अमेरिका आणि क्युबा यांच्यात तब्बल ५४ वर्षांनंतर पुन्हा राजनतिक संबंध प्रस्थापित होत असल्याची घोषणा बराक ओबामा यांनी केली आहे. ही एका अर्थाने अमेरिकेची माघार असली तरी तो क्युबा वा कॅस्ट्रो यांचा विजय आहे, असेही म्हणता येणार नाही.

१६ एप्रिल १९५९ हा दिवस जागतिक इतिहासास कलाटणी देणारा. त्या दिवशी अमेरिकेतील लिंकन आणि थॉमस जेफरसन स्मृतिस्थळास भेट देणाऱ्यांपकी एक होते फिडेल कॅस्ट्रो. नजीकच्या क्युबा या देशात क्रांती करून सत्ता हाती घेतलेल्या या तरुणाने अमेरिकेस दिलेली ही शेवटची भेट. त्या दिवसानंतर उभय देशांनी परस्परांशी संबंध तोडले आणि तत्कालीन शीतयुद्धास मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा दिली. त्यानंतर नव्याने इतिहास घडला तो बुधवारी. जवळपास ५४ वष्रे आणि या काळातील अमेरिकेचे ११ अध्यक्ष यांना जे जमले नाही ते बराक हुसेन ओबामा यांनी करून दाखवले. अमेरिका आणि क्युबा यांच्यात पुन्हा राजनतिक संबंध प्रस्थापित होत असल्याची घोषणा ओबामा यांनी केली आणि काळ नावाच्या एका अंतहीन ग्रंथातील एक अध्याय संपला. आपण त्याच त्याच गोष्टी करत राहिलो तर वेगळ्या निकालाची अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही, अशा आशयाचे उद्गार ओबामा यांनी हे क्युबाख्यान संपवताना काढले. ते अनेक अर्थानी महत्त्वाचे असून आपला भूतकाळ बिघडवणाऱ्या, वर्तमान घडवणाऱ्या आणि भविष्यास दिशा देणाऱ्या या घटनेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Due to lack of financial authority additional commissioner is facing problems
वित्तिय अधिकार नसल्याने अतिरिक्त आयुक्तांपुढे पेच, आयुक्त प्रशिक्षणासाठी रवाना
Odisha BJP
ओडिशात BJD ला मोठा धक्का! मुख्यमंत्री पटनायकांच्या जवळचा महत्त्वाचा नेता भाजपात दाखल!

पन्नासच्या दशकात अमेरिका खंडातील क्युबा या तुलनेने कमी महत्त्वाच्या देशात राज्य होते ते अमेरिकेचे. अर्ल् स्मिथ या क्युबातील अमेरिकी राजदूताने सेनेटसमोर निवेदन करताना काढलेले उद्गार या संदर्भात वास्तव स्पष्ट करणारे आहेत. कॅस्ट्रो यांच्या उदयापूर्वी क्युबात सर्वात सामथ्र्यशाली व्यक्ती असे ती म्हणजे अमेरिकेचा राजदूत. प्रसंगी त्यास खुद्द क्युबाच्या अध्यक्षापेक्षाही अधिक महत्त्व होते, असे या स्मिथ यांनी सोदाहरण नमूद केले होते. अमेरिकी कंपन्या आणि त्यांची आíथक ताकद हा क्युबाच्या व्यवस्थेचा कणा होता आणि जनरल फल्जिनशियो बॅतिस्ता यांची राजवट हा एक विनोद होता. अमेरिकेच्या हातातील बाहुले एवढीच काय ती त्यांची ओळख. या पाश्र्वभूमीवर क्रांतीचे स्वप्न दाखवीत जनतेच्या हाती सत्ता आली पाहिजे असे म्हणणारे फिडेल कॅस्ट्रो हे क्युबन जनतेत लोकप्रिय होऊ लागले नसते तरच नवल. साम्यवादाचा दुरून दिसणारा डोंगर रम्य भासू लागण्याचा हा काळ. जनतेच्या हाती सत्ता आली पाहिजे आणि संपत्तीचे वाटप समानच झाले पाहिजे हा उद्घोष करीत साम्यवादी विचारधारा जनमानसास मोहवू लागली होती. उत्तर अमेरिका खंडातील दारिद्रय़ाने पिचलेल्या अनेक देशांतील जनतेच्या डोळ्यांत या साम्यवादी स्वप्नांमुळे एक वेगळीच चमक निर्माण होऊ लागली होती आणि हे स्वप्न सत्यात कसे आणता येईल याबाबत अनेकांचे प्रयत्न सुरू होते. