जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत पकडण्यात आलेल्या मोहम्मद नावेद या दहशतवाद्यामुळे पाकिस्तानविरोधातील एक मोठा पुरावा भारताच्या हाती लागला असून, त्यामुळे येत्या काळात या दोन्ही देशांतील संबंध आणखी तणावाचे बनणार यात शंका नाही. भारत-पाकिस्तानमध्ये नेहमीच संघर्षांचे वातावरण राहावे यात ज्या शक्तींचे हित सामावलेले आहे त्या या संधीचा फायदा घेणार यातही शंका नाही. या दृष्टीने पाकिस्तानच्या इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचे माजी महासंचालक जन. हमीद गुल यांनी (वा त्यांच्या नावाने) करण्यात आलेल्या ट्विप्पण्या लक्षणीय आहेत. भारताने नीट वागावे, नाही तर आम्ही दिल्ली आणि मुंबईला आजचे हिरोशिमा आणि नागासाकी बनवू, अशी उद्दाम धमकी त्यांच्या नावाने असलेल्या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. काश्मीरचा प्रश्न एकदाचा सोडवून तरी टाका, नाही तर पाकिस्तानवर हल्ला करून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावा अशी आदळआपटही त्यांनी केली आहे. पाकिस्तानातील नेते भारताला अशा धमक्या देतात तेव्हा ते वेडे आहेत किंवा त्यातील पोकळपणा त्यांच्या लक्षात येत नाही असे नाही. तेव्हा त्या धमक्यांचा अर्थ पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात शोधावा लागतो. गुल यांच्या या भारतद्वेषामागे त्यांचा पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना असलेला विरोध आहे आणि तो लपून राहिलेला नाही. एकीकडे पाकिस्तानातून अशा प्रकारच्या भंपक विधानांनी वातावरण पेटविण्याचा प्रयत्न केला जात असताना भारतातील कट्टर उजव्या शक्तीही तेच काम करताना दिसतात. साध्वी प्राची यांचे विधान त्याचे निदर्शक आहे. त्या दहशतवाद्याला भारतीय राष्ट्रवाद्यांच्या हाती सोपवा अशी त्यांची मागणी आहे. भारतात दहशतवादाच्या मुद्दय़ावरून हिंस्र झुंडशाही निर्माण करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. एकंदर दोन्ही बाजूंच्या कट्टरतावाद्यांची कार्यक्रम पत्रिका समानच असून, भारतातील या तथाकथित राष्ट्रवाद्यांना हाताळण्याचे एक मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता करावे लागणार आहे. मोदी यांनी आपल्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आवर्जून पाचारण केल्यानंतर जे वातावरण निर्माण झाले होते त्याचा आता मागमूसही राहिलेला नाही. काश्मीरमध्ये पीडीपीशी हातमिळवणी करण्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. मात्र भाजप सत्तेत आल्याने तेथील परिस्थितीत फार काही गुणात्मक फरक पडलेला नाही. उलट सातत्याने तेथे सीमेपलीकडून गोळीबार व घुसखोरी केली जाते. नावेदला पकडल्यामुळे त्याचा सुस्पष्ट पुरावाच भारताच्या हाती लागलेला आहे. याआधी एवढे पुरावे सापडले त्याचे काय? तेव्हा या नव्या पुराव्याने असा काय फरक पडणार आहे? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ते तर्कशुद्ध वाटत असले तरी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानविरोधातील बाजू भक्कम करण्याकरिता त्याचा मोठा उपयोग होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. मात्र सध्याचा काळ हा असे भान गमावण्याचाच आहे. परिणामी मोदी सरकारवरील पाकविरोधात पावले टाकावीत, असा दबाव वाढणार आहे. या परिस्थितीतून मार्ग काढणे आणि देशाला संघर्षांच्या – अंतर्गत आणि सीमेवरीलही – टोकावर जाऊ न देणे यात मोदी यांच्या मुत्सद्देगिरीची कसोटी लागणार आहे.