स्वामी विवेकानंद वृत्तींना भोवरे असा शब्द कंसात वापरतात आणि तोदेखील मोठा मार्मिक आहे. भवाच्या जन्मजात प्रभावात जखडल्यानेच आपल्यात या वृत्ती उठत असतात आणि त्या जणू या भवसागरात गटांगळ्या खायला लावणाऱ्या भोवऱ्यांसारख्याच असतात! चित्तात उठणाऱ्या वृत्तींची चर्चा करताना स्वामीजी पाण्यावरील तरंगाचं रूपक वापरतात. ते म्हणतात, पाणी स्थिर असतं पण त्यावर दगड मारताच त्यावर तरंग उत्पन्न होतात. तसं बाह्य़ जग मनावर आघात करतं आणि त्यावेळी मनात प्रतिक्रिया अर्थात वृत्तीरूपी तरंग उत्पन्न होतात! स्वामीजी सांगतात, ‘‘खरे पाहता चेतन फक्त तुम्हीच आहात. मन तर बाह्य़ विश्वाच्या आकलनाचे तुमचे केवळ एक साधन आहे. उदाहरणार्थ हे पुस्तक घ्या. ‘पुस्तक’ या रूपात त्याला बाह्य़ विश्वात काहीच अस्तित्व नाही. बाहेर वास्तविकदृष्टय़ा जे काही आहे ते अज्ञात व अज्ञेय आहे. बाहेरील ते ‘अज्ञेय’ केवळ एक उद्दीपक कारण असते इतकेच. ज्याप्रमाणे एखादा दगड पाण्यात टाकल्यावर पाणी त्याच्यावर तरंगांच्या रूपाने प्रतिक्रिया करीत असते त्याचप्रमाणे ते बाहेरील अज्ञेय ज्यावेळी मनावर आघात करते त्यावेळी मनात प्रतिक्रिया निर्माण होऊन ‘हे पुस्तक’ अशी वृत्ती उत्पन्न होते. सारांश, बाहेर खरोखर जे काही आहे ते, म्हणजेच खरे बाह्य़ जगत हे मनात असल्या वृत्तींची प्रतिक्रिया निर्माण करणारे केवळ उद्दीपक कारण असते. बाहेरील उद्दीपक कारणाने आपल्या मनात निर्माण केलेली प्रतिक्रियाच फक्त आपण जाणू शकतो.’’ (राजयोग, पृ. १०९). स्वामीजी असेही सांगतात की, चित्त हे मनाचे उपादान वा घटकद्रव्य तत्त्व होय आणि वृत्ती म्हणजे बाह्य़ कारणांनी त्यावर क्रिया झाल्याने त्यात उठणाऱ्या लाटा वा तरंग होत. आपण ज्याला जग म्हणतो ते म्हणजे बाह्य़ उद्दीपक कारणांनी आपल्या चित्तात उठलेल्या विभिन्न वृत्तीच होत! (राजयोग, पृ. ११०). हे सर्व थोडं क्लिष्ट वाटेल पण ते अगदी बारकाईनं आणि समरसून जाणून घ्या, अशी प्रार्थना आहे. कारण यामुळेच आपल्याला अर्जुना समत्व चित्ताचें। तें चि सार जाण योगाचें। जेथ मन आणि बुद्धीचें। ऐक्य आथी।। या ओवीच्या हृदयापर्यंत पोहोचता येणार आहे. थोडक्यात जग म्हणजे काय? तर बाह्य़ उद्दीपक कारणांनी आपल्या चित्तात उठलेल्या विभिन्न वृत्तीच! आता इथे श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या ‘आघात जगाचे नाहीत आपलेपणाचेच आहेत’, या बोधवचनाचाही अर्थ प्रकाशित होतो! श्रीनिसर्गदत्त महाराजांना एकजण सांगू लागला, ‘‘जगात दु:ख आहे..’’ श्रीमहाराजांनी लगेच विचारलं, ‘‘कोणत्या जगात?’’ तो आश्चर्यानं आणि काहीशा त्राग्यानं म्हणाला, ‘‘याच जगात. जिथे तुम्हीही आहात.’’ श्रीमहाराज म्हणाले, ‘‘माझं जग आणि तुमचं जग एक नाही! माझ्या जगात आनंदाशिवाय काही नाही. तुमच्या जगात तुम्ही स्वत:हून अडकले आहात.’’ या बोधाचा अर्थही विवेकानंदांच्या या एका वाक्यातूनच उलगडतो. तेव्हा जगाचा जो प्रतिक्रियेला चालना देणारा प्रभाव आमच्या अंतरंगात उमटतो तेच वृत्तीचं मूळ आहे. तेच मनाच्या अस्थिरतेचंही मूळ आहे!