निष्ठावंतापेक्षा पोटची पोरेच अधिक प्रिय हा संदेश जसा कै. ठाकरे यांच्याकडून राणे यांना मिळाला, तसाच राणे यांच्याकडूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळाला. अशा स्थितीत बंडाची धमकी आणि कृती यांत थेट संबंध न दिसल्यास ती देणाऱ्याच्या ताकदीचा ऱ्हास होऊ लागतो, हे राणे यांनी ओळखायला हवे होते..

ऑक्टोबरच्या यशाचे पेढे वाटायचे नसतात. हे नारायण राणे यांना ठाऊक नसावे. त्यामुळेच त्यांनी दुसऱ्यांदा दिलेल्या राजीनामा धमकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर एक साधा ओरखडाही उमटला नाही. काँग्रेसने तर त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखेच केले. आपण धमकी दिल्यावर आपल्या नाकदुऱ्या काढल्या जातील आणि राज्यात नेतृत्वबदल होईल असा राणे यांचा समज असावा. त्यातले काहीही काही अंशानेदेखील घडले नाही. याचे कारण ही त्यांची दुसरी धमकी. ऑक्टोबरच्या परीक्षेसारखी. नऊ वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये आल्या आल्या आपल्याला मुख्यमंत्रिपदी नेमले जाईल, अशी त्यांची अटकळ होती. ते त्या वेळीही होणार नव्हते. काही वर्षे थांबल्यावर, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पायउतार व्हावे लागल्यानंतरही आपली वर्णी लागत नाही, हे पाहून राणे यांनी आगपाखड केली. त्या वेळी राणे यांचा आव असा होता की त्यांनी काँग्रेसचा त्याग केलाच. त्या वेळी त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींबाबतही अद्वातद्वा भाष्य केले होते. एवढे करूनही काही झाले नाही. श्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि तापलेले राणे शांत होतील अशीच व्यवस्था केली. तेथेच राणे यांचे चुकले. ही त्यांची पहिली चूक. ज्या पक्षावर, पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी यथेच्छ टीका केली त्याच पक्षात त्याच नेतृत्वाखाली राणे यांना मुकाट मंत्रिपदी राहावे लागले. आपल्या आवेशास जागून राणे खरोखरच काँग्रेसमधून बाहेर पडले असते तर आता जी काही त्यांची केविलवाणी अवस्था झालेली आहे, ती तितकी झाली नसती. पण ती हिंमत राणे यांच्यात नव्हती. याचे कारण सत्ताकारणाची लागलेली सवय. त्यांना स्वत:साठी सत्तेची गरज होतीच. परंतु त्याचप्रमाणे आपल्या दोन सुपुत्रांच्या राजकीय सुरक्षेसाठीही सत्तेच्या पारंब्यांस लोंबकळत राहणे त्यांना आवश्यक होते. अशा गरजा वाढल्या की ‘स्वाभिमान’ सोडावा लागतो. राणे यांना तेच करावे लागले आणि जी काही उरलीसुरली आयाळ होती ती पक्षांतर्गत भादरली जाणे स्वत:च्या डोळ्यादेखत पाहावे लागले. ही घसरण येथेच थांबत नाही. राणे यांना केवळ आपले अधिकारच वाहून जाताना पाहावे लागले असे नाही. तर त्यांचे एकेकाळचे डावेउजवे हातदेखील त्यांना सोडून गेले. सत्तावृक्षाचे खोड मजबूत असले तरच पारंब्यांना लोंबकळणारे अनेक मिळतात. ते तसे होते तोपर्यंत राणे यांच्या आसपास घोंघावणारे अनेक होते. परंतु राणे यांच्या मूळ खोडालाच सत्तारस मिळेनासा झाल्यामुळे कोकणापासून ते ठाण्यापर्यंत अनेक जणांनी राणे यांच्यापासून फारकत घेणेच पसंत केले.
हे असे होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे राणे यांचे चिरंजीव. मुळात काँग्रेसमध्येच राणे यांचा जम बसलेला नसताना जी काही ताकद त्यांनी जमा केली ती त्यांनी आपल्या मुलांच्याच अंगणात वळवली. हा त्यांनी निष्ठावानांवर केलेला अन्याय होता. त्यामुळे राणे यांचे निष्ठावान म्हणून जे कोणी होते, त्यांना काही मिळेना. तेव्हा राणे यांना निष्ठावानांच्या घटस्फोटांस तोंड द्यावे लागत असेल तर ते राजकीय रहाटगाडग्याचा अविभाज्य भाग म्हणावयास हवे. शेवटी जे उगवते ते आधी पेरलेलेच असते. ही पेरणी राणे यांनी शिवसेनेच्या त्यागापासूनच केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून ज्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यावर शिक्कामोर्तब झाले तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न राणे यांनी सातत्याने केला. परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांने गाळलेल्या घामापेक्षा घराण्याचे रक्तसंबंध अधिक मजबूत असतात हे कै. ठाकरे यांनी राणे यांना दाखवून दिले. जे ठाकरे यांनी राणे यांच्याबाबत केले तेच राणे यांनी आपल्याशी प्रामाणिक कार्यकर्त्यांबाबत केले आहे. तेव्हा आपले हे कार्यकर्ते सोडून गेले म्हणून राणे यांना दु:ख होण्याचे काहीच कारण नाही. वास्तविक आपल्याबाबत जे काही घडले ते आपल्या जवळच्यांबाबत घडणार नाही, यासाठी राणे यांनी दक्षता घेणे अपेक्षित होते. ती त्यांनी घेतली नाही. आपल्याला निष्ठावंतापेक्षा पोटची पोरेच अधिक प्रिय हा संदेश जसा कै. ठाकरे यांच्याकडून राणे यांना मिळाला, तसाच राणे यांच्याकडूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळाला. तेव्हा काँग्रेसमध्ये राणे एकाकी पडले असतील तर नवल नव्हे.
