भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. दक्षिण आशियामधील या तिन्ही देशांची गेल्या ६५ वर्षांतील वाटचाल आणि त्यांचे भवितव्य याबद्दल जगालाही खरेतर प्रचंड कुतूहल असायला हवे. अभ्यासकांमध्ये आस्था असायला हवी. तशी ती दिसत नाही, या भावनेतून लिहिले गेलेले हे पुस्तक दक्षिण आशियाईंनाही स्वत:कडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे ठरू शकेल..
धार्मिक मूलतत्त्ववाद आणि युरोपीय साम्राज्यवाद यांचा इतिहास जगभर एकमेकांमध्ये भयावहरीत्या गुंतलेला आहे. एकमेकांबद्दलची पूर्वग्रहदूषित मते आणखी मजबूत व्हावीत आणि द्वेषाला बळकटी यावी, याकरिता दोन्हीही विचारधारांच्या पुरस्कर्त्यांना एकमेकांची कायमच गरज भासते. एकाने ओकलेली गरळ ही दुसऱ्याच्या अस्तित्वासाठी जीवनरस ठरते, अशा आशयाचे विधान ब्रिटिश इतिहासकार विल्यम डॅलिरपल sam05यांच्या ‘द लास्ट मुघल’ या पुस्तकात ब्रिटिश साम्राज्यवादाच्या अनुषंगाने आहे. त्याच्याच विद्रूप खुणा भारतीय उपखंडाच्या सध्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात जागोजागी दिसत आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशाचे पोषण तर पहिल्यापासूनच मूलतत्त्ववादी विचारांवर होत आले आहे. परंतु केंद्रात िहदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतातदेखील धार्मिक उन्मादाचे वारे जरा जास्तच जोरात वाहायला लागले आहेत. हा डेंजर वारा कानात शिरल्यामुळे तथाकथित सांस्कृतिक शुद्धीकरणाचे प्रयोग राबविण्याचा धडाका सुरू झाला आहे. डॅलिरपल यांच्याप्रमाणेच भारतीय राज्यघटनेतील ‘आधुनिक’ मूल्यांबद्दल आस्था बाळगणारे एक पत्रकार जॉन की आताच्या ‘मध्ययुगीन’ घडामोडींमुळे नक्कीच व्यथित होत असतील. कारण त्यांच्या मते भारताच्या आíथक प्रगतीला साह्यभूत ठरलेले सामाजिक सौहार्द याच आधुनिक धर्मनिरपेक्ष मूल्यांनी जपले आहे. त्यांच्या ‘मिडनाइट्स डिसेन्डन्ट्स’ या पुस्तकातून भारताविषयी कौतुक आणि आशा ओसंडते ती याच भावनेतून!
हे पुस्तक म्हणजे १९४७ च्या भारताच्या फाळणीपासून ते आतापर्यंतचा दक्षिण आशियाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे. दक्षिण आशियात जरी भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मालदीव हे देश येत असले तरी की यांच्या पुस्तकाचा मुख्य भर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यावर राहिला आहे.
या तिन्ही देशांना सध्या भेडसावणारे प्रश्न फाळणीची अपत्ये आहेत, अशी जॉन की यांच्या ‘मिडनाइट्स डिसेन्डन्ट्स’ची मध्यवर्ती मांडणी आहे. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताच्या आधारे १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. िहदू आणि मुस्लीम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत, या द्विराष्ट्रवादी विचारसरणीला खतपाणी घालून राजकीय आकांक्षा पूर्ण करू पाहणारी मुस्लीम लीग, अखंड हिन्दुराष्ट्राचा पुरस्कार करणारे ब्रॅम्हिनिकल िहदुत्ववादी आणि भारतासारख्या देशात सर्व धर्म गुण्यागोिवदाने नांदावेत, असे स्वप्न पाहणारी धर्मनिरपेक्ष विचारांची मंडळी अशा तीन मुख्य वैचारिक प्रवाहांनी भारतीय उपखंडाच्या भवितव्याची दिशा निश्चित केली होती. पुढे १९७१ मध्ये सांस्कृतिक आधारावर पाकिस्तानचीही फाळणी होऊन बांगलादेश जन्माला आला. जे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर म्हणून फाळणीकडे पाहण्यात आले, तेच प्रश्न आणखी जटिल स्वरूपात समोर उभे ठाकल्याचे गेल्या पासष्ट वर्षांचा इतिहास सांगतो.
