अनेकांनी शिवसेना सोडली, पण म्हणून संघटना थांबली नाही.. राज ठाकरे यांचे बंड या अनेकांपेक्षा वेगळे होते. हे कंगोरे समजून घेतल्यास, ‘दोघे भाऊ एकत्र  येतील का?’ हा प्रश्न भाबडा ठरतो. अर्थात, सहकार्याचे अन्य पर्याय दोन्ही पक्षांना खुले राहतील..
ज्यांनी तब्बल साडेचार दशके  या महाराष्ट्राचे आणि देशाचेही सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवन ढवळून काढले, ज्यांच्या शब्दातच वादळ होते, ज्यांच्या काही भूमिकांचे पडसाद आंतरराष्ट्रीय पटलावरही उमटले, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले.  बाळासाहेबांच्या रूपाने गेली ४५ वर्षे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनावर घोंघावणारे वादळ शांत झाले. आता पुढे काय?
मातोश्रीपासून बाळासाहेबांची विराट अंत्ययात्रा निघाली. अथांग जनसागराचे दर्शन घडविणारी ती अंत्ययात्रा होती. त्या अफाट गर्दीतून बाळासाहेब गेले आता पुढे काय, हा प्रश्न वाट काढत शिवाजी पार्कपर्यंत पोहोचला होता. तो गर्दीच्या मनात उतरला होता आणि बाळासाहेबांना अखेरचा निरोप दिल्यानंतर जड अंत:करणाने परतणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होते, आता पुढे काय, या प्रश्नाच्या पोटात महत्त्वाचे आणखी दोन उप प्रश्न दडलेले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे यशस्वी नेतृत्व करू शकतील का आणि उद्धव व राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, या मूळ प्रश्नापेक्षा हे दोन उपप्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत आणि त्यांची उत्तरे मिळाली तरी आणि ते अनुत्तरित राहिले तरी त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, समाजकारणावर मूलगामी व दूरगामी परिणाम होणार आहे एवढे मात्र निश्चित, म्हणूनच केवळ शिवसैनिकांपुढेच नव्हे तर राजकीय जाण-भान असणाऱ्या प्रत्येक नागरिकासमोरही हा प्रश्न आहे की, बाळासाहेब गेले आता पुढे काय?
बाळासाहेबांनी ज्याला पोलादी म्हणता येईल अशी शिवसेना ही संघटना उभी केली. बाळासाहेबांची वज्रपकड या पोलादी संघटनेवर होती. संघटनेत आणि संघटनेच्या बाहेरही त्यांची एक वेगळी दहशत होती. तरीही त्यांच्या हयातीत या पोलादी संघटनेला धक्का देणारी, हादरा देणारी आणि नेतृत्वालाही अस्वस्थ करायला लावणारी छोटी-मोठी बंडे झाली. बाळासाहेबांनी तेवढय़ाच ताकदीने काही बंडे परतवली आणि काही पचवलीही.
राज ठाकरे यांच्या बंडाची अस्वस्थता मात्र त्यांच्या मनात कायम घर करून राहिली होती. त्याबद्दलच्या आतील वेदना त्यांनी अनेकदा बोलून दाखविल्या. बाळासाहेबांची संघटनेवर पूर्ण हुकूमत असतानाच उद्धव व राज यांच्यात नेतृत्वाचा संघर्ष सुरू झाला होता. यापूर्वी छगन भुजबळ  व नारायण राणे यांचे बंड झाले ते संघटनेतील मानसन्मानासाठी व सत्तापदांसाठी. त्यांचे आव्हान बाळासाहेबांना नव्हते तर दुसऱ्या फळीतील नेत्यांना होते. शिवसेनेची आक्रमक शैली या दोन नेत्यांच्या नसानसांत भिनली असली तरी, बाहेर पडून स्वतंत्र संघटना काढण्याचे धाडस कुणीही दाखवू शकले नाही. दोघांनीही सुरक्षित राजकारणाचा काँग्रेस हा पर्याय स्वीकारला. भुजबळ व राणे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ झाली. मात्र कालांतराने सारे काही विसरले गेले आणि आपापल्या जागी सारेच विसावले गेले.
राज ठाकरे यांच्या बंडाला अनेक कंगोरे आहेत. राज हे ठाकरे घराण्यातील आहेत. त्यांचे बंड मानसन्मानासाठीही असेल; परंतु त्याहीपेक्षा नेतृत्वासाठीही होते. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा दुसरा राजकीय पक्ष स्थापन केला, नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा असणारा नेताच असे धाडस करू शकतो. भुजबळ-राणेंना ते का जमले नाही?
