उपासनानिष्ठ धर्मकल्पनांच्या पलीकडे जाणारा आचरणवाद मांडताना संतांनी, प्रसंगी उपासनेच्याच रंजनवादी आणि आत्मकेंद्री पद्धतींवर टीकाही केली आहे. ती आज तरी ऐकली जाते का?

मूठभरांच्या मुठीत बंदिस्त असणारी ज्ञानगंगा ज्ञानापासून वंचित असणाऱ्या समाजघटकांच्या अंगणापर्यंत घेऊन जायची, तर ज्ञानव्यवहाराची माध्यमभाषा तेवढी बदलून भागत नसते. ज्ञानप्रसाराची माध्यमभाषा बदलण्याबरोबरच ज्ञानाच्या आदानप्रदानाची संस्थात्मक रचनाही लोकाभिमुख बनवावी लागते. ज्ञानव्यवहाराच्या परिघाबाहेर ठेवल्या गेलेल्या समाजसमूहांच्या जीवनात ज्ञानदीप तेववण्यासाठी संतांनी कीर्तनासारखे लोकमाध्यम प्रभावीपणे वापरण्यामागील इंगित हेच. सर्वसामान्य माणूस सक्षम बनावा यासाठी ‘मऱ्हाटी’सारख्या लोकभाषेमधून ज्ञाननिर्मिती करून भागणारे नाही, याची पुरेपूर कल्पना ज्ञानदेव-नामदेवादी विवेकी व्यक्तिमत्त्वांना असली पाहिजे याचे दाखले त्यांच्या उक्ती- कृतींमधून मुबलक मिळतात. कारण, लोकभाषेमधून ज्ञानाचे  निर्माण घडू लागले तरी सारी ज्ञानचर्चा मठ-मंदिरांच्या बंदिस्त प्रांगणातच अडकून राहिली तर त्याचा फायदा काय? त्यामुळे ज्ञाननिर्मितीसाठी लोकभाषेचे उपयोजन करत असतानाच कीर्तनासारखे मोकळे, उत्फुल्ल आणि लोकसहभागास खऱ्या अर्थाने विपुल अवकाश प्राप्त करून देणारे लोकमाध्यम संतपरंपरेने स्वीकारले. मठ- मंदिरांसारख्या संस्थांच्या परिसरात अगदी ‘मऱ्हाटी’मधून ज्ञानचर्चा मांडली असती तरी तिला मंदिर प्रवेशाशी संलग्न विधिनिषेधाच्या तत्कालीन भ्रामक संकेत-समजुतींची कुंपणे  पडलीच असती. त्यामुळे, नामदेव बाबांसारख्या समाजमनस्क लोकोत्तर पुरुषाने कीर्तनाचे व्यासपीठ चंद्रभागेच्या खुल्या वाळवंटातच उभारले! ‘नामा वाळवंटी कीर्तन करी,’ हे जनाबाईंनी त्या अतिशय मोठय़ा अशा सांस्कृतिक- सामाजिक स्थित्यंतराचे अत्यंत चपखल आणि तितकेच मार्मिक असे केलेले वर्णन.
‘कीर्तन’ ही नवविधा भक्तीमधील दुसऱ्या क्रमांकाची भक्ती. परंतु आमच्या  संतांनी या साधनाचे उपयोजन केवळ परमार्थाच्या प्रांतापुरतेच सीमित ठेवले नाही. कीर्तन हे वारकरी परंपरेतील संतांनी ज्ञानप्रसाराचे माध्यम बनविले. त्याला कारणही तसेच आहे. संतप्रणीत भक्तीची परिणती ज्ञानामध्ये होणे अपेक्षित आहे. ‘भक्तिचिया पोटीं बोध काकडा ज्योती,’ अशा शब्दांत भक्ती आणि ज्ञान यांचा सांधा  तुकोबा स्पष्ट करतात. संतविचार हा मुख्यत नीतिविचार आहे. त्यामुळे ऐहिक मानवी जीवन नीतिसंपन्न बनायला हवे असेल तर प्रत्येक मनुष्याच्या हातून घडणारे प्रत्येक कर्म नीतिमानच असायला हवे, हा संतविचाराचा कटाक्ष आहे. कर्माला विवेकशील ज्ञानाची जोड लाभली तरच नीतीचे अस्तर लेवून प्रत्येक कर्म साकारते, ही संतांची भूमिका आहे. ज्ञानदेवांच्या मते ज्ञान हे कर्माचे डोळे होत. कर्मामागील दृष्टी निर्दोष असेल तर अमंगलाचा फैलावच होणार नाही, हे संतप्रणीत सोपे व सुटसुटीत तर्कशास्त्र. त्यासाठी ज्ञानदृष्टीमध्ये विवेकाचे अंजन वारंवार घालावे लागते. म्हणूनच विवेक आणि त्याच्याबरोबर अभिन्नपणे नांदणारे वैराग्य यांचे शिंपण समाजमनावर सतत करावे लागते. नेमके हेच कीर्तनाचे आद्य उद्दिष्ट होय, असा एकनाथांचा दाखला आहे. त्यामुळे कीर्तनादरम्यान कोणकोणत्या बाबींचा ऊहापोह कीर्तनकाराने करावा याचे मार्गदर्शन एकनाथ, ‘भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या। प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या।।’ अशा निसंदिग्ध  शब्दांत करतात. एकापरीने, कीर्तनाद्वारे ज्ञानप्रसाराचा वसा  घेणाऱ्या कीर्तनकारांसाठी एकनाथांनी कीर्तनादरम्यान जपण्याची जणू एक मर्यादाच घालून दिलेली आहे, म्हणा ना!
वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असणारा संत हा वस्तुत समाजशिक्षक होय. त्यामुळे अशा समाजशिक्षक संतांनी कीर्तन हे समाजशिक्षणाचे साधन म्हणूनच मुख्यत अंगीकारावे हे तर्काला धरूनच होते. विस्मयाची बाब म्हणजे कीर्तनाबाबतच्या या संतभूमिकेची अतिशय नेमकी जाण लोकमान्य टिळकांना होती. समाजशिक्षण हे कीर्तनकाराचे मुख्य कर्तव्य आहे, असे टिळकांनी एके ठिकाणी लिहूनच ठेवले आहे. केवळ इतकेच नाही तर, ‘‘कीर्तनसंस्था काहीं सामान्य संस्था नव्हे; शाळेंतील शिक्षक किंवा वर्तमान पत्रकार यांच्यापेक्षाहि कीर्तनकाराचा अधिकार मोठा आहे. कारण समाजास वळण लावून देणों हें काहीं लहानसहान काम नव्हें,’’ अशा शब्दांत लोकमान्य कीर्तन आणि कीर्तनकार या दोन संस्थांचे समाजसुधारणा आणि समाजप्रबोधन यांच्या संदर्भातील महत्त्व अधोरेखित करतात. टिळकांच्या या प्रतिपादनात संतविचारांचे पडसाद स्पष्ट जाणवतात. रंजनाद्वारे प्रबोधन हे कीर्तनासारख्या लोकशिक्षणाच्या लोकमाध्यमाचे वैशिष्टय़ आणि बलस्थान असले तरी प्रत्यक्ष कीर्तनादरम्यान ‘रंजन’ आणि ‘प्रबोधन’ या दोन घटकांचे संतुलन टिकवण्याचे तारतम्य कीर्तनकाराला बाळगावेच लागते. निव्वळ रंजनप्रधानतेचा वरचष्मा असलेल्या कीर्तननामक सादरीकरणाची उपेक्षा तुकोबा, ‘तो हे चावटीचे बोल। जन रंजवणे फोल।।’ अशा तीव्र शब्दांत करतात.