मध्य-पूर्वेप्रमाणेच दक्षिण आशियादेखील जगातील अशांत प्रदेशांपकी एक बनल्याचे सांगताना मागील सहा दशकांत भारतीय उपखंडात किमान पाच युद्धे लढली गेल्याकडे की लक्ष वेधतात. त्यापकी एका युद्धाने तर संपूर्ण जग आण्विक युद्धाच्या उंबरठय़ावर आणले होते.
की यांच्या म्हणण्यानुसार, फाळणी ते बांगलादेश युद्ध हा भारत-पाकिस्तानसाठी राष्ट्रउभारणीचा महत्त्वपूर्ण टप्पा होता. दोन्हीही देशांनी सुरुवातीला धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंगीकारले. या तत्त्वाच्या आधारे भारताने सर्व क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली. तर पाकिस्तानने त्या तत्त्वाला तिलांजली देऊन इस्लामी राष्ट्राकडे वाटचाल सुरू केली. परंतु पूर्व पाकिस्तानातील लोकांमध्ये पश्चिम पाकिस्तानातील शासकांकडून दुय्यमत्वाची वागणूक मिळत असल्याची भावना प्रबळ बनली. त्याचीच परिणती बांगलादेश मुक्तियुद्धात झाली. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी पुढे केलेल्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताला छेद देत सांस्कृतिक पायावर आणखी एक मुस्लीम राष्ट्र निर्माण झाले. याच कालखंडात भारतातदेखील धार्मिक आणि राष्ट्रीय अस्मिता आणखी कट्टर बनत चालल्या होत्या. त्यामुळे स्थलांतरणासंदर्भातील व्याख्या कशा वेळोवेळी बदलत गेल्या, याकडेही की लक्ष वेधतात- ‘१९४७ च्या फाळणीच्या वेळी सीमा पार करणारे आश्रयार्थी ठरले. १९६० मध्ये ते निर्वासित झाले. १९७० मध्ये त्यांना हद्दपार म्हटले गेले. १९८० मध्ये ते घुसखोर ठरले. आता ते दहशतवादी म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.’ ज्यांना घुसखोर अथवा संभाव्य दहशतवादी म्हणून संबोधण्यात येत आहे, त्याच बांगलादेशी मजुरांच्या श्रमावर भारतातले बांधकाम क्षेत्र फुलत चालले आहे, हा आणखी एक विरोधाभास! ‘मेक इन इंडिया’मध्ये अशा लोकांचेही योगदान असते, हे कोण मान्य करणार?
दहशतवाद हा केवळ एका विशिष्ट धर्माच्या आश्रयानेच फोफावला आहे, असा मतप्रवाह सध्या या देशात बळकट बनला आहे. पण की यांनी नोंदवलेली निरीक्षणे कुठल्याही सदसद्विवेकबुद्धी शाबूत असणाऱ्या माणसाला पुन्हा विचार करायला नक्कीच भाग पाडतील. िहसेचा जन्म आणि माणुसकीचा खून कट्टरतेतूनच होतो. ते म्हणतात- ‘निषेधाचे जागतिकीकरण ही गोष्ट केवळ मुस्लीम कट्टरतावाद्यांपुरतीच मर्यादित नाही. हवेतच जंबो जेट उडवून निरपराधी प्रवाशांना मारण्याचा प्रयोग सर्वप्रथम करणारे दहशतवादी पॅलेस्टिनियन नव्हते, तर खलिस्तानी फुटीरतावादी होते. इंदिरा गांधींची हत्या त्यांनीच केली. पुढच्या पंतप्रधानांना एलटीटीईच्या तामीळ दहशतवाद्यांनी मारले. या सर्वाच्याही अगोदर महात्मा गांधी िहदुत्ववादी नथुराम गोडसेच्या गोळीला बळी पडले. नक्षलवाद्यांनीही अनेक बळी घेऊन पाकिस्तानी तालिबानशी बरोबरी साधली आहे.’
सत्तरच्या दशकात लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होत भारतात इंदिरा गांधी, पाकिस्तानात झुल्फिकार अली भुत्तो आणि बांगलादेशात मुजीबुर रहमान सत्तेवर आले. पण या तिघांनीही हुकूमशहाप्रमाणे कारभार चालवण्याचा केलेला प्रयत्न त्यांना पदच्युत करून गेला. ऐंशीचे दशक धार्मिक तुष्टीकरणाचे होते. भारतात िहदुत्ववादी भाजपचा उदय झाला. तर पाकिस्तान-बांगलादेशातील लष्करी राजवटीने सर्वच क्षेत्रांत इस्लामीकरण आरंभले गेले. आजमितीस या दोन्हीही विचारधारांना मानणाऱ्या संघटनांना पश्चिमेकडील सहानुभूतीदारांकडून कशी आíथक मदत मिळते, याचे विवेचन या पुस्तकात आढळते.
