केंद्रात मंत्री झाल्यानंतर लगेचच कामाला लागलेले नितीन गडकरी यांना आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा लागून राहिलेली दिसते. दोन दिवसांपूर्वीपर्यंत ‘आपण दिल्लीतच ठीक आहोत. राज्यात येण्याची आपली अजिबात इच्छा नाही’, असे छातीठोकपणे सांगणारे गडकरी अचानक श्रेष्ठींचा आदेश आला तर तो स्वीकारण्याची भाषा कशी काय करू लागले, असा प्रश्न भारतीय जनता पक्षातील अनेकांना आता सतावू लागला आहे. गोपीनाथ मुंडे असेपर्यंत महाराष्ट्रातील पक्षाची  धुरा त्यांच्याच हाती होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर ही सूत्रे गडकरी यांच्याकडे आली, यात काही वेगळे घडले नाही. मुंडे असतानाही राज्याच्या भाजपमध्ये गडकरींचा वेगळा गट कार्यरत होताच. तो पुन्हा सक्रिय होण्यापूर्वीच राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. प्रचारादरम्यान फडणवीस यांनी भरपूर कष्ट घेतले आणि त्याचे फळ त्यांना मिळेल, अशी चर्चा असताना, अचानकपणे  गडकरी यांनी सत्तास्पर्धेत उडी घेणे वरवर आश्चर्यकारक वाटणारे असेलही, परंतु अनपेक्षित मात्र नाही. गडकरी आणि फडणवीस हे एकाच पक्षाचे व शहराचे आहेत, परंतु त्यांची मने एकमेकांना पूरक नाहीत, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. वरिष्ठ असल्याचा मान राखत फडणवीस गडकरींबद्दल आदरभावच व्यक्त करतात, परंतु तरीही त्या दोघांचे मनोमीलन आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत नाही. फडणवीस यांचे नाव पुढे पुढे सरकू लागले, त्याच वेळी गडकरी यांनी नागपुरात अतिशय नाटय़मय प्रवेश करत आपले संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणे ही बाब भाजपवासीयांसाठी नवलाईची होती. माध्यमांसमोर भाजपचे ज्येष्ठ नेतेही हातचे राखून बोलत असताना, गडकरी गटाचे खंदे समर्थक सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींचे नाव जाहीरपणे लावून धरण्याची हिंमत स्वत:हून करणे जवळजवळ अशक्य कोटीतले होते. तरीही त्यांनी वात पेटवल्यावर विदर्भातील आमदारांना आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी या फटाक्यात फुसक्या फटाक्यांची दारू ओतली. यापूर्वी विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे करत आपली व्यक्तिगत इच्छा हळूच जाहीर करून टाकली होती. एकनाथ खडसे यांनीही मग मागे राहण्याचे कारण नव्हते. अशा स्थितीत दबाव निर्माण करण्यासाठी राज्यातील आमदारांच्या तोंडून आपली मनोकामना व्यक्त करण्याची घाई गडकरी यांनी करण्याची गरज नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते आपली इच्छा सांगू शकले असते. भाजपही काँग्रेसच्याच मार्गाने जात असल्याच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी उपयोगी ठरणारा प्रतिसाद देण्याची खरे म्हणजे गडकरी यांची रीत नव्हे. सत्तातुराणांची चाल सर्व पक्षांत एकच असते, याचा अनुभव त्यांच्या या कृतीमुळे आला आहे. मुनगंटीवार आणि आपले विश्वासू आमदार यांना ताबडतोब गप्प बसण्याचे आदेश त्यांना देता आले असते. त्याऐवजी जाहीरपणे ओरडणाऱ्या या आमदारांकडे कौतुकमिश्रित चेहऱ्याने पाहत राहण्यातच त्यांना अधिक आनंद वाटला. त्यांच्या मागे राज्यातील  ८० आमदार असून त्यांचेच पारडे जड आहे, अशा प्रकारच्या बातम्या पेरून पक्षश्रेष्ठींना झुकायला लावण्याची ही पद्धत उतावळ्या नवऱ्याची आठवण करून देणारी आहे. भाजपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरी यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि राजकीय अनुभवाबद्दल शंका असण्याचे कारण नाही. परंतु त्याचा जाहीर पुनरुच्चार करणे हे सभ्य राजकीय संस्कृतीत बसणारे नाही. मग असे काय घडले की पक्षावर दबाव आणून हे पद मिळवण्याची त्यांना घाई झाली असावी? नागपूरमधील वाडा आणि बंगला संस्कृतीतील हा फरक ओळखण्याचे काम आता पक्षाच्या धुरिणांनाच करावे लागणार आहे.