‘लंडन, समरकंद, बगदाद, लाहोर, दिल्ली वा वाराणसी ही नावे ऐकल्यावर ज्याच्या हृदयात खळबळ माजत नाही तो प्रवासी नाही’, असे सॉमरसेट मॉमने लिहिले आहे. मानवी संस्कृतीच्या जन्मापासून ही शहरे आहेत असे वाटते. अशी काही मोजकी शहरे सोडली, तर इतर शहरांच्या नशिबी ही ऐट नसते. एखादे नाटय़गृह, चारदोन नाचगाणी करणाऱ्या व मिरवणुका काढणाऱ्या संस्था व एखादा प्रदर्शनासाठीचा हॉल या ऐवजावर सांस्कृतिक राजधानीचा दर्जा एखाद्या गावाला द्यायला आपण आतुर असतो. साहेबाचे आगमन भारतात झाले तशी मुंबईसारख्या पोटार्थी शहरांची निर्मिती झाली. त्याचबरोबर रोजच्या धावपळीपासून स्वत:ला दूर नेण्यासाठी म्हणून साहेबाने काही गावे वसवली जी स्वत:ला ‘हिल स्टेशन’ म्हणवून घेऊ लागली. भारतातल्या अशा सगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या गावांच्या व शहरांमध्ये या गावांचे एक वेगळे स्थान आहे. काही गावे प्रेमात पडावी इतकी टुमदार व छान आहेत. व्हिरजील व स्टेफनी मीडिमा या अमेरिकन पितापुत्रींनी गढवाल हिमालयाच्या पोटात वसलेल्या मसुरी हिल स्टेशनच्या प्रेमात पडून त्याचा छोटासा असलेला इतिहास ‘मसुरी अ‍ॅण्ड लॅन्डोर : फुटप्रिन्टस् ऑफ द पास्ट’ या पुस्तकात लिहिला आहे.
डेहराडूनपासून २१ किमीवर सर्पिलाकार रस्त्याने वर चढत गेले की मसुरी आहे. हिमालयातील सगळी हिल स्टेशन्स जशी असतात तसेच ते आहे. माल रोड आहे, रोप वे आहे, काही तासांत जाकिटे शिवून देणाऱ्या शिंप्यांची दुकाने आहेत. केम्प्टी फॉल्स या धबधब्याच्या ठिकाणी ‘Rooms are available for short purpose’ असा  बोर्डदेखील आहे. सुटय़ांच्या दिवसांत पिपाण्या, गॅसचे फुगे, चटपटीत खाणे विकणारे फेरीवाले, मधुचंद्राला आलेली जोडपी व दिल्लीहून येणाऱ्या गुबगुबीत पंजाबी लोकांनी ते गजबजून जाते. एके काळी भारताचा चीफ सव्‍‌र्हेअर असलेल्या जॉर्ज एव्हरेस्टचे घर अजून तेथे आहे याचा कुणाला पत्ताही नसतो. लेखकद्वयीला ते घर व ऑफिस पाहण्यासाठी मसुरीसारख्या लहान गावात खूप चौकशी करावी लागली. लॅन्डोर तर आता मसुरीमध्येच सामावले आहे.
१८१४ साली वॉरन हेस्टिंगच्या धोरणानुसार छोटी छोटी राज्ये कंपनी खालसा करत चालली होती. त्या वेळी डेहराडून व त्याच्या परिसरात असलेले अमरसिंग थापा या नेपाळी राजाचे राज्य तिसऱ्या प्रयत्नात खालसा केले गेले. गुरख्यांच्या लढण्याच्या कौशल्याची ओळख ब्रिटिशांना यात पहिल्यांदा झाली. १८१५ साली ३००० गुरख्यांची पहिली तुकडी कंपनी सैन्यात कोलोनल फेड्रिक यंग या आयरीश तरुणाच्या अधिकारात स्थापन झाली. या सर्व इतिहासाचा मसुरीच्या इतिहासाशी संबंध नाही; पण या फेड्रिक यंगच्या शौर्याचे व कौशल्याचे वर्णन करण्यात लेखकाने बराच मजकूर वाया घालवला आहे. हा तरुण आज ज्याला मसुरी म्हटले जाते त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने त्या ठिकाणी शिकारीच्या वेळी विश्रांतीसाठी म्हणून एक खोपटे बांधले. मसुरी शोधणारा व वसवणारा म्हणून लेखकाने यंगचे नाव घेतले आहे.
मीरत हे मसुरीपासूनचे सर्वात जवळचे मोठे ठाणे होते. मध्ये सहारणपूर हे मोठे गाव आहे. मीरत-सहारणपूर अंतर ११७ किमीचे. ते पालखीने पार पाडण्यासाठी ३६ तास लागत. नंतर दिल्ली-सहारणपूर रेल्वे झाली. सहारणपूरपासून डूनपर्यंत घोडागाडी व नंतर मसुरीचा चढ चढण्यासाठी पालखी करावी लागे. ती आधी रिझव्‍‌र्ह करावी लागे. पालखीने दिवसा गेले तर दिसणारे दृश्य फार मनोहर असे असले तरी लेखकाने अत्यंत साधारण तपशील दिला आहे.
