणी होती. माया अवघी तीन वर्षांची आणि तिचा भाऊ पाच वर्षांचा असताना त्यांच्या आईवडिलांचं लग्न घटस्फोटाच्या खडकावर आदळून विसर्जित झालं आणि माया व तिचा भाऊ  यांची रवानगी आजीकडे झाली. तिच्या नव्या खडतर जगण्याला प्रारंभ झाला.
मायाला तिच्या आई आणि आजीबद्दल अनेकदा प्रश्न विचारले गेले. आईबद्दल तिला विशेष ओढ आणि आत्मीयता नव्हती. पण तिचं आजीशी फार जमायचं. आजी-माया यांच्यात इतकं सख्य होतं की, गावातले लोक त्यांना एकमेकींची सावलीच मानायचे. ही आजी मायाचा एकमेवाद्वितीय असा आधार होती.
आजीकडे असताना एका कृष्णवर्णी मुलीला जितकं शिकता येणं शक्य होतं, तितकं माया शिकली. काळ्या माणसांच्या आयुष्याच्या दोऱ्या ज्या गोऱ्यांच्या हातात होत्या, त्यांच्या मर्जीच्या परिघातच त्या काळी जगावं लागत होतं. कृष्णवर्णी म्हणून होणारी अवहेलना, अपमान, कोंडी आणि सततचं नाकारलं जाणं याचा अनुभव मायाला अगदी कोवळ्या वयातच आला.
आजीकडे तब्बल पाच वर्षे काढल्यानंतर माया आणि तिच्या भावाची रवानगी पुन्हा तिच्या आईकडे करण्यात आली. तिच्या आईच्या प्रियकराने या आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्या शारीरिक-मानसिक धक्क्याने ती पुढची जवळपास पाचसहा वर्षे पूर्णपणे मौनात गेली. तिला परत आजीकडे पाठवलं गेलं. स्वत:ला सावरण्याचं, उभं करण्याचं अवाढव्य आव्हान तारुण्यात प्रवेश करू पाहणाऱ्या मायासमोर आ वासून उभं होतं. माया व आजीनं हे आव्हान स्वीकारलं. या महत्प्रयासात मायाच्या मदतीला धावून आली ती मिसेस फ्लॉवर्स ही मायाळू बाई. तिच्या सातत्यशील अथक मदतीमुळे माया पुन्हा बोलू लागली. स्वत:ला ओळखू लागली. या सर्व प्रयत्नांची सांगता मायाचे रूपांतर एका स्वाभिमानी आणि तरुण मुलीत होण्यात झाली. बालवयात तिच्या ठायी असलेला बुलंद आत्मविश्वास तिला पुन्हा एकदा गवसला. तो आणि मनाची व्यापकता हीच पुढच्या काळात मायाची अत्यंत लक्षणीय ओळख ठरली.
स्वत:चा असा शोध लागतानाच १९४० मध्ये पुन्हा एकदा दोन्ही मुलांवर आईकडे परतण्याची वेळ आली. दरम्यान तिच्या आईनं दुसरं लग्न केलं होतं. घराची घडी आणि अंतर्गत वातावरणही बदललेलं होतं. अशा अनेक कारणांनी आईबरोबर राहणं असह्य़ झालेली माया घरातून पळाली आणि थेट वडिलांकडे पोहोचली. त्या घरात आस्था आणि प्रेम यांना जणू मज्जाव होता. त्याही छपराचा त्याग करून मायाने एका भंगारात काढलेल्या गाडय़ांच्या पडीक छपराचा आसरा घेतला. भंगार गाडय़ांची ही स्मशानभूमी मायासारख्या निराधार मुलांचं घरच होतं. तिथं राहत असतानाच ती अर्धवेळ नोकरी करत होती. याच काळात ती शहरातली पहिली आफ्रिकन-अमेरिकन स्ट्रीट कार नियंत्रक झाली. दरम्यान ‘कॅलिफोर्निया लेबर स्कूल’ या शाळेनं ‘डान्स अ‍ॅन्ड ड्रामा’मधील नैपुण्यासाठी तिला शिष्यवृती दिली.
