लोकसभा निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी आपला पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीसोबतच राहील, अशी ग्वाही वारंवार देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुंबईतील राहुल गांधींच्या प्रचार सभेकडे पाठ फिरवून नेमका कोणता संदेश दिला आहे, हे शोधण्यासाठी फार मोठय़ा राजकीय चाणाक्षपणाची गरज नाही. गेल्या दोन वर्षांपासून पवार यांचा सूर काँग्रेसप्रणीत संपुआच्या सुरापासून काहीसा वेगळाच लागलेला होता. अन्नसुरक्षा विधेयक असो किंवा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाविषयीचा मुद्दा असो, पवार यांनी काँग्रेसच्या मतापासून फारकत घेतल्याचे दिसू लागले होते. केंद्रातील सत्ता कणखर नसेल, तर अन्य सत्ताकेंद्रे प्रबळ होतात, असे मत व्यक्त करून दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयीच्या नाराजीचे संकेत पवार यांनी दिले होते. काँग्रेस नेतृत्वाची म्हणजे सोनिया गांधी यांची उपयोगिता कमी होऊ लागल्याने सरकारच्या प्रतिमेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचा परखड दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तरी राजकारणात नवखे असलेल्या राहुल गांधींना पुरेसा अनुभव नसल्याचे मतही पवार यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाले होते. या पाश्र्वभूमीवरच राहुल गांधी हेच काँग्रेसचे आणि संपुआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार हे स्पष्ट झाल्याने, पवार यांच्या ज्येष्ठत्वाला ही बाब रुचणारी नसणार हे स्पष्टही होते. अनेकदा तसे दाखवून दिल्यानंतर अखेर रविवारच्या सभेला गरहजर राहून राहुलचे नेतृत्व अमान्य असल्याचा स्पष्ट संकेत काँग्रेसला देऊन टाकला आणि लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकारणात पवार यांची नेमकी भूमिका काय असेल याचा विचार करण्याची पाळी काँग्रेसवर आली. महाराष्ट्रात येत्या डिसेंबरात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुढील सहा-सात महिने तरी महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला आपल्या धोरणांचा धक्का बसू नये याची खबरदारी ते घेणार हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसप्रणीत आघाडी केंद्रात सत्तेवर येण्याविषयीची साशंकता पवार यांनी उघडपणे नोंदविली होती. त्याआधी झालेली मोदी यांची भेट व गुजरात दंगलीवरून पवार यांनी मोदी यांना दिलेला बेकसूरपणाचा दाखला, तिसऱ्या आघाडीच्या मंचावर प्रफुल पटेल यांनी लावलेली हजेरी आदींमुळे शरद पवार सत्ताधारी आघाडीत अस्वस्थ असल्याचेही वारंवार उघड झाले आहे. देशात सध्या काँग्रेसविरोधी वातावरण आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस- राष्ट्रवादीला फारसे उत्साहवर्धक वातावरण नाही. या बाबी पाहता, भविष्यातही काँग्रेससोबत राहणे राष्ट्रवादीच्या भवितव्याच्या दृष्टीने किती हितकारक ठरेल याबद्दल पवार यांचे स्वत:चे काही आडाखे तयार असणार हेही साहजिक आहे. त्यामुळेच, शरद पवार रालोआसोबत जाणार का, याविषयीच्या चर्चा वारंवार झडतच असतात. केंद्रात रालोआला सत्तेच्या जवळपास जाण्याची संधी काँग्रेसप्रणीत आघाडीपेक्षा अधिक असेल, तर मित्रपक्षांची जमवाजमव करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआलाच पुढाकार घ्यावा लागेल आणि अशा वेळी सत्तेसोबत जायचे की विरोधात बसायचे याचा निर्णय अनेक पक्षांना घ्यावाच लागेल. काहीही झाले तरी काँग्रेससोबत राहणार, असे सांगणाऱ्या पवार यांच्या पक्षाला भविष्यात मात्र कोणतेही पाऊल उचलावे लागले तरी देशाला आश्चर्य वाटू नये अशीच पवार यांची वर्तमान राजनीती आहे. राहुल गांधी यांच्या शेजारी बसण्याचे टाळून त्यांनी या राजनीतीचेच संकेत दिले आहेत. ते ओळखण्याइतके शहाणपण काँग्रेसच्या अनेक परिपक्व   नेत्यांकडेदेखील खचितच असेल.