महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणे अनेक अर्थानी महत्त्वाचे आहे. याआधी १९९५ साली पहिल्यांदा या राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. परंतु त्याला रसद ही सत्ताधारी काँग्रेसकडूनच आली होती. शिवाय ती निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे लढवलेली होती. फडणवीस यांच्या या सरकारबाबत असे म्हणता येणार नाही. हे सर्वार्थाने भाजपचे सरकार असेल आणि त्याच्या अस्तित्वासाठी जो काही किमान पाठिंबा लागेल तो देण्याचे कर्तव्य शिवसेनेस पार पाडावे लागेल. त्या अर्थाने या सरकारचे सारथ्य पक्ष म्हणून भाजप करेल आणि चालकाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल. पहिले युती सरकार १९९९ साली गेल्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. या काळात विरोधी पक्षनेता म्हणून आपले इमान न विकणारा एकमेव नेता असे फडणवीस यांचे वर्णन करता येईल. या काळात भाजपच्या जवळपास सर्व ज्येष्ठांनी, शरद पवार यांचा शब्दप्रयोग वापरावयाचा झाल्यास, सत्ताधाऱ्यांशी तोडपाणी करण्यातच धन्यता मानली. भाजपतील काहींनीच हा उद्योग केला तर शिवसेनेने घाऊक पातळीवर ही व्यवस्था केली. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून या पक्षाची विश्वासार्हता शून्य होती. या कंपूतील अपवाद एकच तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. याखेरीज आणखी एका कारणासाठी त्यांची पदोन्नती महत्त्वाची ठरते. दिवंगत वडिलांची आमदारकी वगळता फडणवीस यांना राजकीय वारसा नाही. त्यांच्या मागे ना कोणता उद्योगसमूह ना साखर कारखाना वा ना एखादी बँक. चांगल्या अर्थाने मध्यमवर्गीय मूल्ये मानणाऱ्या एका साध्या घरातील तरुणाने राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचावे हा महाराष्ट्रात अजूनही जिवंत असलेल्या सामाजिक अभिसरणाचा पुरावा मानावयास हवा. फडणवीस उच्चशिक्षित आहेत आणि अर्थकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. महाराष्ट्राचे काय चुकले याबाबत त्यांचे निदान अचूक आहे. विरोधी पक्षनेता या भूमिकेतून या आजाराचे प्रामाणिक निदान त्यांनी केले. आता मुख्यमंत्रिपदावरील नियुक्तीमुळे या आजारावर तितकाच प्रामाणिक उपचार करावयाची संधी त्यांना मिळाली आहे. ती ते दवडणार नाहीत, अशी आशा करावी असे त्यांचे आतापर्यंतचे तरी राजकीय वर्तन राहिलेले आहे. नुकतेच पायउतार झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक साम्य आहे. ते म्हणजे चारित्र्य आणि पदाशी असलेली बांधीलकी. फरक इतकाच की त्या बांधीलकीस पुढे रेटू शकेल असा पक्षीय पाठिंबा चव्हाण यांना काँग्रेसकडून मिळाला नाही. त्यामुळे ते पराभूत होणारी लढाईच लढत राहिले. त्या पाश्र्वभूमीवर फडणवीस यांचे असे होणार नाही, अशी आस महाराष्ट्र बाळगून आहे. महाराष्ट्राचा भ्रमनिरास होणार नाही, याची खबरदारी फडणवीस यांना घ्यावयाची आहे. पुढाऱ्यांच्या एरवीच्या पठडीत न बसणारे गोरेगोमटे फडणवीस एके काळी हौस म्हणून
मॉडेलिंग करायचे. कालपरत्वे आणि राजकारणाच्या धकाधकीत यासाठी लागणारी शरीरयष्टी राखणे त्यांना अवघड जाईल. परंतु त्या दिवसांतील आपली मॉडेलिंगची ऊर्मी त्यांनी अन्यत्र वळवावी आणि या राज्यास ‘मॉडेल’ मुख्यमंत्री कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. त्यात यश आले तरच त्यांची निवड सार्थ ठरेल.