‘राजकारण म्हणजे गजकरण’ अशी टीका करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मात्र, ‘कानाखाली आवाज काढला की सगळे प्रश्न सुटतात’, असा पवित्रा घेत त्या वेळी राजकारणाचा मंत्रच बदलला. शिवसेनेच्या राजकारणाच्या छायेतच वाढलेल्या राज ठाकरे यांनी मात्र पक्षस्थापनेच्या पहिल्याच सभेत महाराष्ट्राचे एक सुंदर स्वप्न जनतेसमोर ठेवले. व्हर्जिनिया किंवा क्वीन्सलँडमधील शेतकऱ्यासारखा जीन्स आणि टी शर्ट घालून शेती नांगरणारा शेतकरी महाराष्ट्रात बघायचा आहे, असे राज ठाकरे यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणात सांगितले होते, तेव्हा त्या कल्पनारम्य विश्वात दाखल झालेल्या श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट मुंबईभर दुमदुमला होता.मात्र, राज ठाकरे यांच्या स्वप्नातील ही परिवर्तनाची पहाट उजाडावी यासाठी त्यांच्या पक्षाने मात्र फारसे काही केलेच नाही. उलट, ‘खळ्ळ खटय़ाक’चा नारा मात्र जमेल तेथे आणि जमेल त्या वेळी मनसेचे सैनिक देत राहिले आणि महाराष्ट्राचा कायापालट घडविण्याच्या त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उमटले. २००९ च्या निवडणुकीतील संशयास्पद राजकीय भूमिकेमुळे आणि नंतरच्या एकूणच अस्ताव्यस्तपणामुळे, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उदयाला येऊ पाहणारा हा तारा फारसा प्रकाश पाडेल, याविषयीही शंकाच व्यक्त होऊ लागल्या. मुळात, राज ठाकरे हेच या पक्षाचा एकमेव आधारस्तंभ असल्यामुळे मनसेच्या वाटचालीत गेल्या काही वर्षांत जे काही घडले, बिघडले, त्याच्या साऱ्या श्रेयापश्रेयाचे धनी एकटे राज ठाकरे हेच ठरतात. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा, म्हणजे, ‘मनसेची ब्लू प्रिंट’ महाराष्ट्रासमोर ठेवण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले, तेव्हा पुन्हा महाराष्ट्राची नजर या ‘ब्लू प्रिंट’च्या प्रतीक्षेत राज ठाकरे यांच्यावर एकवटली. पण जीन्स आणि टी शर्ट घातलेल्या शेतकऱ्याच्या स्वप्नाचीच पुनरावृत्ती होणार अशा जाणिवाच वाढत गेल्या आणि वर्षांनुवर्षे रखडलेली मनसेची ब्लू प्रिंट हा चेष्टेचाही विषय झाला. या पक्षाच्या वेबसाइटवरील पक्षाच्या ‘व्हिजन’चे पान आजही कोरेच आहे. दिरंगाई आणि अनिश्चिततेच्या सावटात सापडलेली ‘ब्लू प्रिंट’ हा प्रकारदेखील असाच, केवळ ‘काही कोरी निळी पाने’ असाच असणार, असा चेष्टेचा सूरही घुमू लागला. अशा तऱ्हेने चेष्टेचे असंख्य सूर झेलल्यानंतर राज ठाकरे यांची महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट अखेर बाहेर आली आहे. सध्या महाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आहेत. उद्योगांपासून शेतीपर्यंत सर्व क्षेत्रे या समस्यांनी होरपळत आहेत, आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत या समस्याच प्रचाराच्या ऐरणीवर येणार आहेत. राज ठाकरे यांची ‘ब्लू प्रिंट’ हा त्यांच्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा नाही. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना तो जाहीर करावा लागला हा निव्वळ, ‘ब्लू प्रिंट’ लांबल्यामुळे जुळून आलेला योगायोग आहे. त्यामुळे, येत्या विधानसभा निवडणुकीत या जाडजूड ब्लू प्रिंटमधील स्वप्ने मतासाठी जनतेसमोर मांडणे तसे मनसेला अवघडच होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांच्या, अभ्यासकांच्या सहभागातून मनसेची ही ब्लू प्रिंट साकारली आहे, असे राज ठाकरे अलीकडेच म्हणाले. त्यामुळे त्यामधील ऐवज कदाचित वजनदार असेलही, पण गेल्या अनेक वर्षांची मरगळ आलेल्या मनसेकडे ती स्वप्ने वास्तवात आणण्याची उमेद आहे का, याबाबत मात्र साशंकताच आहे. मनसेच्या राजकारणाचा बाज आणि ब्लू प्रिंटमधून जनतेच्या मनात रुजविली जाणारी स्वप्ने यांचा मेळ बसविण्याचे एक आव्हान मनसेपुढे, म्हणजे केवळ राज ठाकरे यांच्यापुढे उभे आहे. जीन्स घालून शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे जे स्वप्न राज ठाकरे यांनी पाहिले होते, तशी या ब्लू प्रिंटच्या स्वप्नाची अवस्था होऊ नये!