अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या भारत दौऱ्यात काय दिले आणि काय कमावले    याची चर्चा आता होतच राहील. त्यांनी भारताला काय दिले हा वादाचा मुद्दा असून, या दौऱ्याचे सर्वात मोठे यश म्हणून ज्या अणुकराराकडे बोट दाखविले जात आहे, त्यातील कमतरता ‘लोकसत्ता’च्या कालच्या संपादकीयाने पुरेशा स्पष्ट केल्या आहेत. या  दौऱ्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील स्नेहभाव अधिक दृढ केला हे खरे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ओबामा यांचा उल्लेख सलगीने बराक असा   करावा येथपर्यंत हे मत्र दोन देशांचे जडले असून, या दौऱ्याचे वर्णन करण्यासाठी काही इंग्रजी माध्यमांनी ब्रोमान्स या शब्दाची योजना केली आहे. भावांमधला रोमान्स असा त्याचा अर्थ. त्यात अतिशयोक्ती नाही असे काही म्हणता येणार नाही. ओबामा यांनीही त्यांच्या पद्धतीने सलगी दिली. मात्र जाता जाता त्यांनी भारताचे आणि विशेषत: मोदी सरकारचे  कानही टोचले. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ध्वजसलामी न दिल्याने उद्भवलेला वाद आणि त्यावर समाजमाध्यमांतून उमटलेल्या द्वेषमूलक व अज्ञानमूलक प्रतिक्रिया पाहता ते किती  आवश्यक होते हे लक्षात येते. सिरी फोर्ट स्टेडियममधील भाषणातून ओबामा यांनी आपल्याला केवळ महात्मा गांधींची अिहसा आणि स्वामी विवेकानंद यांचा बंधुभाव यांचीच नव्हे, तर आपल्याच राज्यघटनेचीही आठवण करून   दिली. व्यक्तीचा आत्मसन्मान, समानता, सहिष्णुता या मुद्दय़ांवर त्यांचा भर होता आणि धार्मिक स्वातंत्र्य हा त्यातील कळीचा भाग होता. भारतीय लोक शाहरुख खानचे चित्रपट पाहून टाळ्या वाजवतात, मिल्खा सिंग आणि मेरी कोम यांच्यासारख्या खेळाडूंचे यश साजरे करतात आणि नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या यशाचा अभिमान बाळगतात या    त्यांच्या वाक्याला टाळ्या पडल्या. पण तो त्यांचा उद्देश नव्हता. त्यांचा उद्देश येथील धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुता अधोरेखित करणे हा होता. आणि   त्याला पाश्र्वभूमी सत्तांतरानंतर अंगात वारे शिरल्याप्रमाणे बेभान झालेल्या आपल्याकडटय़ा धार्मिक कट्टरतावादाची आहे. त्यामुळेच यश मिळवायचे असेल, तर धार्मिक वा अन्य कोणत्याही मुद्दय़ांवरून भारताचे विभाजन होऊ देता कामा नये  ही ओबामांची कानपिचकी नेमकी कोणासाठी होती याबाबत कोणाच्याही मनात शंका असता कामा  नये. ओबामांची ही विधाने म्हणजे राजकीय प्रवचन होते येथपासून त्यामागे त्यांचा अमेरिकेतील धार्मिक मतपेढीच्या लांगूलचालनाचा प्रयत्न होता येथपर्यंत टीकारोप केले जात आहेत. त्यात तथ्य आहे असे मानले तरी त्याने त्यांचा मूळ मुद्दा गरलागू ठरत नाही. परकी गुंतवणूकदारांना ‘मेक इन इंडिया’ अशी साद घालायची असेल, तर त्यासाठी सामाजिक सौहार्दाचे वातावरण ही एक पूर्वअट असेल हाच ओबामा यांचा इशारा आहे. वाईट हेच की येथील विकासोच्छुक मध्यमवर्गही ही कानटोचणी मनावर घेण्याच्या मन:स्थितीत नाही. हमीद अन्सारी यांच्यावरील असभ्य टीकेने त्याचा प्रत्यय प्रकर्षांने आला.