गेली ६५ र्वष तिबेटच्या नैसर्गिक साधनसामग्रीचे शोषण चीनकडून सुरू आहे.. निषेधाचे आवाज थोडे, तेही दाबलेच जाणारे, सरकार स्वतच ‘बलाढय़ खोटेपणा’चे ताबेदार.. अशा स्थितीत भारत आणि बांगलादेशसारख्या शेजारी देशांना तरी या चिनी पर्यावरण-संहारामुळे आपापल्या देशांवर काय गुदरणार आहे याची कल्पना आहे का? याचा शोध घेणारं हे पुस्तक , याच प्रश्नाचा गेली ३० र्वष अभ्यास करणाऱ्या पत्रकारानं लिहिलं असल्यानं अस्वस्थ करणारं ठरलं आहे.. ती अस्वस्थता वाचकापर्यंत पोहोचवणारा हा पुस्तक-प्रतिसाद..

सुस्वरूप कन्या हा आनंद की आईबापांच्या छातीवरील धोंड? काळाच्या ओघात तुमची जागा मोक्यावर येण्यानं तुम्ही हरखून जावं की हादरून? एखाद्या प्रदेशात भरपूर नसíगक साधनं असण्यानं वेगवान विकास होईल की बळजबरी स्थलांतराची पाळी येईल? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर, तुम्ही कोण? यावर अवलंबून आहे. तुमच्या हाती निरंकुश सत्ता नसेल तर प्रत्येक उत्तरामधील उत्तरार्ध वाटय़ाला येणं अटळ आहे. १३००० फूट उंचीवरील तिबेट म्हणजे कल्पनेपलीकडील सुंदर ती दुसरी दुनिया! निसर्गानं अनेकांगी ऐश्वर्य बहाल केलेल्या तिबेटच्या नसíगक भांडवलाची जाणीव चीनला झाली. ‘१९५० नंतर वंशविनाश (जिनोसाइड)आणि पर्यावरण विनाश (इकोसाइड) यामुळे तिबेटची परवड चालू आहे,’ असं मायकेल बकले यांनी ‘मेल्टडाउन इन तिबेट- चायनाज रेकलेस डिस्ट्रक्शन ऑफ इकोसिस्टीम्स फ्रॉम दि आयलँड्स ऑफ तिबेट टू द डेल्टाज ऑफ एशिया’ या पुस्तकातून साधार विश्लेषण केलं आहे. (नेमकं असंच वर्णन विख्यात लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीत आफ्रिका व भारताच्या संदर्भात येतं.) मायकेल बकले हे कॅनडातील पत्रकार असून गेली तीस र्वष ते धुमसणाऱ्या तिबेटचा अभ्यास करीत आहेत.
१३५ टन सोने, ६६६० टन चांदी, ५० लाख टन तांबे, पाच लाख टन मॉलिब्डेनम, सहा लाख टन शिसे व जस्त असा खनिज भांडार तिबेटच्या ग्यॅमा परिसरात असल्याचा शोध १९५० साली चीनला लागला. त्यानंतर खणण्याची व्याप्ती झपाटय़ाने वाढत जाते आहे. या काळ, काम आणि वेग यांच्या आड येणाऱ्या स्थानिक जनतेचा काटा काढण्याची कारणे सांगण्याची गरज चिनी पद्धतीत नाही. शेकडो वर्षांपासून राहणाऱ्यांची उपजीविका नष्ट होऊ लागली. तिबेटमधील आदिवासी व सामान्य जनतेचे विरोध व उठाव क्रूरपणे मोडून काढले गेले. हे पाहून लाखो तिबेटी जनतेचं स्थलांतर सुरू झालं. १९५९ साली दलाई लामा भारताच्या आश्रयाला आल्यानंतर सातत्यानं तो ओघ तसाच चालू राहिला. चीनला कच्चा मालपुरवठा वसाहत एवढंच चीनसाठी तिबेटला स्वरूप आलं.
महाकाय चीनची ऊर्जा, पाणी व खनिज पदार्थाची भूक राक्षसीच असल्यामुळे ‘उपयुक्त’ देशांना अंकित ठेवण्याचा अमेरिकी कित्ता चीन गिरवीत आहे. चीनने आफ्रिका खंडालाही वसाहतीचं स्वरूप आणलं असल्याची भावना त्या देशांमध्ये आहे. अन्नधान्यापासून खनिज पदार्थापर्यंत सर्व काही आफ्रिकेतून चीनकडे येत आहे.  