१९५०च्या सुरुवातीला सॅनफ्रान्सिस्को शहरात मायाची नर्तिका आणि गायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. मग मायाने मागे वळून पाहिलं नाही. १९५७मध्ये तिचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. लवकरच ती राजकारण आणि मानवाधिकार चळवळीकडे वळली. नंतर इजिप्तमध्ये गेली आणि कैरो इथल्या ‘अरब ऑब्झर्वर’ दैनिकात संपादक म्हणून काम करू लागली. हा अनुभव घेतल्यावर १९६३मध्ये ती घाना या आफ्रिकन देशात गेली आणि ‘घाना विद्यापीठा’च्या ‘डान्स अ‍ॅन्ड ड्रामा’ विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाली. तिथे कार्यरत असतानाच ती ‘आफ्रिकन रिव्ह्य़ू’ची संपादक आणि ‘घानियन टाइम्स’ची नियमित लेखिका झाली. १९६६मध्ये ती अमेरिकेत परत आली आणि तिने दूरदर्शनवर ‘ब्लॅक, ब्ल्यूज, ब्लॅक’ या मालिकेला सुरुवात केली. याचबरोबर तिने ‘द लीस्ट ऑफ दिज’ हे दोन अंकी नाटकही लिहून सादर केलं. १९८१ साली मायाने ‘वेक फोरेस्ट विद्यापीठा’तील ‘अमेरिकन स्टडीज’ विभागात ‘आजन्म प्रोफेसर’ म्हणून नियुक्ती स्वीकारली.
मायाचं पहिलं लेखन म्हणजे तिच्या आत्मचरित्राचा पहिला खंड- ‘आय नो व्हाय द केज्ड बर्ड सिंग्ज’ (१९७०). तर तिचा पहिला कवितासंग्रह आहे- ‘जस्ट गिव्ह अ कूल ड्रिंक ऑफ वॉटर बिफोर आय डाय’ (१९७१) हा. तिच्या कोवळ्या वयातील आयुष्याची जी दयनीय परवड झाली, जो लैंगिक अत्याचार- वर्णभेद तिने सोसला आणि पालकांच्या मोडलेल्या संसारात तिची जी ससेहोलपट झाली, त्याचंच चित्र या आत्मचरित्रातून रेखाटलं जाणं अगदी स्वाभाविक होतं. असं असलं तरी या लेखनाचा परीघ केवळ स्वत:पुरता मर्यादित राहिला नाही. आपल्या सभोवतालचं सामाजिक वातावरण आणि त्यातले ताणेबाणेही त्यात उत्कट संवेदनशीलतेनं शब्दबद्ध झाले.
याच पहिल्यावहिल्या लेखनातून मायाची स्वतीत होण्याची, आव्हानं स्वीकारण्याची, अतिशय अ-रूढ मार्गानं जीवनाला कवटाळण्याची खुली वृत्ती व्यक्त होते. आत्मकथा आणि पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्यापासूनच माया अमेरिकेची पहिल्या प्रतीची प्रतिष्ठित आणि लोकप्रिय लेखिका झाली.
सात भागांतील तिच्या आत्मचरित्रात तिचं प्रत्यक्ष जीवनच अवतरलेलं असलं तरी त्यात कल्पनेचे रंगही काही प्रमाणात मिसळलेले आहेत. जीवन आणि लेखन यात एक आंतरिक नातं असून अनेकदा समांतरतेनं वाहणारे हे दोन प्रवाह लीलया एकमेकांत मिसळून गेलेले दिसतात किंवा त्यांत ध्वनी-प्रतिध्वनीचं नातं दिसून येतं. ‘मी जगते तेव्हा लिहिते आणि लिहिते तेव्हा जगते’ असं माया म्हणे ते याच संदर्भानं!
पुढे माया कृष्णवर्णीयांचे नागरी हक्क, वर्णभेदविरोधी चळवळ यांची खंबीर पुरस्कर्ती झाली. ती अशा सर्व सामाजिक एकता स्थापू पाहणाऱ्या आंदोलक- कार्यकर्त्यांचा आवाज झाली. ‘या काळातील तिचं लेखन, तिच्या कविता म्हणजे आफ्रिकन आणि आफ्रो-अमेरिकन साहित्यातला एक ऐतिहासिक मोलाचा टप्पा आहे’ असं अ‍ॅडम डेव्हिड मिलर या समाजचिंतकानं म्हटलं आहे. त्यांचं हे विधान मायाच्या संपूर्ण आयुष्यालाच लागू पडणारं आहे.  
