राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आणि आपल्या वक्तव्यांमुळे सतत टीकेला पात्र होणारे अजित पवार यांच्या पाणी तोडण्याच्या धमकीने पुन्हा एकदा राळ उडाली आहे. सुदैवाने राज्याचे गृहखाते राष्ट्रवादीच्याच ताब्यात असल्यामुळे निदान पोलिसांच्या पातळीवर तरी अजित पवार यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. त्यांनी धमकीच दिली नाही, असा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करणारे आप पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे हे असले, तरी त्यांचे सारे आयुष्य याच पोलीस खात्यात गेले आहे. अशी तक्रार करून आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांना असेल, असे वाटत नाही. त्यांनी केलेल्या तक्रारीत  मासाळवाडी येथील एका सभेत पवार यांनी बारामतीतील लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावचे पाणी बंद करून टाकीन, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे. पोलिसांचे म्हणणे असे, की अशी कोणती सभाच झाली नाही. एवढा निष्कर्ष काढून पोलीस खाते थांबले नाही, तर त्यांनी पवार यांनी धमकीही दिली नाही, असे सांगून टाकले. त्यानंतर अजित पवार यांचा नेहमीप्रमाणे केलेला खुलासा असा होता, की आपण असे काही बोललोच नाही. त्यानंतर ते असेही म्हणाले, की असे काही बोललो, तर मतदारच माझे पाणी कापतील आणि घरी पाठवतील. या वक्तव्याचे ध्वनिमुद्रण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून साऱ्या राज्याने ऐकले. तो आवाज त्यांचाच होता, याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही तिळमात्र शंका राहिली नसताना पोलिसांनी मात्र तो आवाज तपासला नाही. त्यांच्या मते सभा झाली नाही आणि धमकावणीचा प्रकारही घडला नाही. एक मात्र नक्की की, राज्यातील सगळ्यांना अजित पवार असे काही बोलू शकतात, असा दृढ विश्वास वाटतो. यापूर्वीच्या त्यांच्या विविध वक्तव्यांच्या ध्वनिफिती सतत ऐकून सगळ्यांना आता त्यांचा आवाज जसा ओळखता येतो, तशीच त्यांच्या आवाजातील जरबही. पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांना दूरध्वनीवरून ‘तुम्हाला काय आप पक्षाचे खासदार व्हायचे आहे काय?’ असे विचारणाऱ्या आणि पाण्यासाठी उपोषणाला बसलेल्या सामान्य माणसाची टिंगल करणाऱ्या किंवा रात्रीच्या उद्योगांबद्दल अश्लाघ्य भाषेत भाषण करणाऱ्या अजित पवारांचा इतिहास आता सारा महाराष्ट्र ओळखून आहे. निवडणुकीत साम, दाम, दंड आणि भेद अशा अस्त्रांचा वापर कसा होतो, याचा अनुभव मतदारांना प्रत्येक वेळी येतो. अजित पवार यांचे वक्तव्य खरे की खोटे याचा तपास खरे तर निवडणूक आयोगाने करायला हवा. मत दिले नाही, तर तुमचे नुकसान करीन, अशा वाक्याला पोलीस जर धमकी म्हणत नसतील, तर मग प्रश्नच मिटला. पण निवडणुकीच्या काळात असे बोलले गेले असेलच, तर त्याकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. अजित पवारांच्या मदतीला जरी शरद पवार धावून आले असले, तरी आयोगाने त्याची शहानिशा करायलाच हवी. कारण याच निवडणुकीत शरद पवार यांनीही शाई पुसण्याचा सल्ला दिलाच होता. त्यातून ते सुटतात न् सुटतात, तोच त्यांच्या पुतण्याने नवे वक्तव्य करून धुरळा उडवून टाकला. येत्या २४ तारखेपर्यंत अशी आणखीही काही वक्तव्ये ऐकण्याचे भाग्य महाराष्ट्रातील मतदारांच्या वाटय़ाला यायला नको असेल, तर त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. पोलिसांनी पवार यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून आपली फाइल बंद करून टाकली असली, तरी ते खाते राष्ट्रवादीच्याच ‘मालकी’चे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. याच वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम पाहिल्यावर आणखी काय काय वाढून ठेवले असेल, याचा अंदाज बांधणे फारसे कठीण नाही.