दोन ध्रुवांनंतरच्या जलसमृद्धीमुळे तिसरा ध्रुव असं नामाभिधान हिमालयाला लाभलं आहे. याच हिमालयातील तिबेट हे ब्रह्मपुत्रा, इरावती, मेकाँग, साल्विन, यांग्त्झे आणि पीत या मोठय़ा नद्या व हजारो हिमनद्यांचं उगमस्थान आहे. भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, पाकिस्तान, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया व व्हिएतनाम या देशांच्या जीवनरेखा तिबेटमधून निघतात. चीन हे धनाढय़, बलाढय़ आणि त्याच वेळी जलाढय़ राष्ट्र आहे. आशिया खंडातील सुमारे २०० कोटी लोकांचं पाणी चीनच्या हातात आहे. नद्यांचा ताबा असल्यामुळे चीनची भूराजकीय दांडगाई चालू आहे. (अरुणाचल प्रदेशला ‘ते’ दक्षिण तिबेट म्हणतात. प्रस्तावित धरणांच्या चिनी नकाशात अरुणाचलचा समावेश आहे.) ‘चीनमधून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय नद्या वाहत असूनही एकाही देशाशी जल करार न करणारा आडमुठा देश’ अशी कुख्याती लाभली आहे. सगळे शेजारी नाराज, कुठे संताप तर कुठे िहसक आंदोलनं झाली तरी चीन त्याला िहग लावत नाही. महासत्ता होण्याचा मार्ग पाण्यातूनच जातो, हे वेळीच ओळखून चीनच्या वेगवान हालचाली चालू आहेत.  
१५ मीटर (४९ फूट)पेक्षा अधिक उंचीच्या धरणांना ‘मोठे’ म्हटले जाते. ‘आयफेल टॉवर’ एवढय़ा (३०० मीटर) उंचीच्या अजस्र धरणास संबोधन उपलब्ध नाही. पृथ्वीतलावरील सर्वाधिक मोठी धरणे चीनमध्ये आहेत. चीनमध्ये १५ ते ३० मीटर उंचीची १७५२६ धरणे, ३० मीटरपेक्षा अधिक उंची असणारी ४५७८ धरणे आणि १०० मीटरपेक्षा उंच ३२ धरणे आहेत. धरणासक्त चीनमध्ये जगातील सर्वाधिक १७० गिगॅवॅट जलविद्युत निर्माण होते. दक्षिणेतील नद्यांचं पाणी उत्तरेतील नद्यांकडे वळवण्याचा लाखो अब्जावधींचा अजस्र प्रकल्प हाती घेतला आहे.
चीनमधील बहुसंख्य उद्योग हे कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांच्या खासगी मालकीचे आहेत. तेथील या उद्योगांच्या सोयीनुसार चिनी अर्थराजकारण चालत असते. मोठय़ा उद्योगांना खनिजं, पाणी व वीज आवश्यक आहे. यामुळे तिबेटला अतोनात भूराजकीय महत्त्व आलं आहे. अतिशय उंचीवरील बर्फाच्छादित तिबेटवर रेल्वेपासून सर्व काही सुविधा पुरवण्याचे भगीरथ प्रयत्न त्यासाठीच चालू आहेत. माजी अध्यक्ष लि पेंग यांचे चिरंजीव लि झियाओपेंग यांच्या ‘ह्य़ुएंग’ समूहाकडे बहुसंख्य धरणांची कंत्राटे असतात. तर लि पेंग यांच्या कन्या लि झिओलिन, ‘चायना पॉवर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ या कंपनीतील उच्च पदावर विराजमान आहेत. एकंदरीत चिनी भांडवलशाहीसुद्धा टोळीसत्तेच्याच ताब्यात आहे. केवळ आíथकच नाही तर राजकीय, लष्करी पाठबळ लाभल्यामुळे चिनी कंपन्यांची आगेकूच संपूर्ण जगभर चालू आहे. जगातील १०० मोठय़ा धरणांची कंत्राटे ३७ चिनी कंपन्यांना मिळाली आहेत.
ड्रगनच्या पिसाट वेगातील विकासात तिबेट उद्ध्वस्त आणि तेथील रहिवासी निर्वासित होत आहेत. गवताळ प्रदेश, विराट अरण्य व जैवसंपदा नष्ट झाल्या आहेत. ‘सहज जावं आणि नदीचं निर्मळ पाणी प्यावं’, ही बाब आता स्मरणरंजन (नॉस्टॅल्जिया) झाली आहे. तिबेटमधील बहुतेक जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. तिबेटची राजधानी ल्हासामध्ये २००९ पूर्वी डास नावालासुद्धा नव्हते, आता रहिवाशांना हिवतापसुद्धा होऊ लागला आहे (१५०० फूट उंच एव्हरेस्टच्या तळछावणीत माश्या आढळतात). तिबेटमधील पर्यावरण विध्वंस व त्यामुळे येत असलेल्या आपत्तींचं सखोल विश्लेषण लेखकानं केलं आहे.