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे फिडेल कॅस्ट्रो. क्युबात क्रांती करावयास हवी या त्यांच्या स्वप्नास आणखी तितकीच स्वप्नाळू साथ मिळाली. ती म्हणजे चे गव्हेरा. जगभरातील आíथक वास्तव बदलू पाहणाऱ्या करोडो तरुणांना आजही ज्याचे आकर्षण वाटते तो चे आणि फिडेल हे १९५५ साली एकमेकांना भेटले. समान विचारधारा बाळगणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले आणि चेने कॅस्ट्रो यांच्या २६ जुल क्रांती गटात सामील होण्याचे मान्य केले. चे हा मूíतमंत डावा होता आणि त्यामुळे क्युबा ही त्याची मायभूमी नसतानाही त्याने क्युबन क्रांतीत सक्रिय सहभाग घेतला. या आधीच्या वर्षी २६ जुल या दिवशी क्रांतिकारकांनी लष्करी तळावर केलेल्या, परंतु फसलेल्या, हल्ल्याच्या गौरवार्थ या डाव्या मंडळींनी आपल्या नावात २६ जुल ही तारीख ठेवली होती. १९५५ साली मेक्सिकोत या गटाची पुन्हा जुळवाजुळव झाली. १९५९ साली बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून पाडण्यात या मंडळींना यश आले. कॅस्ट्रो हे क्युबाचे अध्यक्ष बनले आणि चे गव्हेरा हे मंत्री. सत्ता हाती आल्यानंतर पुढल्याच वर्षी या कॅस्ट्रो यांनी क्युबातील सर्व अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून अमेरिकेचा राग ओढवून घेतला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी संतापून त्या वेळी क्युबावर आíथक र्निबध घातले आणि राजनतिक संबंधही तोडून टाकले.

शीतयुद्धाचा भडका उडण्याची ती नांदी होती. याचे कारण अमेरिकेचा खंडीय शेजारी असूनही कॅस्ट्रो मायभूमीस भांडवलशाहीपासून दूर नेऊ पाहत होते आणि अमेरिकेपेक्षा सोविएत युनियन हा त्यांना अधिक जवळचा वाटू लागला होता. परिणामी अमेरिका आणि सोविएत रशिया या दोन आंतरराष्ट्रीय सांडांच्या संघर्षांत कॅस्ट्रो हे उत्साही प्यादे बनले. वाचाळ वाटावा इतका बोलका स्वभाव, बेदरकार वृत्ती आणि कोणी जर जग बदलणारा असेल तर तो आपणच असे मानण्याचा अस्थायी आगाऊपणा या अंगभूत गुणांमुळे कॅस्ट्रो हे जगभरातील अमेरिकाविरोधाचा चेहरा बनले आणि अमेरिकेसाठी अर्थातच डोकेदुखी. वास्तवात क्युबा आणि कॅस्ट्रो यांच्यात अमेरिकेच्या आíथक साम्राज्यास आव्हान मिळेल इतकी ताकद कधीही नव्हती. परंतु त्यांच्यामागे सोविएत रशिया असल्यामुळे रशियास धडा शिकवण्याचा भाग म्हणून अमेरिका कॅस्ट्रो यांच्या मागे हात धुऊन लागली. त्यातून बे ऑफ पिग्जचे प्रकरण घडले आणि त्यात अमेरिकेचे नाक आणखीनच कापले गेले. सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने कॅस्ट्रो यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना रसद पुरवली होती आणि प्रतिक्रांती करून आपण कॅस्ट्रो यांची राजवट उलथून पाडू असा त्यांचा समज होता. तो कॅस्ट्रो यांनी हाणून पाडला. तीन वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर कॅस्ट्रो यांचा विजय झाला आणि अमेरिकेस माघार घ्यावी लागली. पुढच्याच वर्षी सोविएत रशियाने या शीतयुद्धास