 पत्रकार म्हणून की यांच्या नजरेला भारत, पाकिस्तान, बांगलादेशातील नागरिकांच्या आचारविचारांमध्ये साम्यच आढळते. दोन शेजारी युरोपीय राष्ट्रांमध्ये जितका फरक आढळतो, तेवढाही फरक की यांना या देशांमध्ये दिसत नाही. उपजीविका अथवा कुठल्याही कारणाने देश सोडण्याची अथवा देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन राहण्याची प्रवृत्ती या तिन्हीही देशांच्या नागरिकांमध्ये आहे. राष्ट्रीयत्व वेगवेगळे असले तरी ही सगळीच मंडळी बॉलीवूडच्या चित्रपटांची प्रचंड चाहती आहेत. िहदी गाणी सगळ्यांकडूनच आपसूक गुणगुणली जातात. पेहरावही जवळपास सारखेच आहेत. जवळपास सगळेच जण रोजच्या रोज त्यांच्या ठरलेल्या धार्मिक गोष्टी करतात. जवळपास सगळेच जण आपल्याच बिरादरीत लग्न करतात आणि जवळपास सगळेच जण कौटुंबिक, धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितांचा अभिमान बाळगतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या तिन्ही देशांच्या राजकारणाचा खेळ असल्याच अस्मितांवर खेळला जातो. पुढल्या संकटाची बीजेही त्यातच आहेत.
पुस्तकाचा समारोप करताना १९९० च्या दशकात आलेल्या जागतिकीकरणाने की यांच्या मनात दक्षिण आशियाच्या भवितव्याविषयी आशा जागवली आहे. भारतामध्ये जागतिक महासत्ता होण्याची क्षमता आहे, असेही त्यांना वाटते. त्यात अडथळा आहे तो वाढता मूलतत्त्ववाद, धार्मिक व जातीय िहसाचार, महिलांवरील अत्याचार, आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न यांचा!
*मिडनाइट्स डिसेन्डन्ट्स
लेखक : जॉन की
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
पृष्ठे – ३४८, किंमत : ५९९ रु.

मी हे पुस्तक का लिहिले?
.. या पुस्तकाला कदाचित आव्हाने मिळतील आणि खचितच यापुढे जाणारी पुस्तके निघतील.
मग मी हे पुस्तक का लिहिले? उत्तर इतकेच आहे की, फाळणी झाली म्हणून आणि फाळणी झाली तरीदेखील- दक्षिण आशिया हा जगाचा तितकाच वैशिष्टय़पूर्ण आणि वादप्रवण भाग राहिला आहे, जितका sam08मध्यपूर्व (किंवा दक्षिण आशियातील लोकांच्या दृष्टीने, ‘पश्चिम आशिया’). दक्षिण आशियाची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त आहे आणि जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणूनही या भागाचा उदय झाला आहे, परंतु यापुढली महासत्तादेखील या भागातील असू शकते. गेल्या पासष्ट वर्षांत या भागात पाच कटू युद्धे लढली गेली आणि जग पुन्हा अण्वस्त्र स्पर्धेच्या कडेलोटी टोकापर्यंत जाऊन ठेपले तेही याच भागातील संघर्षांमुळे. तरीदेखील दक्षिण आशियाच्या प्रश्नांबाबत जागतिक समज फार कमी आहे आणि या भागाचा प्रभाव ओळखण्यातही जग कमी पडते आहे. या भागाचा अभ्यास तर फारच कमी झाला आहे. त्यातच, व्हिसावरील र्निबधांमुळे या भागातील आंतरदेशीय प्रवासावर आणि आपसांतील देवाणघेवाणीवरही मर्यादा येतात; हेही पूर्वग्रहामुळे परस्परांना समजून घेण्यात मर्यादा येण्याइतकेच गंभीर होय. अशा वेळी या भागाबाहेरील लेखकास थोडा अधिक वाव असतो, ही या पुस्तकाला हात घालण्यासाठी माझ्यासाठी मोठीच सबब ठरली आहे.
(* छापील पुस्तकाच्या लेखकीय मनोगतातून ‘लोकसत्ता- बुकमार्क’ने केलेला अनुवाद)

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
maryam nawaz pakistan s first woman chief minister maryam nawaz sharif in pakistani
विश्लेषण : मरियम नवाझ शरीफ.. बेनझीर भुत्तोंनंतर पाकिस्तानी राजकारणाची दिशा बदलणारी दुसरी महिला!
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?