कॅनडा, चीन आणि तुर्कस्तान ही राष्ट्रे जल भक्कम तर जगातील कित्येक देश हे पाण्याबाबत परावलंबी आहेत. या देशांमधील प्रमुख नद्या इतर देशांमधून वाहत येतात. नद्यांच्या वरील बाजूस असणाऱ्या देशांची कृपा झाली तरच या देशांना दरवर्षी नसíगक ताजे पाणी उपलब्ध होऊ शकतं. देशांतर्गत उपलब्ध होणारं पाण्याचं प्रमाण आणि बाहेरून येणारं पाणी यांचं मोजमाप करून त्या देशाचं पाण्याकरिता अवंलबितेचं प्रमाण किती आहे ठरवता येतं. बांगलादेशातील एकंदर पाण्याच्या साठय़ांपकी निम्मे साठे ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचे आहेत, तर भारताच्या आवश्यकतेपकी तीस टक्के पाणी व चाळीस टक्के वीज देण्यासाठी ब्रह्मपुत्रेचे पाणी अनिवार्य आहे. चीनने तिबेटच्या पूर्व भागात ‘नामचा बार्वा’ येथे ब्रह्मपुत्रेवर अजस्र धरण बांधून ४०,००० मेगावॅट क्षमतेची जलविद्युत निर्माण केली आहे. हे धरण झाल्यानंतर चीनला दया आली तरच भारत व बांगलादेशाला पाणी मिळणार आहे.
२०१० साली चीनचे राष्ट्राध्यक्ष हु जिन्ताओ (जे स्वत: जल अभियंता होते) भारतभेटीला आले असता भारताने आक्षेप नोंदवला होता. ‘‘छे! छे! अशा धरणाचा प्रस्तावसुद्धा नाही.’’ असा निर्वाळा (धादांत खोटा)चीनने दिला. उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांत धरणाचे बांधकाम दिसून येत होते. बलदंड असत्याशी दुबळे सत्य कसा सामना करणार? हवामान बदलाचा काळ आणि चिनी मुजोरी यामुळे चीनचे सर्व शेजारी हैराण आहेत. हवामान बदलाची गती पाहून त्यापासून होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अंदाज बांधण्याचे अनेक प्रयत्न जगभर चालू आहेत. ‘येत्या दहा वर्षांत पाणी हे प्रभावी अस्त्र होणार आहे. या जलयुद्धात नदीच्या वरील बाजूस असणारी बलाढय़ राष्ट्रे खालच्या बाजूस जाणारा पाणीपुरवठा अडवून अथवा तोडून टाकतील’- असा अहवाल २०१२ सालीच अमेरिकन गुप्तचर खात्यानं होता. त्याची प्रचीती बांगलादेश व म्यानमारमध्ये येत आहे.
त्सेिरग ओजर या धडाडीच्या कार्यकर्त्यां चीनमधील भयावह प्रदूषणाची कैफियत जगासमोर मांडण्याचं अचाट धर्य दाखवत आहेत. त्यांचे ईमेल, ब्लॉग हडपले जातात. त्यांच्यावर सतत नजर ठेवली जाते. परदेश दौऱ्याची परवानगी नाकारली जाते. तरीही त्या हवा व पाण्याचे प्रदूषण सहन करणाऱ्या जनतेचे हाल जगापर्यंत पोहोचवत राहतात. ‘हुटिलाँग खनिज उद्योगाच्या प्रदूषणामुळे हजारो जनावरं मेली, कित्येक गावं साथीच्या रोगांनी आजारी पडली; परंतु कुठलीच भरपाई मिळाली नाही. याच उद्योगाचे सांडपाणी थेट ल्हासा नदीमध्ये सोडल्यामुळे पूर्ण नदी गलिच्छ झाली आहे.’ असं ब्लॉगवर लिहिण्याचं धाडस ओजर दाखवतात. अशा ठिणग्यांमधूनच कधी तरी चीनमध्ये असंतोषाचा वणवा पसरेल अशी आशा करता येते.  
प्रस्तुत पुस्तकात बकले यांनी चीनच्या सर्व शेजारी देशांमधील लोकांना भेटून तिथले दयनीय पर्यावरण उलगडून दाखवलं आहे. भारतामधील ओरिसा, छत्तीसगढ, झारखंड या खनिजसंपन्न भागाची वाटचाल तिबेटच्या दिशेने असल्याचं जाणवत राहातं. ‘चिनी िहदी भाई भाई’ ही उक्ती केवळ या बाबतीत खरंखुरं वास्तव आहे. पर्यावरणाचा विनाश न करता विकास करणारा नमुना भूतानपासून शिकावा असं लेखक सुचवतात. अर्थात, भूतानमधील समाज एकसंध आहे व त्याचा आकार लक्षात घेता तो नमुना सार्वत्रिक होण्यास मर्यादा येतात. आपल्याकडे तरी आदर्श गावाच्या गुणांचा प्रसार कुठे होतो? जगातील महाप्रदूषकांमध्ये चीन व अमेरिकेनंतर आपणच येतो. महासत्तेच्या महायातना वाचताना आपण आपल्याकडे पाहायला लागतो. कहाणी तिबेटची असली तरी त्यामधील घटना सर्वत्र दिसू लागतात. त्यामागील अर्थराजकारण समजून येतं, याचं श्रेय लेखकाकडे जातं.

* मेल्टडाउन इन तिबेट- चायनाज रेकलेस डिस्ट्रक्शन ऑफ इकोसिस्टिम्स फ्रॉम द आयलंड्स ऑफ तिबेट
टू द डेल्टाज ऑफ एशिया
लेखक : मायकेल बकले  प्रकाशक : पॅलग्रेव्ह मॅकमिलन
पृष्ठे : २४८, किंमत : ४९९ रुपये