क्षेपणास्त्रांची फोडणी दिली आणि अमेरिकेच्या विरोधात आंतरखंडीय क्षेपणास्त्रे क्युबाच्या भूमीवर रोवली. शीतयुद्धाचा हा उत्कलन बिंदू होता आणि जग आता तिसऱ्या महायुद्धास सामोरे जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्या संहारापासून जग थोडक्यात वाचले. पण अमेरिकेच्या जवळपास प्रत्येक अध्यक्षाने आणि सोविएत रशियाचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाने क्युबाच्या निमित्ताने शीतयुद्धाचा दाह वाढवण्याच्या दिशेनेच प्रयत्न केले. या सर्व काळात अमेरिकेचे क्युबावरील र्निबध कायमच होते आणि तरीही कॅस्ट्रो यांच्या केसालाही धक्का लागत नव्हता. क्युबन जनतेने त्यांच्या विरोधात उठाव करावा यासाठीदेखील अमेरिकेने जंगजंग पछाडले. परंतु तरीही काही झाले नाही आणि कॅस्ट्रो यांची राजवट अबाधित राहिली. पुढे १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर शीतयुद्धाची एकतर्फी अखेर झाली आणि क्युबावरील अमेरिकेच्या र्निबधांनाही काही अर्थ राहिला नाही. दरम्यान जिमी कार्टर वा पुढे बिल क्लिंटन यांनी क्युबन जनतेस अमेरिकेत येण्यासाठी उत्तेजन दिले आणि त्याबाबतचे र्निबधही सल केले. तरीही ते पूर्णपणे उठवले जाण्यासाठी  २०१४ सालाची अखेर उजाडावी लागली. ही एका अर्थाने अमेरिकेची माघार असली तरी तो क्युबा वा कॅस्ट्रो यांचा विजय आहे, असेही म्हणता येणार नाही. सत्ता हाती आल्यानंतर चारच वर्षांत कॅस्ट्रो आणि चे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले. त्याची परिणती चे याने क्युबा सोडण्यात झाली. पुढे तो बोलिव्हियात गेला आणि १९६७ साली त्याला अज्ञात ठिकाणी फाशी देण्यात आले. त्यानंतर ३० वर्षांनी १९९७ साली त्याचे पार्थिव समारंभपूर्वक क्युबात नेण्यात आले आणि सर्व शासकीय इतमामात त्याच्यावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. हा सर्व काळ ज्यांनी घडवला ते फिडेल कॅस्ट्रो यांच्यादेखतच हे सर्व घडत गेले. आज अमेरिकेने क्युबाशी संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला, त्याचेही ते साक्षीदार आहेत. तेज निर्माण करणारी ज्योत क्षीण झाल्यावर जगण्यात अर्थ राहत नाही, असे कॅस्ट्रो म्हणत. पण तरीही त्यांना जगावे लागत आहे आणि भांडवलशाही म्हणजे जणू शिवी आहे आणि अमेरिका तिचे मूíतमंत प्रतीक हा आयुष्यभराचा सिद्धान्त डोळ्यादेखत ढासळताना पहावे लागत आहे.

हा काळाचा महिमा. अमेरिकेत आज क्युबन्स मोठय़ा प्रमाणावर आहेत आणि त्यांना क्युबाने अमेरिकेशी संघर्ष करण्यात काहीही शहाणपणा वाटत नाही. या बदलत्या जागतिक वातावरणास जागत अमेरिकेने क्युबासमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि क्युबाने तो स्वीकारला हेदेखील कॅस्ट्रो यांना पाहावे लागले. हा काव्यात्म न्याय. क्रांतिकार्यातील त्यांचा सहकारी चे गव्हेरा याचे दफन दोन वेळा झाले. अमेरिका आणि क्युबा या देशांतील मत्रीपर्वाच्या निमित्ताने चे गव्हेरा याच्या मरणाचा तिसरा अध्याय सुरू झाला आहे. तोदेखील फिडेल कॅस्ट्रो यांच्या डोळ्यादेखत. क्रांतीची भाषा करणाऱ्या सर्वानीच शिकावा इतका हा धडा मोठा आहे.