दुष्कृत्ये आणि/किंवा चुकीने होणाऱ्या घातक घटना रोखल्या गेल्या पाहिजेत. तसेच विधायक कार्यातही जाणाऱ्या खर्चापेक्षा मिळणारी सु-फले जास्त असली पाहिजेत. माणसाने सद्हेतूने व अचूक काम केले पाहिजे यात शंकाच नाही. त्यासाठी नीतिमत्ता सुधारावी लागेल. पण हे पुरेसे नसते. माणसांना मोह होतात व त्यांच्या हातून चुकाही होतात व तसे गृहीत धरूनच कार्यपद्धती व यंत्रणा (निर्वघ्नि-रीती) बसवाव्या लागतात.
सेफ्टी आणि सिक्युरिटी यात नेमका फरक काय आहे? खूप जवळच्या संकल्पना असतात तेव्हा नेमका फरक कमीत कमी शब्दांत सांगता येण्याने विचारशक्ती धारदार बनते. सेफ्टी आणि सिक्युरिटी या दोन्ही धोक्यांपासून वाचविणाऱ्या असतात, पण सेफ्टीतला धोका अहेतुक असतो तर सिक्युरिटीतला धोका सहेतुक असतो. सिक्युरिटीचे यांत्रिकीकरण होते तेव्हा सेफ्टीमधले उपाय सिक्युरिटीतही वापरले जातात. अलार्म वाजतात, दारे आपोआप चालू-बंद होतात व कॅमेरे घटना टिपतात. अशा युक्त्या व अशी चातुय्रे उदात्त जरी अजिबात नसली तरी आवश्यक नक्कीच असतात.
मॅनहोलचे झाकण चौकोनी ठेवले तर ते खोडसाळपणा म्हणून ‘आत’ टाकून देता येते, पण गोल झाकण आत पडू शकत नाही म्हणून झाकणे शक्यतो गोल असतात! अनेक रचनांमागे अशी अनपेक्षित आणि विचित्र कारणे असतात. साधारणत: कोणत्याही टूथपेस्टच्या टय़ूबचे बूच निमुळतेच (कोनिकल) असते. निदान समांतर दंडगोल नक्कीच नसते. याचे कारण वरीलप्रमाणेच तिरपागडे आहे. विशेषत: अर्धवट झोपेत असताना बूच हातून खाली पडण्याची शक्यता जास्त असते. जर बूच समांतर दंडगोल असते तर ते घरंगळत कुठेही कपाटाखाली वगरे गेले असते, पण निमुळते बूच छोटय़ा त्रिज्येत गोल गोल फिरत राहते, पण दूर जात नाही!
अग्निशामक यंत्रणा एखादी काच फोडून मग सुरू करता येते. उगीच येताजाता चाळा म्हणून सुरू केली जाऊ नये हा हेतू त्यातून साध्य होत असतो. गॅस शेगडीचा नॉब ज्योत कमी करण्याच्या बाजूला बंद न होता जास्तीत जास्त मोठी करून मग बंद होईल अशा दिशेला असतो. मंद ठेवायला जावे आणि बंद व्हावा हे टळते व पूर्ण बंद न होताच गळती चालू राहू नये हेही साध्य होते. बाटलीचे सील फोडलेले आहे की नाही हे स्पष्ट दिसलेही पाहिजे व चुकून तुटता कामा नये, पण तोडताना खूप ताकद लागू नये इतपतच कठीण बनवलेले असते.
रीती बसवताना स्खलनशीलता गृहीत
नुसत्या अधीरतेमुळेही अनावश्यकपणे घायकुतीला येऊन, लोक नेमका असा गोंधळ घालणार, की ज्याच्यामुळे सर्वानाच अधिक विलंब लागणार. रांगा लावण्यासाठी प्रवेशाचे मार्ग अरुंद व कुंपणासहित हवेत. टोलनाक्यावर जर एकेका लायनीसाठीचे डिव्हायडर कमी लांबीचे असले, तर ते सुरू होण्याच्या अलीकडच्या भागात एकेका मार्गासाठी डबल लायनी लागतात आणि चोंदाचोंद होते. हे तुम्ही कुठल्याही टोलनाक्यावर पाहू शकाल. याउलट एखाद्या सभागृहातून बाहेर पडायला जास्त दारे असायला हवीत. घबराट उडाली तर चेंगराचेंगरी टळेल. वेटिंग रूममध्ये प्रत्यक्ष रांग राखणे शक्य नसते, पण टोकन देऊन ठेवण्याने बरेच ताण व झगडे टळतात. ताटकळणे किंवा तिष्ठणे ही त्रासदायक गोष्ट आहे. लाल सिग्नलमुळे थांबलेल्यांना, जर त्या लाल दिव्यामध्ये घटत्या सेकंदांचा काऊंटडाऊन असला तर केवढा दिलासा मिळतो! अस्वस्थता, इंधन आणि प्रदूषण या तीनही बाबतीत बचत होते.  