१८२३मध्ये मसुरीत केवळ एक घर होते. ब्रिटिशांचे जसे जाणे-येणे वाढले तसे ही संख्या वाढली. १८२८ मध्ये ५०० व १९०० साली ४२७८ घरे तेथे होती. १४,६४९ लोकांपैकी ३४१८ युरोपियन कायमस्वरूपी तेथे राहत. उन्हाळ्यात संस्थानिक राजे-महाराजेही तेथे जाऊन राहू लागले. आधी त्यांचे नोकर येत व त्यांच्या व्यवस्था लावत. नंतर त्यांच्या खास रेल्वे गाडय़ांतून महाराण्या येत. त्यांच्याबरोबर सामान, कुत्रे व घोडे असत. ज्यांना वाढते तापमान सहन होत नसे असे परदेशातून आणलेले नाजूक पक्षीही असत. फोर्डची मॉडेल टी वपर्यंत यायला १९२० साल उजाडले. पुढे शाळा, चर्च, पोस्ट, बँका, टेलिफोन या सोयी कधी आल्या याची माहिती लेखक देतो. मसुरीतील शाळा व चर्चेसवर भली मोठी प्रकरणे आहेत. अनेक तरुण इंग्लिश स्त्रियांचा मुक्काम उन्हाळ्यात येथे असे. त्यांचे नवरे मात्र उन्हातान्हात खाली सपाटीवर आपल्या डय़ुटीवर असत. लॉवेल थॉमसने लिहिले आहे- ‘मसुरीमध्ये एक हॉटेल आहे- ज्यात पहाटे घंटा होते. त्यासरशी श्रद्धाळू प्रार्थनेला बाहेर पडतात, तर अश्रद्धाळू आपापल्या पलंगांवर जातात.’
मसुरीतल्या हॉटेल्स व क्लब्जबद्दल यात माहिती आली आहे. तेथला आद्य क्लब म्हणजे हिमालयीन क्लब, जो युरोपियन जनांसाठीच असे. भारतीयांनाच नव्हे, तर युरोपियन स्त्रियांनादेखील तेथे मज्जाव होता. सब्हाय हे तारांकित हॉटेल १९०२ ला सुरू झाले. दोन्ही युद्धांच्या काळात ते भरपूर चाले. तेही फक्त युरोपियन लोकांसाठी होते. ‘डॉग्ज अ‍ॅण्ड इंडियन्स नॉट अलाऊड’ची पाटी त्या ठिकाणी असताना मोतीलाल नेहरू मसुरीत आले, की मुद्दाम या हॉटेलात रोज जात व बिलाबरोबर ऐटीत दंड भरत. लेखकाला हे माहीत नसावे.
या पुस्तकातले त्यातल्या त्यात वाचण्यासारखे प्रकरण म्हणजे शेवटचे- ज्यात जॉर्ज एव्हरेस्टबद्दल लिहिले आहे. साहेबाच्या हातात अजून पूर्ण भारत आला नव्हता, त्याच वेळी त्याच्या मनात आले, हा सर्व प्रदेश मोजला पाहिजे. १७९९ साली सुरू झालेला ट्रिग्नॉमेट्रिक सव्‍‌र्हेचा हा प्रयोग मद्रास, बंगलोर, कन्याकुमारी असे करत १८३२ ला मसुरीला पोहोचला. कलकत्त्यावरून मसुरीला पोहोचायलाच पाच महिने लागले. त्यासाठीची उपकरणे व ती वाहण्यासाठी घोडे हे सर्व बोटीत कलकत्त्याला चढवण्यात आले. तेथून गंगेतून ते हरिद्वापर्यंत बोटीने आणून मसुरीला वर चढवण्यात आले. नुकत्याच चीफ सव्‍‌र्हेअर झालेल्या जॉर्ज एव्हरेस्टने मसुरीच्या एका कडय़ापाशी आपले ऑफिस थाटले. १८३२ ते १८४३ हे दशक एव्हरेस्टचे दशक म्हणून ओळखले जाते. हिमालयातल्या अनेक शिखरांची माहिती त्याने गोळा केली. १८४३ ला एव्हरेस्ट रिटायर होऊन परत इंग्लंडला गेला. ज्या शिखराला एव्हरेस्टचे नाव दिले त्या शिखराची उंची मात्र राधानाथ शिखधर या सव्‍‌र्हेयरच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या गणितज्ञाने १८५६ साली निश्चित केली. सर्वोच्च शिखराला एव्हरेस्टचे नाव अतिशय सार्थ आहे; पण राधानाथ शिखधरांचा उल्लेखही यायला हरकत नव्हती. भारताच्या या मोजमापांसाठी थिओडोलाइट नावाचे अवजड उपकरण यासाठी वापरण्यात आले. ते आजही डेहराडूनला हलवलेल्या सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या ऑफिसात आहे.
मसुरीचा इतिहास या विषयाचा मुळातच जीव छोटा आहे. रस्किन बॉण्डच्या बहारदार पुस्तकांतून हा परिसर आपल्याला जास्त उलगडतो. पुस्तकाची जाडी वाढवण्याच्या नादात अनेकदा विषयांतर झालेले आहे आणि अवांतर माहितीही आली आहे. पुस्तकात तत्कालीन छायाचित्रांची संख्या भरपूर आहे; पण त्यांच्या छपाईचा दर्जा यथातथाच आहे. पुस्तक वाचून आपल्याला मसुरीसंबंधी कुतूहल, प्रेम काहीही निर्माण होत नाही. खरे तर हा विषय कॉफी टेबल बुक या प्रकारातल्या पुस्तकाचा आहे, ज्यात पाहणे जास्त व वाचणे कमी असा प्रकार असतो. हे पुस्तक जर कॉफी टेबल बुक म्हणून छापले असते तर हॉटेल सव्‍‌र्हायच्या लॉबीतल्या एखाद्या टेबलापाशी बसून कॉफी पिताना समोरच्या डून व्हॅलीकडे मधूनमधून पाहत या पुस्तकांची पाने उलटायला कोणालाही आवडले असते.
मसुरी अ‍ॅण्ड लॅन्डोर – फुटप्रिन्टस् ऑफ द पास्ट :
व्हिरजील मीडिमा, स्टेफनी स्पेड मीडिमा
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली
पाने : ३५२, किंमत : ५०० रुपये.