इतके दिवस भाजप ज्या साध्यसाधनशुचितेच्या गप्पा मारत होता, त्या साधनशुचितेचा विसर त्या पक्षास नेमका शहा यांच्या निवडप्रसंगीच कसा काय पडला? कोणास अध्यक्ष करावे हा म्हटले तर भाजपचा अंतर्गत मामला आहे. परंतु या नेमणुकीची दखल घ्यावी लागते ती केवळ भाजपच्या आतापर्यंतच्या सोवळ्या भूमिकेमुळे. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर हे नीतिमत्तेचे सोवळे खुंटीवर टांगणे कितपत योग्य?
भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करावयास हवे. खून, खंडणीखोरी, अपहरण आणि तत्संबंधी अन्य पाच जबरी गुन्हे दाखल असलेल्या सन्माननीय अमित शहा यांची पक्षाध्यक्षपदी नेमणूक करण्याचे धैर्य दाखवणे हे तसे काही सोपे नव्हते. परंतु भाजपने ते करून दाखवले. हे कृत्य अतुलनीयच. याचे कारण हे सर्व वा यातील एक जरी गुन्हा असलेल्या व्यक्तीच्या हाती पक्षाची सूत्रे देण्याचे औद्धत्य अन्य कोणा पक्षाने दाखवले असते तर भाजप आणि त्या पक्षाचे कुलदैवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी कोण गहजब केला असता. ही अशी नेमणूक करणारा पक्ष जणू देश बुडवण्यास निघालेला आहे, त्या पक्षास नैतिकतेची कोणतीही चाड नाही आणि असा पक्ष लोकशाही व्यवस्थेस घातक आहे अशा स्वरूपाचा गदारोळ भाजपने केला असता आणि आपण म्हणजे जणू मूर्तिमंत नैतिकता असा सतीसावित्री पदर डोक्यावर घेऊन तो पक्ष वावरला असता. पण या आपल्या पूर्वेतिहासाकडे दुर्लक्ष करीत, गंभीर आरोपांच्या प्रभावळीसह मा. शहा यांची पक्षाध्यक्षपदी प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्या पक्षाचे आतापर्यंतचे राजकारण हे असे दुतोंडीच राहिलेले आहे. इतरांनी खाल्ले तर ते शेण आणि आपल्यावर खायची वेळ आली तर मात्र ती श्रावणी असा वरून कीर्तन आतून तमाशा-छापाचा आव भाजप आणीत आलेला आहे. आतापर्यंत तो अनेक वेळा उघड झाला आणि या अशा लटक्या नैतिकतेमुळे भाजपचे तोंड अनेकदा काळे झाले. परंतु काल अमित शहा यांना पक्षाध्यक्षपदी नेमून भाजपने स्वत:चे मुखकमल स्वहस्तेच काळे केले आहे. याबाबत विरोधकांना करण्यासारखे काही त्या पक्षाने ठेवलेले नाही. आत्मनिंदेचा हा भाजपचा स्वदेशी प्रयोग पाहिल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात. सत्ता मिळालेली असल्यामुळे या प्रश्नांचे उत्तर देण्यात भाजपला स्वारस्य असणार नाही, हे उघडच आहे. परंतु तरीही या प्रश्नांचा ऊहापोह व्हायला हवा. कारण लोकशाहीसाठी ते महत्त्वाचे आहेत.
यातील सर्वात महत्त्वाची बाब ही इतके दिवस भाजप ज्या साध्यसाधनशुचितेच्या गप्पा मारत होता, त्या साधनशुचितेचा विसर त्या पक्षास नेमका शहा यांच्या निवडप्रसंगीच कसा काय पडला? निवडणुकीच्या राजकारणात जय महत्त्वाचा, साध्यसाधनविवेकास तितकेसे महत्त्व नाही, असे या संदर्भात भाजपला वाटते काय? म्हणजे येनकेनप्रकारेण निवडून येणे महत्त्वाचे, कोणत्या मार्गाने जय मिळतो ही बाब दुय्यम असे त्या पक्षाचे मत आहे काय? वास्तविक विद्यमान राजकीय वातावरणात तसे असण्यात काहीही गैर नाही. गैर असलेच तर हे आहे की साध्यसाधनविवेक महत्त्वाचा असे मानायचे आणि त्या विवेकाच्या आधारे निर्णय घ्यावयाची वेळ आल्यास मात्र या विवेकास खडय़ासारखे बाजूला करायचे. हा दुटप्पीपणा झाला. एक राजकीय पक्ष म्हणून तोही एकवेळ क्षम्य मानता येईल. परंतु आम्ही इतरांसारखे नाही असा दावा करावयाचा आणि प्रत्यक्षात वागणूक अन्य कोणत्याही राजकीय पक्षासारखीच, हे कसे? इतर राजकीय पक्ष म्हणजे संधिसाधू आणि आमचा भाजप मात्र संतसज्जनाचा मेळा, असा आव आता त्या पक्षास कसा काय आणता येईल? बरे निवडणूक जिंकणे हा राजकारणाचा एकमेव स्वारस्यबिंदू असेच जर भाजपचेदेखील मत असेल तर असेच मत असणारे लालूप्रसाद यादव वा मायावती वा मुलायम सिंग वा अबु असीम आझमी हे मा. शहा यांच्यापेक्षा कमी आदरणीय कसे? राजकारण हे दुय्यम आहे, आम्हास समाज घडवायचा आहे असे एक टाळय़ाखाऊ बौद्धिकी विधान करावयास सर्व संघीयांना आवडते. ते खरे आहे असे मानले तर मा. शहा यांची निवड संघास अभिप्रेत असलेल्या समाजकारणास कशी काय उपयुक्त ठरते? खोटय़ा चकमकीत हत्या, महिलेवर गुप्त पाळत आणि अपहरण हे गुन्हे चारा घोटाळा वा ताज महामार्ग भ्रष्टाचार प्रकरण यापेक्षा कमी गंभीर आहेत, असे