इंजेक्शनची सुई उकळवून घ्यायला जास्त श्रम आणि निष्ठा लागते. सुयांच्या उत्पादनातील उत्पादकता भरपूर असल्याने आणि एड्सचा प्रसार होऊन जोखीममूल्य फार वाढल्याने, आता ‘एक-वापर-सुई’ व ती पेशंटसमोर तोडून टाकणे ही ‘रीती’ रुळली आहे. त्यातसुद्धा ‘नीती’चा भाग आहेच. सीलबंद पॅकिंग फोडले जाते आहे ना? हे स्वत:साठी बघायचे आणि सुई मोडली जातीय की नाही हे, नंतरच्या पेशंटसाठी आवर्जून बघायचे. यात सिस्टर किंवा लॅब असिस्टंट यांना अप्रामाणिक लेखण्याचा मुद्दा नाही. व्यवस्था व्यक्तिनिरपेक्ष राखायची हे एक सार्वकि कर्तव्य आपण करीत आहोत. मटेरिअल कॉस्ट पाहता, ही रीती अपव्ययकारक म्हणता आली असती, पण कॉस्ट घटल्याने व या रीतीने जी खात्रीलायकता लाभते तिचे मूल्य लक्षात घेता, हा व्यय आता ‘अप’ राहिलेला नाही.
खव्याच्या गोळ्यासाठी भांडणारी मांजरे जेव्हा माकडाच्या हाती तराजू देतात तेव्हा सगळा खवा माकडच खाऊन टाकते. पेरू नेमका अर्धाअर्धा कसा कापणार यावर भांडत असलेल्या मुलांना एकीकडे ‘दुसऱ्याला किंचित जास्त गेला तर तुझे एवढे काय रे श्याम!’ ही शिकवण दिलीच पाहिजे. पण, ‘एक जण पेरू कापेल, पण कोणता भाग घ्यायचा हे मात्र दुसरा ठरवेल’ अशी व्यवस्था बसवून देण्याचे शहाणपणही ‘आईला’ सुचले पाहिजे. कारण अशा व्यवस्थेत, व्यक्तीमधील कृपणवृत्ती तशीच राहिली तरीही, किंबहुना कृपणवृत्ती असल्यानेच, कापणारी व्यक्ती (दुसरा घेईल या भीतीने) लक्षात येण्याइतका मोठा अर्धुक कापणारच नाही व प्रश्न सुटेल.
नदीच्या काठी रासायनिक कारखाना मंजूर करताना कारखान्याने आपली उर्वरके (अफ्ल्युअंट्स) निरुपद्रवी बनवून मगच नदीत सोडावीत, या दृष्टीने बऱ्याच गुंतागुंतीच्या अटी घातल्या जातात. खरे तर एकच साधी अट पुरेशी आहे. ‘कारखान्याने पाणी घेताना नदीच्या खालच्या बाजूने घ्यावे व सोडताना ते वरच्या बाजूला सोडावे!’ कारखान्याच्या स्वार्थरूपी तंगडय़ा, कारखान्याच्याच गळ्यात अडकवण्याची ही चतुराई, म्हणजेच रीतीच्या अंगाने सुधारणा करणे आहे.
सत्प्रवृत्ती पुरेशी नसते
स्वार्थ एकमेकाशी जुळणारे नसू शकतात याचा अर्थ, अन्यार्थ हे आपोआपच एकमेकाशी जुळू शकतात, असा होत नाही. सगळेच वाहनचालक घुसू पाहणारे असले की ट्रॅफिक जाम होतो. तिथे सिग्नल, पोलीस, ओव्हरब्रिज असे काही तरी आवश्यक ठरते. पण सगळेच वाहनचालक जर, ‘पहले आप, पहले आप’ करत थांबून राहिले तरीही ट्रॅफिक जामच होईल!  