अशा परिस्थितीत राज-उद्धव एकत्र येतील का, बाळासाहेबांनंतर पोरक्या झालेल्या संघटनेला हे दोघे भाऊ एकत्र येऊन सावरतील का, असे काही भाबडे प्रश्नही पुढे येऊ लागले आहेत. प्रश्न भाबडे अशासाठी की उद्धव व राज खरोखर एकत्र येतील का, आले तर ते एका संघटनेत एकत्र असतील की संघटना वेगवेगळ्या ठेवून तात्पुरती तडजोड म्हणून एकत्र येतील, अशी सारी प्रश्नांची मालिका पुढे वाढतच जाणार आहे.
त्याचे कारण असे की, बाळासाहेबांनी पुढच्या दोन पिढय़ांच्या नेतृत्वाचे मुखत्यारपत्र मुलगा उद्धव व नातू आदित्य यांना देऊन टाकले आहे. ४० वर्षे मला सांभाळलेत आता उद्धव व आदित्यला सांभाळा, या २४ ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यातील त्यांच्या अखेरच्या किंवा निरोपाच्या भाषणाचा तोच अर्थ होता. एखाद्या राजाने आपल्या वारसाला राज्य सांभाळायला सांगायच्या ऐवजी नगरीलाच सांगितले, नव्या राजाला सांभाळा म्हणून, अशी काही तरी गत झाली. अशा वेळी समजा राज शिवसेनेत परत आले तर त्यांचे संघटनेत नेमके स्थान काय राहणार?     
मुळात राज परत येतील का, याबद्दलच एक ठाम व दुसरा  संदिग्ध, असे दोन भिन्न मतप्रवाह आहेत. पहिला ठाम आहे तो नकारात्मक मतप्रवाह आहे. म्हणजे राज आता परतीच्या मार्गापासून खूप पुढे गेले आहेत, त्यामुळे ते माघारी येतील ही बेगडी चर्चा आणि भाबडी आशा म्हणावी लागेल. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. लोकसभा, विधानसभा व मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून त्यांनी राजकारणातील आपली दखलपात्रता सिद्ध करून दाखविली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला त्यांच्या राजकीय उपद्रवमूल्याची तीव्र जाणीव करून दिली होती आणि विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकून यशाच्या राजकारणाकडे आपली कूच सुरू आहे हेही दाखवून दिले होते. त्यांच्या पक्षाचा पसारा वाढतो आहे. नव्याने उभा केलेला हा सारा राजकीय संसार मोडून राज पुन्हा शिवसेनेत परततील, असे राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे बघितलेल्या नेत्यांना वाटत नाही.
राज व उद्धव वेगळे राहिले तर काय दु:ख आहे, तर मराठी मतांचे विभाजन होते. हे अनुमान शंभर टक्के बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांना मराठी माणसे मतदान करतात, त्याचे प्रमाण कमी अधिक असेल एवढेच. फार तर शिवसेनेची मराठी माणूस ही मतपेढी म्हणता येईल आणि त्यानुसार शिवसेनेच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही भावना योग्य म्हणता येईल. या मुद्दय़ावर कदाचित शिवसेना-मनसे विलीनीकरणाचा नव्हे तर निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा तडजोडीचा मार्ग निघू शकेल.
फुटीनंतरही सहकार्य कायम ठेवून आघाडी करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे उदाहरण राज्यातच आहे.  त्या दृष्टिकोनातून विचार करायचा  झाल्यास ज्यांनी एक स्वतंत्र पक्ष उभा केला आहे आणि तो राजकीय यशाच्या मार्गाने पुढे जात आहे, ते राज ठाकरे पुन्हा शिवसेनेत परततील याबद्दल कुणालाच खात्री वाटत नाही. आणि समजा त्यांनी तशी तयारी केली तर उद्धव ठाकरे त्यांना कसे स्वीकारतील, बरोबरीचा नेता म्हणून मान्य करतील का? बाळासाहेबांना मानणाऱ्या अनुयायांच्या भावना तर जपायच्या आहेत, पण दोन पक्षांचे विलीनीकरण मात्र अशक्य दिसते मग आपापले नेतृत्व, संघटना, अस्तित्व कायम ठेवून निवडणुकीत एकत्र येणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो. हा सगळा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार झाला. परंतु राज यांच्याशिवाय उद्धव शिवसेना पुढे नेतील का, निवडणुकांना आणखी दीड-दोन वर्षांचा अवधी आहे, तोपर्यंत बरेच पाणी वाहून जाणार आहे. उद्धव यांच्याही कसोटीचा तो काळ असेल. म्हणूनच आता पुढे काय, या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.