‘मी जे बोलतो, ते करतो.. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या, त्यांना मी मंत्री करणारच’ असे विधान लातूर जिल्ह्य़ात दोन महिन्यांपूर्वीच्या एका जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. पुढे राज्यात भाजपचे सरकार आले. निलंगेकर मंत्री झाले की नाही, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण, ‘मी बोलतो, ते करतो’, हे नितीन गडकरी यांचे वाक्य मात्र त्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात घुमले, आणि गडकरींच्या प्रत्येक घोषणेबरोबर नवी स्वप्ने पाहण्याची महाराष्ट्राला जणू चटक लागली. अवघ्या महाराष्ट्राच्या नजरेसमोर विकासाची एक सुंदर स्वप्नसृष्टी तरळू लागली आहे. गडकरी बोलले म्हणजे तसे होणारच, अशा आशेवर आता अवघा महाराष्ट्र विकासाच्या स्वप्नपूर्तीकडे डोळे लावून बसला आहे. जून महिन्यात, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यातील ९०० एकर जमिनीच्या विकासाचा मुद्दा त्यांनी आवेशाने     मांडला, आणि सार्वजनिक हिताच्या विकासासाठी कधीपासून भुकेल्या असलेल्या मुंबईने पहिले भव्य स्वप्न पाहिले. या जमिनीच्या योग्य विकासाची दिशा ठरविण्यासाठी राणी जाधव यांच्या समितीची स्थापनाही त्यांनी केली जाहीर होती. ती समिती तीन महिन्यांत सरकारला अहवाल देणार होती. तो अहवाल जनतेसमोर मांडला जाईल, असे गडकरी यांनी जाहीर केले, तेव्हाही पारदर्शीपणाच्या या अनोख्या भूमिकेने मुंबईकरांचा ऊर भरून आला  होता. याला तीन महिने उलटून गेले असले,        तरी अजूनही मुंबईने त्या विकासाचे स्वप्न बासनात गुंडाळलेले नाही. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात जेथे जेथे गडकरींनी दौरे केले, तेथे तेथे त्यांनी विकासाची स्वप्ने रुजविली. आजवर विकासाच्या नावाने महाराष्ट्रात खडखडाट होता, असे गडकरी यांनीच निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभांमधून अनेकदा सांगितल्यामुळे, जनतेची विकासाची भूक नव्याने प्रज्वलित झाली आहे. मराठवाडय़ाला चार हजार कोटींचे रस्ते देण्याची घोषणा गेल्या ऑगस्ट महिन्यात गडकरींनी केली, औरंगाबादला रिंग रोड करून तो सोलापूर महामार्गाशी जोडण्याचे स्वप्नदेखील गडकरी यांनी त्याच घोषणेसोबत रुजविले होते. गेल्या आठवडय़ात मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी मुंबईलादेखील भुयारी रिंग रोडचे स्वप्न दाखविले. मुंबईत हॉलंडच्या धर्तीवर रिंग रोडचे जाळे निर्माण करण्याचे आणि हा मार्ग अहमदाबाद महामार्गाला जोडण्याचे ९० हजार कोटींचे एक महागडे स्वप्न मुंबईकरांसमोर गडकरी यांनी ठेवले आहे. गडकरी यांनीच उभारलेल्या उड्डाण पुलांच्या जाळ्यानंतरही वाहतूक समस्या ढिम्मदेखील न हललेली मुंबई आता नव्या वेगाने धावणार, असे हे महत्त्वाकांक्षी स्वप्न उराशी घेऊन मुंबई आता नव्या दमाने धावू लागली आहे. या भुयारी रिंग रोडचा खर्च ९० हजार कोटींवरून ६० हजार कोटींवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितल्यामुळे तर त्यांच्याविषयीचा मुंबईचा आदरभाव दुणावला आहे. फक्त त्या कालबद्धतेचे तेवढेच आता काय ते पाहावे लागणार आहे. गेल्या सहा-सात महिन्यांत गडकरी यांनी घोषणांची अनेक उड्डाणे केली. मुंबईसह वेगवेगळी शहरे जलमार्गाने जोडण्याचा एक प्रकल्पही त्यांच्या स्वप्नात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक जहाज टर्मिनल, मुंबईच्या समुद्रात ५०० खोल्यांचे तरंगते हॉटेल, देशातील टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक टोल आकारणी, दररोज २५ किलोमीटर रस्त्यांची पूर्तता, आणि गेटवेजवळ आणखी एक जेट्टी अशी अनेक स्वप्ने आता प्रत्यक्षात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईतील भुयारी रिंग रोडच्या घोषणेमुळे काही स्वप्ने आता पुन्हा टवटवीत झाली आहेत. जनतेला स्वप्नसृष्टीत तरंगत ठेवायचे की स्वप्नपूर्ती करायची, एवढेच एकदाचे नक्की व्हायला हवे!