राणे यांचे हे राजकीय एकाकीपण आता कोणत्या पक्षात जाऊनही संपणार नाही. कारण त्यांचा संघर्ष हा कोणत्याही तत्त्वासाठी नाही. मी आणि माझी मुले यांचीच काय ती चिंता त्यांना आहे. हे जसे आसपासच्या राजकारण्यांनी ओळखले तसेच ते कोकणच्या मतदारांनीही जवळून पाहिले. म्हणूनच ताज्या लोकसभा निवडणुकीत राणेपुत्रास दारुण पराभव पत्करावा लागला. आपण स्वत:स जितके कार्यक्षम वाटतो तितके इतरांना वाटत नाही आणि आपली मुले आपल्याला वाटतात तेवढी राजकीयदृष्टय़ा कर्तबगार आहेत हे जनता मानत नाही, असे राजकारण्यांच्या बाबत घडते. असे होते तेव्हा त्यांचा पराभव अटळ असतो. यातील स्वपुत्रांबाबत कै. इंदिरा गांधी यांच्यापासून ते कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत असेच घडत आले आहे. तेव्हा यापुढे जाऊन राणे यांनी स्वतंत्र पक्ष जरी काढला तरी त्याचेही यापेक्षा वेगळे काही होणार नाही. कारण जनसामान्यांना जो विश्वास द्यावा लागतो, तो राणे यांनी वेळीच दिलेला नाही. आता कदाचित त्यासाठी उशीर झाला असावा. आसपास कायम स्तुतिपाठकांच्या गराडय़ात आनंद मानणाऱ्या राणे यांना जुलमाचा रामराम आणि आदराचे अभिवादन यातील फरकही कळेनासा झाला. त्यामुळे त्यांची ही अवस्था आली. राणे या वेळी काँग्रेस जरी सोडून गेले तरी त्या पक्षाचे एका पैचेही नुकसान होणार नाही. याचे कारण काँग्रेसकडे आता गमावण्यासारखे नाही आणि जे गमवावयाचे आहे ते कमावून देण्याची ताकद असलेला एकही नेता त्या पक्षाकडे नाही. स्वत:स व्यवस्थेपेक्षा मोठे मानून जे व्यवस्थेलाच आव्हान देऊ पाहतात त्यांच्या माथी पराभवच लिहिलेला असतो. पक्षाला आव्हान देऊ पाहणारे राणे हे काही पहिले आणि शेवटचे नाहीत आणि हे काँग्रेसच्याच बाबत होते असेही नाही. विद्याचरण शुक्ल, कल्याणसिंग, उमा भारती, शंकरसिंह वाघेला इतकेच काय महाराष्ट्रापुरते पाहावयाचे झाल्यास कै. यशवंतराव चव्हाण, कै. विलासराव देशमुख अशा अनेकांनी पक्षत्याग करून स्वत:चे वेगळे राजकीय दिवे लावायचा प्रयत्न केला. त्यांचे काहीही झाले नाही. या सर्वाना नाक मुठीत धरून पुन्हा आपापल्या पक्षांत परतून जे काही मिळेल ते घेऊन समाधान मानावे लागले. राणे यांचे यापेक्षा अधिक काही वेगळे होईल असे मानायचे काहीही कारण नाही. वास्तविक या सर्वापेक्षा राणे यांना आणखी एक आव्हान सांभाळावे लागणार आहे. ते म्हणजे त्यांचे सुपुत्र. राणे यांना राजकारणाची पातळी स्वत:च्या मुलांपलीकडे न्यावी लागेल. तरच त्यांना यश संभवते. तूर्त त्यांनी मंत्रिपदाचाच राजीनामा दिला आहे. तो त्यांनी आधीही दिलाच होता. तो कोणी फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. आता परिस्थितीत बराच फरक पडला आहे, असे नाही.
जे काही झाले त्यावरून राणे आणि अन्यांनाही शिकण्यासारखे बरेच काही आहे. यातील पहिला धडा म्हणजे बंडाची धमकी आणि कृती यांत थेट संबंध न दिसल्यास ती देणाऱ्याच्या ताकदीचा ऱ्हास होऊ लागतो. हा इतिहास आहे. एकेकाळी अशी बंडाची धमकी देऊन जे तलवारी म्यान करीत त्यांचे वर्णन बंडोबा थंडोबा झाले, असे केले जात असे. काही कृती न घडल्यास राणे यांच्याबाबत ते नुसतेच बडबडोबा असे केले जाईल.