कीर्तन हे ज्ञानाच्या उपासनेचे माध्यम असल्याने कीर्तन  कोठे करावे अथवा करू नये, याबाबत संतविचार विलक्षण दक्ष आहे. ‘‘उभ्या बाजारात कथा। हे तों नावडे पंढरिनाथा।।’’ असे तुकोबा स्पष्टपणे बजावतात. किंबहुना, कीर्तनाचे अधिष्ठान नसलेल्या ठिकाणी कीर्तन मांडणे म्हणजे कीर्तनकाराने पोटासाठी ढोंग करणे आहे, असा कडक तडाखाही तुकोबा मारतात! कीर्तन हे समाजप्रबोधनाचे साधन असल्याने या माध्यमाला बाजारू वस्तूचे स्वरूप येऊ नये, याबाबत संतविचार विलक्षण  जागरुक आहे.  प्रबोधन करण्याचा वसा घेतलेल्या एखाद्या कीर्तनकारासारख्या लोकशिक्षकाला प्रसंगी समाजमनाला चार खडे बोल सुनवावे लागतात. तेवढे नैतिक सामथ्र्य आणि अधिकार कीर्तनकाराच्या अंगी यायला हवा असेल तर ‘कीर्तनकार’ ही संस्था कोणाचीही मिंधी असता कामा नये, याबाबत तुकोबा कमालीचे दक्ष आणि आग्रही आहेत. लोकशिक्षणाचे कंकण बांधलेला कीर्तनकार किती निस्पृह आणि चारित्र्यसंपन्न असावा, याबाबतची अत्यंत कठोर आचारसंहिता घालून देणारा तुकोबांचा एक अभंग या ठिकाणी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. कीर्तनकाराचे वर्तन कसे निष्कलंक असले पाहिजे, हे बजावून सांगताना तुकोबा म्हणतात-
जेथें कीर्तन करावें। तेथें अन्न न सेवावें     ।।१।।
बुका लावूं नये भाळा। माळ घालूं नये गळां ।।२।।
तटावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा    ।।३।।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती ते ही नरका जाती।।४।।
कीर्तनकारांसाठी तुकोबांनी सिद्ध केलेली अशी ही कडकडीत आचारसंहिता पालन करणारे आज किती कीर्तनकार सापडतील? लोकप्रबोधनाचे साधन असलेले कीर्तन हे माध्यम तर कीर्तनकाराने विक्रेय बनवायचे  नाहीच; असा दंडक तुकोबांनी घालून दिलेला आहे.
‘कीर्तन’ आणि ‘कीर्तनकार’ या दोन संस्थांची शुचिता इतक्या कडो-विकडीने पाळली जाण्याबाबत संतविचार असा आग्रही दिसतो त्याला कारणही तसेच आहे. भक्तीइतकेच संतांच्या लेखी कीर्तन हे नीतितत्त्वांचे भरणपोषण करणारे माध्यम होय. ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे,‘दुरितांचे तिमिर’ दूर व्हायला हवे असेल तर प्रत्येक मनुष्याच्या हातून घडणारी प्रत्येक कृती ही नीतिवानच असायला हवी. दुसऱ्या आणि सोप्या शब्दांत सांगायचे, तर मनुष्याच्या ठिकाणी  प्रसंगोपात्त निर्माण होणाऱ्या पापबुद्धीचेच निराकरण घडून आले तर माणसाच्या हातून पाप होणार च नाही. अनैतिक वा पापी वर्तनच मुळात घडले नाही, की पापक्षालनासाठी प्रायश्चित्त घेण्याचा खटाटोप अप्रस्तुतच ठरतो! माणसाच्या ठायी वसणाऱ्या पापबुद्धीचा नायनाट घडवून आणण्याचे सामथ्र्य, ज्ञानदेवांच्या सांगण्याप्रमाणे कीर्तनाच्या ठायी आहे. कीर्तनाचा उत्कर्ष अथवा प्रकर्ष घडविण्याने त्याची परिणती,‘‘जे नामचि नाही पापाचें। ऐसें केलें।।’’ अशी होईल, असे ज्ञानदेव ‘भावार्थदीपिका’ ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात सांगतात. कीर्तनाद्वारे पापबुद्धीचा नाश होईल, पापबुद्धी लयाला गेल्याने कोणाच्याच हातून पापकृत्य घडणार नाही आणि पापकृत्येच न घडल्याने प्रायश्चित्तांची उठाठेव करण्याचा प्रसंगच उद्भवणार नाही, असे तर्कशुद्ध विश्लेषण ज्ञानदेव मांडतात. इथे एक गंमत आहे. ‘नाशिलें व्यवसाय प्रायश्चित्तांचे’, अशी शब्दयोजना करून ज्ञानदेव पापक्षालनाच्या नावाखाली धर्म व परमार्थाच्या क्षेत्रात बोकाळलेल्या दलालीचा पायाच कीर्तनामुळे उद्ध्वस्त होईल, या एका अतिशय मूलभूत अशा स्थित्यंतराकडेही आपले लक्ष वेधतात.
आजचे चित्र काय आहे? आज एकीकडे कीर्तनसप्ताहांचे आयोजन दणक्यात होताना दिसते. दुसरीकडे समाजातील पापाचार बोकाळतो आहे. तिसरीकडे प्रायश्चित्त देण्या-घेण्याच्या व्यवहारांना जबरदस्त उठाव आलेला आहे. काहीतरी चुकते आहे, हे नक्की.