अमेरिका आणि युरोप खंडात पुन्हा एकदा नाझीवादाने डोके वर काढले असून, त्या विरोधात गेल्याच महिन्यात वॉशिंग्टन डीसी येथे एक  परिषद झाली. केवळ अमेरिका वा युरोपच नव्हे, तर रशियामध्येही नाझी संघटनांची संख्या वाढत असून, एकटय़ा अमेरिकेतच अशा १५५ संघटना असल्याचे या परिषदेत सांगण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगभरासाठी तिरस्कृत ठरलेला नाझीवाद आज लोकप्रिय ठरू लागला आहे. नाझी विचारसरणीमुळे ज्यांना सर्वार्थाने भुईसपाट व्हावे लागले, त्या जर्मनीतही आज नवनाझी संघटनांनी पाय रोवले असून, जर्मनीतील अनेक प्रांतांमध्ये नवनाझींचे सभासद निवडून येताना दिसत आहे.आधुनिकता, विज्ञाननिष्ठा यातून तरी माणूस माणूस बनेल, असे अनेकांना वाटत होते. पण या रानटी विचारसरणीने आधुनिकतेलाही छेद दिला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांना त्या केवळ महिला असल्याने सत्तात्याग करावा लागला. ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत काम करीत असलेल्या अनेक डॉक्टरांना ते केवळ कृष्णवर्णीय आणि भारतीय वंशाचे आहेत म्हणून दुय्यम स्वरूपाची वागणूक सहन करावी लागत आहे. हे आधुनिक गणले जाणारे देश. पण त्या देशांच्या सामाजिक आणि राजकीय व्यवहारांतही वांशिक वर्चस्वाची, पुरुषसत्तेची फॅसिस्ट भावना कशी खोलवर रुजलेली आहे, हेच या उदाहरणांतून स्पष्ट होते. इटलीमध्ये एका महिला मंत्र्यावरून तेथील उजव्या शक्तींनी चालवलेला गोंधळही याच पंक्तीतला आहे. गेल्या एप्रिलमध्ये इटलीच्या मंत्रिमंडळात सेसिल क्येंगे या महिलेचा स्थलांतरितविषयक मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. क्येंगे या मूळच्या कोंगोच्या. कृष्णवर्णीय. अशा महिलेचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने तेथील उजव्या पक्षांना तर रोमला आग लागल्यासारखेच वाटले. आपल्या अनेक लफडय़ांमुळे बदनाम झालेले इटलीचे माजी पंतप्रधान सिल्विओ बर्लुस्कोनी यांच्या पक्षाचे नेते आणि सिनेटचे उपसभापती रॉबर्तो काल्डेरोली यांनी तर क्येंगे यांची तुलना ओरांगउटांनशी केली. त्यावरून टीका झाल्यावर त्यांनी क्येंगे यांना दूरध्वनी करून त्यांची माफी मागितली आणि त्यानंतर पुन्हा, क्येंगे यांना मंत्री व्हायचे असेल, तर त्यांनी आपल्या देशात जाऊन व्हावे, अशी प्रतिक्रिया दिली. काल्डेरोली आणि देशोदेशांतील त्यांच्या विचारबंधूंचे मूळ दुखणे हे आहे. दुय्यम-तिय्यम दर्जाच्या देशातून, प्रांतातून आमच्या देशात येता, तर मग येथे तुम्हाला दुय्यम-तिय्यम दर्जाचेच नागरिक बनूनच राहिले पाहिजे, अशी ही विचारधारा आहे. यामध्ये आम्ही म्हणजे श्रेष्ठ असा गंड आहे. इटलीवर घोंगावत असलेले आर्थिक संकट, तेथील रोजगाराचे घटते प्रमाण यामुळे परप्रांतीयांबद्दल स्थानिक जनतेच्या मनात राग आहे. हे परप्रांतीय आपल्या नोकऱ्यांत वाटेकरी होतात, याबद्दल असंतोष आहे. क्येंगे यांच्याविरोधात त्यामुळे वातावरण आहे, असे म्हणावे, तर मग अमेरिका वा ब्रिटनचे काय, हा प्रश्न येतोच. अमेरिका वा युरोपातले अनेक देशांच्या समृद्धीमध्ये विदेशी नागरिकांचा मोठा वाटा आहे, हे कसे विसरता येईल? पुन्हा यात गंमत अशी, की जे इटालियन लोक आज जागोजागी क्येंगे यांच्या चित्रांना फाशी देत आहेत, त्या इटालियन नागरिकांना अमेरिकेसारख्या देशात खालच्या स्तरावरचे समजले जाते. तेव्हा मुख्य मुद्दा गरिबी आणि बेरोजगारीचा नाहीच. तो रोमारोमांत मुरलेल्या संस्कारांचा (खरे तर कुसंस्कारांचा) आहे. एकविसाव्या शतकातही हे मध्ययुगीन मुद्दे कायम असावेत, ही सगळ्यांसाठीच शरमेची गोष्ट आहे.