डॉक्टरांना आपल्या मनस्थितीची कल्पना आली आहे, हे रुग्णाला लक्षात आल्यावर त्याचा हुरूप वाढतो. चार तपासण्या, चाचण्या, इलाज यांपेक्षा हा संवादाचा उपचार हवाहवासा वाटतो. लंडनमध्ये जन्मलेले आणि अमेरिकेला कर्मभूमी मानणारे ऑलिव्हर सॅक्स हे मेंदूविकारतज्ज्ञ असेच (मानसोपचारतज्ज्ञ नसूनही) रुग्णांची मनस्थिती जाणणारे.. पण त्यांचे काम अधिक कठीण, अधिक गहन. मेंदूची क्षमताच गमावू लागलेल्या रुग्णांना समजून घेण्याचे हे काम, म्हणजे साहित्यिकासारखेच. लेखकांना त्यांच्या पात्रांची सुख-दु:खे माहीत असतात, तसेच. ऑलिव्हर सॅक्स कालवश झाल्याच्या वार्तेने केवळ ते रुग्णच नव्हे,  इंग्रजी वाचकांचे जग हळहळते आहे, ते डॉक्टरी पेशातील अनुभवांची सांगड लेखनगुणांशी घालून मनोज्ञ ग्रंथनिर्मिती सॅक्स यांनी केली, म्हणून. काही रोगांत माणसे ओळख हरवून बसतात, त्यांच्या जीवनाचे साक्षीदार बनून त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतानाच त्यांनी इतर ज्ञात-अज्ञात रुग्णांना त्यांच्या लेखनातून जगण्याची प्रेरणा दिली. ‘अवेकिनग’ हे त्यांचे पुस्तक अनेकांना जाग आणणारे ठरले. पाíकन्सन म्हणजे कंपवात हा रोग अजूनही आटोक्यात आलेला नाही, त्यावर फार प्रभावी         उपचार आजही नाहीत, त्या काळात सॅक्स यांनी कंपवातामुळे अनेक वष्रे निद्रावस्थेत गेलेल्या लोकांवर ‘एल डोपा’ या औषधाचे प्रायोगिक उपचार केले होते, नंतर त्यावर ‘अवेकिनग’ नावाचाच चित्रपट आला. कुठल्याही आजारात लक्षणांवर उपचार न करता त्याच्या कारणांवर उपचार करणे महत्त्वाचे असते. सॅक्स यांची तुलना केवळ ‘द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’सारखी पुस्तके एकेका रुग्णावर बारा-बारा वर्षे काम करून लिहिणारे मनोविकारतज्ज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांच्याशीच होऊ शकते. सॅक्स यांनी रुग्णांविषयीच्या हजारो पानांच्या नोंदीतून ‘द अवेकिनग’ हे पुस्तक साकार केले. कवी डब्ल्यू. एच. ऑडेन यांनी या पुस्तकाचे कौतुक केले, त्या वेळी सॅक्स यांना रडू आवरले नव्हते. माणसाचा मेंदू हा वाद्यमेळासारखा असतो, पण त्या मफलीला दिग्दर्शन कुणाचेच नसते. त्यामुळे मेंदू व मानसिक रोगातही अनेकदा त्या रुग्णाला स्वत:लाच काही उत्तरे शोधावी लागतात. अनेकदा रुग्णांना रोगाशी झगडण्याच्या त्यांच्याच क्षमता त्यांना माहीत नसतात. त्यांची उमेद संवादाने वाढवता येते तशीच साहित्यानेही यावी, हे भान सॅक्स यांनी जपले. रुग्णांच्या      खासगी कहाण्या जाहीर करून एक प्रकारे सॅक्स यांनी वैद्यकीय नीतिमूल्यांचा संकेतभंग केल्याचे आरोप झाले, पण टीकेची ही फोलपटे गळून पडून, सॅक्स यांच्या हेतूचे सत्त्व उरले. अशा साहित्यकृती ही प्रामाणिकपणाची कृती असते. पण सॅक्स यांना ‘लिखाणाची कृती’देखील भारी आवडे. ‘न्यूयॉर्कर’ साप्ताहिक आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ यांच्यासाठी  त्यांनी भरपूर लिहिले. वयाच्या साठीनंतर तर, ‘दिवसेंदिवस मी लिहीत बसलेला असे आणि संध्याकाळी उठून काही तरी खाई’ असे सांगणारे सॅक्स आता यूटय़ूब आणि अर्थातच पुस्तकांतून उरले आहेत. डॉक्टर असूनही साहित्यात यशस्वी झालेल्या अलीकडच्या उदाहरणांमध्ये अतुल गावंडे व सिद्धार्थ मुखर्जी आघाडीवर आहेत. वैद्यक क्षेत्राला साहित्याची रुपेरी किनार लाभली तर काल्पनिक कथांपेक्षाही थक्क करणाऱ्या सत्यकथा हे अक्षरवाङ्मय ठरेलच; शिवाय वैद्यक शास्त्राची वाटचाल, त्यातील अनेक ज्ञात-अज्ञात गोष्टी सामोऱ्या येतील यात शंका नाही.