नव्या कल्पना सुचणे याला सध्याच्या जगात फार महत्त्व आले आहे. पण प्रत्यक्षात येऊच शकणार नाहीत, अशा कल्पना सुचण्यात राज्याच्या शिक्षण विभागाचा हात कुणी धरू शकणार नाही. चार आण्याची भांग घेतली की हव्या तेवढय़ा कल्पना सुचतात, असे आचार्य अत्रे यांनी एकदा म्हटले होते, त्याची आठवण यावी, अशी एक नामी कल्पना शिक्षण खात्याने जाहीर केली आहे. ज्या उन्हाळी सुटीची प्रत्येक विद्यार्थी वाट पाहत असतो आणि त्या सुटीत करायच्या गमतीजमतीच्या स्वप्नांवर परीक्षा देत असतो, त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण सुटी खराब करणारी ही कल्पना फक्त शिक्षण खात्यालाच सुचू शकते. कल्पना अशी आहे, की उन्हाळी सुटीमध्ये म्हणजे १४ एप्रिलपासून ते शाळा सुरू होईपर्यंतच्या काळात ५ ते १८ तास अभ्यास करून घेण्यात यावा. या कामी शाळेतल्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन ‘एकच ध्यास करू अभ्यास’ ही योजना पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. अशी कल्पना सुचणे हा शुद्ध बावळटपणा आहे, याचे भान शिक्षण खात्याला अजिबात नाही. उलटपक्षी बघा, किती सुंदर कल्पना आहे ही, असे म्हणत, या योजनेचा डांगोरा पिटला जात आहे. तिसरी व चौथीच्या मुलांनी पाच तास, तर पाचवी ते सातवीसाठी ८ तास आणि अकरावी-बारावीसाठी १८ तास अभ्यास करून घेण्यात यावा, असे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. सुटीतही अभ्यासाचा व्यासंग करायला सांगणाऱ्या या विभागाला वर्षभरात किती अभ्यास करून घेतला जातो आणि त्याचा विद्यार्थ्यांना नेमका किती फायदा होतो, हे जाणून घेण्यात अजिबात रस नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अभ्यासाला महत्त्व दिले. अध्ययनाने माणसाची विचार करण्याची शक्ती विकसित होते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळेच तर देशातील आपल्या बांधवांना त्यांनी शिकण्याचा सल्ला दिला. शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाला शिकल्याने होणारे फायदे समजावून सांगण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी जिवापाड प्रयत्न केले. त्याचे दृश्य परिणाम आता दिसायलाही लागले आहेत. राज्याच्या शिक्षण खात्याने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी उन्हाळी सुटीत अभ्यास करण्याचा फतवा काढला आहे. असे काही करण्यास स्वत: डॉ. आंबेडकरांनीही पािठबा दिला नसता, पण सुमार दर्जाचे अधिकारी जेव्हा आपल्या बुद्धिमत्तेला धार लावण्याचा प्रयत्न करू लागतात, तेव्हा त्यांच्या नापीक डोक्यातून अशा कल्पना स्फुरण पावतात. सुटी लागल्यानंतर शाळेतल्या सगळ्या मुलांना कसे शोधायचे? त्यांना शाळेत कसे आणायचे आणि त्यांच्याकडून अभ्यास कसा करून घ्यायचा? या शिक्षकांच्या सामान्य शंकांचे उत्तर देण्यास मात्र हे शिक्षण खाते बांधील नाही. परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुटी लागते. ही सुटी विद्यार्थ्यांसाठी असते. शिक्षकांना परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून निकाल लावण्याचे काम या सुटीत करावे लागते. परीक्षांचे निकाल योग्य आणि वेळेवर लावण्यासाठी आटापिटा करणाऱ्या शिक्षकांना ते काम सोडून विद्यार्थ्यांना शोधण्याची वेळ या आदेशामुळे आली आहे. आधीच जनगणना आणि निवडणुकीच्या कामाने त्रस्त झालेल्या शिक्षकांना ती कामे करीत असतानाच सुटीतही विद्यार्थ्यांकडून अठरा तास अभ्यास करून घेण्याची सक्ती करणे म्हणजे ओझ्याने पूर्णपणे वाकलेल्या उंटाच्या पाठीवर आणखी एक ओंडका टाकण्यासारखे आहे. फतवे काढणाऱ्यांना या कशाचीच कल्पना नसते. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाची जाणीवही या बाबूंना नसते. सुटीत कशाचा अभ्यास करायचा, याचा तपशील मात्र शिक्षण विभागाने दिलेला नाही. त्यामुळे ज्या इयत्तेची परीक्षा दिली, त्याचाच अभ्यास करायचा की पुढील वर्षांचा की अभ्यासक्रमाबाहेरील, याचेही उत्तर आता शोधण्याची वेळ आली आहे.