नाशिकमध्ये भाजपने साथ सोडल्यावर ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हा न्याय अगदी नैसर्गिकरीत्या कामी आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौरपद राखलेच.. पण विधानसभा निवडणूक पुन्हा जवळ आली असताना केलेल्या या राजकीय सोयरिकीनंतर, मनसे स्वबळ वाढवण्यासाठीच लढणार, इंजिनाची धडधड म्हणजे घडय़ाळाच्या तालावरील टिकटिक नव्हे, हे पटवून देण्याची जबाबदारी आणखीच वाढली आहे..
तब्बल पाच वर्षांपूर्वी, २००९मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे शिवसेना-भाजप युतीला राजकीय धडकी भरली होती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उरात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. खरे म्हणजे, राजकारण करणारा प्रत्येक नेता आणि प्रत्येक पक्ष, केवळ स्वबळ वाढविण्याच्या ईष्र्येने व त्याच हिशेबाने आपापल्या पटावरील सोंगटय़ांच्या हालचाली ठरवून निवडणुकांच्या रिंगणात उतरत असतो. त्या वेळी निवडणुका लढविताना राज ठाकरे यांचे गणितही कदाचित तसेच होते. पण राजकारणातही काही कोडी असतात. वरवर ती सोपी दिसत असली, तरी त्याची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांत गुंतागुंतच अधिकाधिक वाढत जाते. राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले हे खरे, पण ते बाळासाहेबांच्या मांडीवरून राजकारणाकडे पाहत होते, तेव्हा शिवसेनेची ताकद नुकतीच मुंबई-ठाण्यापलीकडे  पसरण्यास सुरुवात झाली होती. तो एक पक्ष होता, पण त्याहीपेक्षा, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणारी ती एक संघटना होती, आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांची नजर बाळासाहेबांच्या केवळ इशाऱ्याकडे खिळून राहिलेली होती. पुढे भाजपचे प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या व्यापक मुद्दय़ावर एकत्र आल्यास सत्तेची गणिते सोडविता येतील हा विचार गळी उतरविल्याने सेनेने भाजपशी युती केली. ही युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर राजकारणात शिवसेनेचे खऱ्या अर्थाने बस्तान बसले. त्यामुळे, बाळकडू पिण्याच्या काळात राज ठाकरे यांनी पाहिलेली शिवसेना ही संघटनाच होती.
या अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन पक्षाबाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, आणि पुढे दोनतीन वर्षांतच ते लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मैदानातही उतरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा आणि सेनेतून बंड करून बाहेर पडल्यामुळे नाराज सैनिकांची मिळालेली साथ यांमुळे त्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष सेना-भाजप युतीच्या राजकीय कुंडलीतील पीडास्थानी असणार, हे ताडून काँग्रेस-राष्ट्रवादीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. निवडणुकांच्या निकालातून त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच घडल्याचे स्पष्टदेखील झाले होते. हा पक्ष सत्तेवर येणार नाही, पण सत्तेवर येण्याची ताकद असलेल्यांना रोखू शकेल आणि सत्ता मिळविण्याची क्षमता असलेल्यांना साह्य़भूत ठरू शकेल अशी गणिते त्या वेळी मांडली जात होती. ती दोनही गणिते खरी ठरली. शिवसेना-भाजपला अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारामुळेच पराभव पत्करावा लागला, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवाराने मिळविलेल्या मतांची मदत झाली. शिवसेना-भाजप युतीच्या मनसेमुळे झालेल्या मतविभागणीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याने आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला. त्या निवडणुकीनंतर राज ठाकरे याचा सातत्याने इन्कार करीत असले तरी, निवडणुकीच्या मतांची आकडेवारी मात्र, हेच वास्तव अधोरेखित करते. पक्षाच्या जन्मानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत मनसेची काही गणिते बरोबर आली. अल्पावधीत विधानसभेत १३ आमदारांची फौज पाठविणारा पक्ष म्हणून मनसेने इतिहासही घडविला. पण राज्याच्या सत्ताकारणातील हुकमाचा एक्का होण्याचे गणित मात्र, तेव्हा साधलेच नाही.
