व्हॉट्सअॅप, ट्विटर या माध्यमांवरली झटपट इंग्रजी भाषा वापरून ही कादंबरी लिहिण्यात आली आहे.. कथा चटपटीत, पण नेहमीची.. मात्र या कथेला आजच्या काळातल्या संवादभाषेचं रूप असल्यामुळे ती ‘चॅट’पटीत नक्कीच झाली आहे..

माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आलेल्या उपकरणांनी जगातील संवाद वाढवला. मोबाइल/  स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअॅप, एसएमएस यांच्या वापरातून जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या व्यक्तीशी क्षणार्धात संभाषण करणे शक्य झाले आहे. संवादाची ही प्रक्रिया जितकी जलद झाली तितक्याच वेगाने त्या संवादाची इंग्लिश भाषाही बदलत गेली. Good morning चे gm आणि oh my god चे OMG आणि thank you चे thx बनले. झटपट संवादाचा वेग ढळू नये म्हणून इंग्रजीतील शब्द आक्रसावले गेले, वाक्ये इतकी आखूड बनली की त्यांत क्रियापदेच असेनात, शब्दांची चिन्हे बनली आणि या सर्वातून नवीन इंग्लिश अस्तित्वात आली. तरुण पिढीतल्या संवादाची ही भाषा अलीकडच्या काळात आलेल्या पुस्तकांतूनही डोकावू लागली आहे. पण अभिनेता आर्य  बब्बरने अख्खं पुस्तकच या भाषेत लिहून काढलं आहे. आर्यचं ‘माय फियान्सी, मी अॅण्ड   #ifu**edupl हे पुस्तक तरुण पिढीतल्या नात्यांची गुंतागुंत, तारुण्यसुलभ आकर्षण आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या साऱ्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ तरुणांच्या झटपट संवादशैलीतच भाष्य करतं.
‘माय फियान्सी, मी अॅण्ड..’ ही एका उच्चभ्रू गुजराती कुटुंबातील रिषभ शहा  (ऋ षभ नव्हे-  हा गुजरातीतला ‘रि’षभच!) नावाच्या तरुणाची कथा आहे. रिषभ हा एका नामांकित आणि अतिश्रीमंत अश हिरे व्यापाऱ्याचा एकुलता एक मुलगा आहे. पण लहानपणापासूनच आत्मविश्वास आणि निर्णयक्षमतेचा अभाव असलेल्या रिषभला आयुष्याच्या प्रत्येक पावलावर प्रश्नांचे जंजाळ डिवचत असते. आसपासच्या प्रत्येक माणसासाठी टिंगलीचा विषय असलेल्या रिषभला त्याची बालपणीची मैत्रीण मेहेक तरुणपणी भेटते, ती एक सुंदर प्रेयसी म्हणून! याबद्दल नशिबाला धन्यवाद देणारा रिषभ मेहेकला लग्नाची मागणी घालण्याची तयारीही करत असतो. पण त्याच काळात डॉली नावाची तरुणी त्याच्या संपर्कात येते. नकळत रिषभही तिच्याकडे आकृष्ट होतो. या सगळ्यांतून एक नवीनच गुंता तयार होतो. रिषभचा मित्र मुकुल, त्याचे वडील, त्यांची (रिषभच्या वयाची) गर्लफ्रेंड, घटस्फोटिता आई हे सर्वजण हा गुंता आणखीच जटिल करतात, अशी गमतीदार गुंतागुंत या कथानकात आहे. मुंबई, थायलंड, मुंबई, गोवा असा प्रवास करणारी ही कथा वाचकांना खिळवून ठेवते. रिषभच्या मनातल्या संभ्रमावस्थेची कीव वाटण्याऐवजी गंमत वाटावी, अशा प्रकारे त्याचं व्यक्तिमत्त्व इथे चित्रित झालं आहे.
 त्याच्या आणि मेहेकच्या घरातले लोक खऱ्याखुऱ्या गुजराती कुटुंबातील वाटण्यापेक्षा टीव्ही मालिकेतील गुजराती कुटुंबासारखे नाटकी आणि अर्कचित्रासारखे- कॅरिकेचरिश- वाटतात. पण आर्यने ती पात्रे मुद्दामच तशी रंगवली असावी, असं जाणवतं. रिषभला नेहमी उलटे आणि ‘वाकडय़ा वळणाचे’ सल्ले देणारा त्याचा मित्र मुकुल, त्याच्या वडिलांची गर्लफ्रेंड तसेच रिषभची नवी मैत्रीण डॉली ही पात्रं या कथेतला मसाला वाढवतात. त्यामुळे ‘माय फियान्सी, मी अॅण्ड..’ शेवटपर्यंत वाचकांना सोडवत नाही.