संघास वाटते काय? यातील एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही, सबब केवळ आरोपांवरून एखाद्यास शिक्षा करणे योग्य नाही अशा प्रकारचा प्रतिवाद भाजप वा संघाकडून या संदर्भात केला जाईल. मग मुद्दा असा की बोफोर्स असो की कै. हर्षद मेहता याने दिलेली कथित लाच असो, यातील कोणते आरोप कधी सिद्ध झाले? ते सिद्ध झाले नाहीत म्हणून भाजप विरोधकांवर आरोप करावयाचे थांबला काय? ही आरोप मालिका भाजपकडून आजतागायत केली जात असून त्याचे समर्थन कसे करणार? या नेमणुकीमुळे संघास आणखी एका टीकेस तोंड द्यावे लागेल. ती म्हणजे व्यक्तिपूजा. संघात, आणि म्हणून भाजपत, व्यक्तिमाहात्म्य नाही असे आतापर्यंत अनेकदा सांगितले गेले. हा दावा खरा मानावयाचा तर केवळ एका व्यक्तीच्या इच्छेपोटी कोणास थेट पक्षाध्यक्षपद कसे काय दिले जाते? कोणास अध्यक्ष करावे हा म्हटले तर भाजपचा अंतर्गत मामला आहे. अन्य कोणास त्यात पडावयाचे कारण नाही. परंतु या नेमणुकीची दखल घ्यावी लागते ती केवळ भाजपच्या आतापर्यंतच्या सोवळ्या भूमिकेमुळे. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर हे नीतिमत्तेचे सोवळे खुंटीवर टांगणे कितपत योग्य?    
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर भाजप वा संघाच्या मुखंडाकडून दिले जाणार नाही. याचे कारण अन्य कोणत्याही राजकीय पक्षाप्रमाणेच केवळ सत्ताकारण हेच भाजपचेही लक्ष्य असून ते साध्य करण्यासाठी मिळेल त्या आयुधांचा वापर करण्यास त्या पक्षास अन्य कोणत्याही पक्षाप्रमाणे कमीपणा वाटत नाही. मा. शहा यांच्या राजकीय कौशल्याबाबत कोणाचेही दुमत असावयाचे कारण नाही. गुजरातेतून काँग्रेस नेस्तनाबूत करून नरेंद्र मोदी यांची पकड मजबूत करण्याचे श्रेय हे शहा यांचेच. गुजरातेतील सहकार चळवळीवर काँग्रेसचा पगडा होता. २००२ साली नरेंद्र मोदी यांच्याकडे सरकारची सूत्रे आल्यानंतर या सहकार चळवळीतून त्यांनी काँग्रेसचे पद्धतशीरपणे उच्चाटन केले. यात त्यांना साथ लाभली ती शहा यांची. तेव्हापासून शहा आणि मोदी हे समीकरण अधिक दृढ झाले. त्याचमुळे पंतप्रधानपदाचा वेध घेण्याचे मोदी यांनी निश्चित केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम हाताशी धरले ते शहा यांना. मोदी यांच्या या हनुमानाने नरेंद्ररामास निराश केले नाही. उत्तर प्रदेशाचा ८० खासदारांना निवडणारा द्रोणागिरी पर्वत त्यांनी एकहाती मोदी यांच्यासमोर आणून सादर केला. शहा यांनी उत्तर प्रदेशात जे काही केले ते त्यांची राजकारणावरची पकड दर्शवते. परंतु त्यांना उत्तर प्रदेशात का जावे लागले, या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे आहे. काही गंभीर गुन्हय़ांच्या प्रकरणांत न्यायालयाने त्यांच्यावर गुजरात प्रवेशबंदी केल्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशात पाठवण्याची वेळ भाजपवर आली. गुजरातचे गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या मंत्र्यावर प्रवेशबंदी लादली जावी, हे काही खचितच भूषणास्पद म्हणता येणार नाही. अन्य सर्वसामान्य गुन्हेगारास अशा शिक्षेस सामोरे जावे लागले तर त्यास तडीपारी असे म्हणतात. या प्रकरणात शिक्षा झालेली व्यक्ती ही बडी राजकारणी असल्यामुळे प्रवेशबंदी म्हणायचे इतकेच.
या सर्व मुद्दय़ांवर दशांगुळे एक मुद्दा पुरून उरतो. तो म्हणजे भाजपचे झालेले मोदीकरण. नरेंद्र मोदी यांनी सर्व धोके आणि आव्हाने पत्करत भाजपला निवडणुकीत यश मिळवून दिले, ही बाब त्यांच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद म्हणावयास हवी. परंतु पक्ष म्हणून भाजपचे काय, हा प्रश्न उरतो. संजय जोशी यांच्यासारख्या साध्या प्रचारकाच्या नियुक्तीचा मुद्दा असेल किंवा ज्येष्ठ नेत्यांचे खातेवाटप. भाजप हा पूर्णपणे नरेंद्र मोदीशरण झाला असून या पक्षातील अन्य कोणत्याही नेत्यास मम म्हणत मोदी यांच्या हाताला हात लावण्याखेरीज काडीचीही किंमत राहिलेली नाही. विजयासारखे अन्य काही नसते, हे मान्य. पण म्हणून विजय मिळवून देणाऱ्याच्या पायाशी इतकी लोळण घेणे व्यक्तीपेक्षा व्यवस्था मोठी अशी शिकवण देणाऱ्या पक्षास शोभत नाही. हे असेच चालू राहिले तर भाजपचे नामांतर मोदी आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असेच करावे लागेल.