मायाचं साहित्य आणि तिचं जीवन ही एकात्म अशी वीण आहे. कृष्णवर्णी स्त्रियांना गोऱ्यांच्या समाजात वावरताना जे दमन सोसावं लागतं त्याचं तीव्र चित्र त्यातून सामोरं येतं. मायाचं लेखन काळ्या आणि गोऱ्या पुरुषांनी शतकानुशतकं केलेलं स्त्रियांचं दमन, आर्थिक-सामाजिक-कौटुंबिक आणि लैंगिक अत्याचार यांना स्वत:चा पैस विस्तारून सामावून घेतं. तिच्या कवितेबद्दल जेव्हा असं म्हटलं गेलं की, ती ‘फार सोपी’ आहे. तेव्हा मायाच्या कवितेवर नितांत प्रेम करणाऱ्यांनी तोच तिच्या कवितेचा आणि तिचा गौरव मानला. अनेक गौरवर्णी समीक्षकांनी तिच्या कवितेवर ‘बायस्ड’ असल्याची टीका केली. तेव्हाचे ‘हाच माझ्या कवितेचा महान गौरव आहे, अशीच कविता मी कायम लिहीत राहीन’ हे मायाचे उद्गार आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहेत.
मायाची कविता जगभर स्वीकारली गेली, त्याचं कारण ती सार्वत्रिकतेचा अनुभव देणारी आहे. वर्णभेद, धर्मभेद, जातिभेद, लिंगभेद आणि वर्गभेद अशा भेदांवर आधारलेल्या सत्ता जगभर आहेत. या सत्तांच्या वरवंटय़ाखाली यातना सोसणारे, पिचलेले आणि माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत हक्काला वंचित झालेले जे कोटय़वधी लोक आहेत त्यांच्याशी या कवितेचं थेट नातं आहे. आपल्या वेदना जाणणारं कुणीतरी आहे असा दिलासा सर्व वंचितांना मायाची कविता देते.  
मायाचं सारं लेखन हे अत्यंत संवेदनशील आणि पायाखालच्या जळत्या वास्तवानं व्यापलेलं आहे. ते वाचकाला  दु:खाची प्रगाढ जाणीव करून देणारं आहे, पण त्याचबरोबर त्याच्या मनात जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारं आहे. जीवन ही उत्सुकतेनं, समंजसतेनं, आनंदानं जगायची गोष्ट आहे हा विचार तिच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. भविष्याची ओढ आणि त्याबद्दलचं ओतप्रोत प्रेम हा तिच्या लेखनाचा एक ठळक विशेष आहे. असं असल्याने मायाच्या लेखनात येणाऱ्या उद्याची आस आहे, ओढ आहे, प्रेमळ सलगी आहे आणि सदैव टवटवीत राहणारी स्वप्नं आहेत. म्हणूनच तिचं साहित्य जगातील उत्तम साहित्यात गणलं जातं आणि सर्व संस्कृतींना आपलंसं वाटतं. ही विश्वमान्यता आणि सार्वकालिकता हीच तिच्या साहित्याची सर्वोच्च जमेची बाजू आहे आणि तोच मायाचा सर्वोच्च गौरव आहे!
माया अँजलो यांची एक कविता
माझा अपराध
माझा अपराध, म्हणजे गुलामांची अखंड साखळी
प्रदीर्घ रांग गुलामांची पिढय़ापिढय़ांची
आणि साखळदंडांचा
तो जमिनीवर घासला जाणारा आवाज..
आज हा भाऊ विकला गेला
या बहिणीची खरेदी झाली
खरेदी-विक्रीचे आवाज कानठळ्या बसवतात
आणि माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहातात..

माझा गुन्हा, म्हणजे आमचे सगळे नायक मेले, हरवले, परागंदा झाले
वेसी, टर्नर, गाब्रीअल, माल्कम, मारकस अन् मार्टिन किंग
सगळे सगळे गेले, मृत्यूने गिळंकृत केले
त्यांनी उग्र लढा दिला
ते सर्वाना प्रिय होते
हे सारं सांगायला मी अजून जिवंत आहे
हा माझा भयानक गुन्हा..

माझं सर्वोच्च पाप म्हणजे
मी अनेकांना झाडांवर फाशी गेलेलं पाहिलं
मी रडले नाही, फुटले नाही
मला अभिमान वाटला त्यांचा, ज्यांनी
गुलाम असताना विरोधाचा सूर लावला
आरपार संघर्ष केला
माझं पाप आहेय
मोठय़ानं आरडाओरडा न करण्याचं..
भोवतालात आग न पेरण्याचं..  
(मराठी अनुवाद – विजय तापस)