हे सारे विस्ताराने नमूद करण्याचे कारण म्हणजे, आता पाच वर्षांनंतर पुन्हा विधानसभा निवडणुकांचे वारे नव्या वेगाने वाहू लागलेले असताना राज ठाकरे यांचा पक्ष कोणती भूमिका बजावणार याकडे राजकारणाचे लक्ष लागणार आहे. खरे तर, मधल्या पाच वर्षांच्या काळात मनसेला फारसे बाळसे चढले नाही. महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेला हा पक्ष मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेच्या जवळ राहिला. पण तेवढी सत्ता पक्षातील मरगळ झटकण्यास पुरेशी ठरली नाही. राजकीय कार्यक्रम नसेल तर कार्यकर्ते सुस्तावतात. कंटाळतात आणि आपल्याआपल्या पद्धतीने राजकारणात स्वत:ला गुंतवू पाहतात. राज्यातील अनेक शहरांत मनसेच्या लहानमोठय़ा कार्यकर्त्यांच्या फौजा असतानाही, मर्यादित काळापुरती आंदोलने वगळली तर सातत्याने राबवावा असा कार्यक्रम राज्यात सर्व मनसैनिकांसमोर राहिला नाही. राज ठाकरे यांच्या दौरे-भेटीगाठींच्या निमित्ताने पक्षाला येणारी झळाळी टिकविण्यासाठी राज्यात स्थानिक पातळीवर फारसे प्रयत्न न झाल्याने पक्षाला मरगळ आली, अशी जागोजागीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. अशा वर्तमानात राज ठाकरे यांचा पक्ष पुन्हा निवडणुकीला सामोरा जाण्याची तयारी करीत आहे.
सुमारे महिनाभरापूर्वी, लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करून जाहीर सभेत स्वत:ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून घोषित केले, तेव्हा पक्षात पुन्हा चैतन्याचे वारे वाहू लागले होते. स्वबळावर काही तरी घडणार, त्याचा फायदा केवळ पक्षालाच मिळणार अशा आशेची पालवी कार्यकर्त्यांमध्ये फुटू लागली होती. पण विधानसभेचे वारे वेगवान झाले तेव्हा राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये आपल्या विधानाभोवती संदिग्धतेचे वर्तुळ काढले. त्यापाठोपाठ नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे राजकारण रंगले आणि २००९ ची स्थिती पुन्हा निर्माण होणार या आशेने आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पालवल्यास नवल नाही.
नाशिक महापालिकेत भाजपच्या साथीने मनसेला सत्ता राखता आली होती. मधल्या काळात, मनसे आणि भाजपच्या हातमिळवणीचे छुपे आणि उघड प्रयत्न फसले. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेच्या राजकारणाला मोदींच्या करिश्म्याची झालर लागणार असे संकेत मिळू लागले होते. पण ते चित्र पुसट झाले आणि महापौर निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपने मनसेचा पाठिंबा काढून घेतल्याने सेना-भाजप युतीला तोंड देण्याचे आव्हान राज ठाकरे यांच्या मनसेसमोर उभे राहिले. अशा परिस्थितीत, ‘शत्रूचा शत्रू हा मित्र’ या न्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मनसेच्या मदतीला धावून आली आणि भाजप-सेनेला सत्तेपासून रोखण्यात मनसेला यश आले.
या परिस्थितीमुळेच, २००९चे चित्र पुन्हा उमटण्याच्या आशा आघाडीच्या तंबूत पालवल्या आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार पुन्हा एकदा भाजप-सेनेच्या उमेदवारांसमोर उभे राहिले, तर काँग्रेस आघाडीचे गणित सोपे होईल, असे आडाखे मांडले जात आहेत. पण दरम्यानच्या काळात राजकीय परिस्थितीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. मनसेला आलेली मरगळ, काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात पसरलेला असंतोष आणि लोकसभा निवडणुकीपासून भाजप महायुतीला अनुकूल असलेले राजकीय वारे यांमुळे पाच वर्षांपूर्वीची सारी गणिते जशीच्या तशी समोर आली, तरी त्याच पद्धतीने ती सोडविता येतील याची मात्र कुणालाच खात्री नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असली तरी नाशिकमध्ये मनसेने काँग्रेस आघाडीशी युती केल्याचे स्पष्ट झाल्याने, आगामी निवडणुकीवरही त्याचे सावट राहणार आहे. पक्ष वाढविण्यासाठीच मनसे रिंगणार उतरली आहे, हे मतदारांना पटवून द्यावे लागणार आहे.