अर्थात असे प्रत्यक्षात कधी होणार नाही हा भाग निराळा.
इतरांच्या हिताची तळमळ असली, म्हणजे इतरांचे हित कशात आहे याची समज असेल, असे नाही आणि ते कसे साधायचे याचा मार्ग माहीत असेल, असे तर अजिबातच नाही. चुकीचे ज्ञान असेल तर उफराटा उपाय केला जाऊ शकतो. समजा एखादे ओझे हलविण्यासाठी बरेच जण रेटा लावत आहेत, पण जर त्यांच्या दिशा दिग्गजांप्रमाणे (दिशांचे कल्पित हत्ती) आठ असल्या तर परिणामी बल शून्यच येणार. आपण थोर व्यक्तींना दिग्गज म्हणतो, पण दिग्गजांची तोंडे कधीच एकमेकांकडे असू शकत नाहीत हे विसरतो! एखाद्या बाबतीत जबर नपुण्य असलेल्या व्यक्तींना पूज्य बनवून, त्यांना सुतराम काही कळत नाही अशा विषयातही, त्यांचे मत मानणे वा त्यांना राज्यसभेवर पाठवणे टाळले पाहिजे.
सद्हेतूमधील अभिप्रेत परिणाम आणि प्रत्यक्ष कृतीने होणारा परिणाम हे अगदी भिन्न असू शकतात. एका स्वयंसेवी संस्थेने, शाळेतून मुले काढून घेतली जाऊ नयेत व कामाला जुंपली जाऊ नयेत, यासाठी पालकांना पूरक उद्योग सुरू करून द्यायचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी संस्थेने ड्रॉपआऊट मुलांच्या पालकांना शेळ्या, कोंबडय़ा वगरे द्यायला सुरुवात केली. मूल शाळेत नसलेल्यांनाच मदत मिळतेय हे पाहून इतर पालकांनीही आपली मुले शाळेतून काढून घेतली!
एका प्रगत देशातील पाळणाघरात, पालक मुलांना न्यायला यायला उशीर लावतात व कर्मचाऱ्यांना जास्त वेळ थांबावे लागते, असा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून पाळणाघराने उशिरा येणाऱ्या पालकांना दंड ठेवला. यामुळे उशिरा येण्याचे प्रमाण घटेल अशी अपेक्षा होती; पण झाले भलतेच. गोष्ट अशी होती की उशीर झालेल्या पालकांना कानकोंडे (एम्बरॅस्ड) वा अपराधी (गिल्टी) वाटत असे. दंड भरला की आपण ‘परतफेड’ केलीच आहे असे वाटून पालक निर्धास्तपणे व मनमोकळेपणे अधिकच उशीर करू लागले.
आपल्याला उत्पन्न ज्या कोणाकडून मिळते त्या एजन्सीने स्रोतापाशी आयकर कापून भरावा ही, म्हणजे टीडीएसची तरतूद केल्यामुळे, त्याचा रिफंड मिळावा यासाठी करजाळ्यातून बाहेर असलेले अनेक लोक आत आले. करांचे दर कमी ठेवले, तर ते भरण्याकडे कल वाढून, सरकारचा महसूल वाढतो हीसुद्धा रीतिप्रधान युक्ती आहे.   सद्हेतूला अवांच्छित दुष्परिणाम (औषधाला अ‍ॅलर्जकि रिअ‍ॅक्शन) असतात. काही वेळा तर दुर्हेतूला अवांच्छित सुपरिणामही असतात. उदा. ‘युद्धखोर’ क्रुज मिसाइल विकसित करण्याच्या निमित्ताने ‘फीड-बॅक लूप’ ही एक महत्त्वाची रचना सापडली. नतिकदृष्टय़ा सद्हेतूंचे महत्त्व आहेच. ते नाकारण्याचा प्रश्नच नाही. त्याच वेळी व्यवस्था बसविताना परिणाम काय हाती लागतात ते दुर्लक्षित करून चालत नाही. विशेषत: एखाद्याच्या दुष्कृत्यापायी किंवा चुकीपायी बऱ्याच लोकांची बरीच हानी होण्याची संभाव्यता असते तेव्हा तर रीती अभेद्य असण्याला फारच महत्त्व येते. एकुणातच नीतिशास्त्राला रीतिशास्त्राची पूरक जोड द्यावी लागते हेच खरे.
*  लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com