या पुस्तकाची कथा निराळी नाही. आजवर अनेक चित्रपटांतून, कादंबऱ्यांतून, नाटकांतून अशी गमतीदार प्रेमकथा पाहायला मिळाली आहे. ‘माय फियान्सी, मी अॅण्ड..’चं वैशिष्टय़ ते नाहीच. या पुस्तकाचे प्राण त्याची मांडणी आणि भाषा- म्हणजे भाषेची लघुरूपे- यांच्यात सामावले आहेत. पैसा, प्रसिद्धी, प्रेयसी अशा सर्व गोष्टी असताना आयुष्याचा गुंता करून ठेवणाऱ्या तरुणाची ही कथा आर्य बब्बरने तरुणाईच्याच ‘झटपट इंग्लिश’मध्ये मांडली आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर किंवा फेसबुकवरून एखादय़ाशी संवाद साधताना वेळ आणि टायपिंगची कटकट वाचावी म्हणून आपण शब्दांचे जे शॉर्टकट वापरतो, तशा शॉर्टकटचाच वापर करून आर्यने अख्खं पुस्तक लिहिलं आहे. हे करताना शिव्या किंवा असभ्य शब्द वापरण्यापासूनही तो कचरत नाही. पुस्तकाच्या शीर्षकातूनच आपल्याला ती गोष्ट लक्षात येते. या पुस्तकाचे मुखपृष्ठही एखाद्या मोबाइलच्या स्क्रीनसारखंच बनवण्यात आलं आहे.
या कादंबरीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तिची मांडणी. संपूर्ण पुस्तकाच्या सुरुवातीची काही पाने वगळता अन्यत्र कोठेही कथा निवेदकाची (नॅरेटर किंवा प्रोटॅगनिस्ट) गरज पडत नाही. खरं तर कादंबरीचा नायक असलेला रिषभ हाच या पुस्तकाचा निवेदक आहे. पण पुढे तो ‘मी असं केलं, तो हे बोलला, त्याचं काय झालं’ अशा भाषेत बोलत नाही. त्यावेळी कथेची पटकथा बनते. ती पात्रे स्वतच आपले संवाद बोलतात. तेथे लेखक किंवा कथाकार अजिबात ढवळाढवळ करत नाहीत. ज्या प्रसंगांत कथाकार असलेला नायक स्वत: हजर नाही, त्या वेळी नाटय़लेखक जसे कंसातल्या सूचना देतात, तशा प्रकारचं धावतं निवेदन लेखकानं वापरलं आहे, पण त्याला तो ‘ऑटो रायटर मोड’ असं म्हणतो. चॅट-संवादांमधून जी कहाणी पुढे सरकणारच असते, ती पुढे सरकली एवढंच सांगण्याचं काम हे निवेदन करतं, म्हणून त्याला म्हणायचं ‘ऑटो रायटर मोड.’ वळण नसलेल्या रस्त्यावर गाडी ‘ऑटो पायलट मोड’वर असावी, तसंच हे! वळणं आहेत, ती संवादांमधूनच. त्यामुळेच, ही कादंबरी वाचताना व्हॉट्सअॅपच्या एखाद्या ग्रूपवरील अन्य लोकांचे संवाद वाचत असल्यासारखं वाटत राहातं.
आर्यने संपूर्ण कादंबरीची रचना अनोख्या स्वरूपात केली आहे. हे पुस्तक अजून वाचकप्रिय झालं नसलं तरी पुस्तकांशी संबंधित विविध ब्लॉग्ज किंवा वेबसाइटवर त्याची चर्चा सुरू झाली आहे. कादंबरीतील झटपट इंग्लिशचा वापर हाच चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. अशा इंग्लिशमुळे तरुण वाचकांची भाषा अधिक भ्रष्ट होईल, असा गळा काढत अनेकांनी ‘माय फियान्सी, मी अॅण्ड..’वर टीकेचा सूर लावला आहे. पण आर्यने कथेच्या मूळ भावनेशी स्पष्ट प्रामाणिकपणा दाखवत पुस्तकाची मांडणी केली आहे. एव्हाना ट्विटर, फेसबुकने ‘कमी शब्दांत भरपूर आशय’ मांडण्याची सवय आपल्याला लावलीच आहे. ट्विटरच्या १४० शब्दांच्या चौकटीत राहून नेते, खेळाडू, अभिनेते आदींनी केलेल्या वक्तव्यांमधून वृत्तपत्रांना ‘मोठी बातमी’ मिळू लागलेली आहे.
‘व्हॉट्सअॅप’ किंवा ‘ट्विटर’च्या भाषेत, शैलीत आणि चौकटीत मावणाऱ्या अनेक कादंबऱ्या त्यावरून प्रसिद्ध झाल्या आहेत. अगदी हॅम्लेटपासून शेरलॉक होम्सपर्यंत आणि महाभारतापासून लघुकथांपर्यंतचे साहित्य ट्विटरवरून प्रसिद्ध झालं आहे आणि त्याचं स्वागतही झालं आहे. त्यामुळे आर्य बब्बरचं ‘माय फियान्सी, मी अॅण्ड..’ हे सध्याच्या तरुण पिढीच्याच भाषेतली साहित्यकृती ठरेल.  मोठय़ांना- किंवा ती भाषा न वापरणाऱ्यांना- ही अजिबात आवडणार नाही. पण उद्या याच शैलीत आणखी पुस्तकं येत राहिली तर, शब्द समजण्यासाठी म्हणून तरी आर्यचं पुस्तक वाचायला हवंच!

*माय फियान्सी, मी अ‍ॅण्ड #ifu**edup
लेखक : आर्य बब्बर
प्रकाशक : पेंग्विन मेट्रो रीड्स
पृष्ठे :  २६१, किंमत : २५० रु.