संजय गांधींच्या अकाली मृत्यूने सर्वपक्षीय राजकारण्यांनी सुटकेचा छुपा निश्वासच सोडला होता. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या देखरेखीत तयार होणारे राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी हाताळली, पण त्यांचा शोकात्म शेवट झाला. या साऱ्यांना बालपणीच फक्त पाहिलेल्या राहुल यांची प्रतिमा अनुत्साही राजकारणी अशीच असली तरी जगाचं लक्ष त्यांच्याकडे आहे..
काका-पुतण्यांच्या जोडय़ांनी गेली काही र्वष महाराष्ट्राच्या राजकीय आखाडय़ात भरपूर धुमाकूळ घातला आहे. राष्ट्रीय पातळीवर अशा स्वरूपाचं चित्र अभावानंच बघायला मिळालं, पण काँग्रेसचे युवा(?) नेते राहुल गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी एकमुखाने निवड झाल्यानंतर गेल्या पंधरवडय़ात उठलेल्या राजकीय धुरळय़ामध्ये त्यांच्या काकांची- दिवंगत संजय गांधी यांची पुन्हा एकदा आठवण झाली. खरं तर संजय गांधींची राजकीय शैली, कारकीर्द आणि तत्कालीन राजकारणाचे संदर्भही आजच्या तुलनेत खूपच वेगळे आहेत, पण १९७० ते ८०च्या दशकात पंतप्रधान म्हणून केवळ भारताचं नव्हे, तर या उपखंडाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या इंदिराजी यांच्याकडून राजकीय धडे घेता घेता संजय त्यांच्याही किती तरी पुढे निघून जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. मात्र त्याच्या आकस्मिक निधनाने गांधी घराण्यातील एका वादळी राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अस्त झाला.
तसं पाहिलं तर, १९७१ च्या मध्यावधी निवडणुकांच्या सुमारास संजय राजकीय क्षेत्रात सक्रिय झाला. त्यापूर्वीच त्याचा ‘मारुती उद्योग’ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. देशातील सामान्य माणसाला चार चाकी गाडी घेता यावी, असं भव्य स्वप्न या उद्योगामागे होतं, पण टाटांच्या नॅनोप्रमाणे ते संजयला प्रत्यक्षात आणता आलं नाही, कारण त्याची ती क्षमताच नव्हती. यानंतरची सुमारे चार र्वष तो इंदिरा काँग्रेसच्या राजकारणात हळूहळू पकड घेत गेला आणि २६ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली त्या दिवसापासून तो झपाटय़ाने प्रभावी सत्ताबाह्य केंद्र बनला. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्री किंवा अन्य नेतेच नव्हेत, तर लष्करी किंवा प्रशासकीय ज्येष्ठ अधिकारीसुद्धा संजयच्या दरबारात हजेरी लावत आदेश घेऊ लागले. काँग्रेसच्या पारंपरिक  राजकीय संस्कारात वाढलेल्या अनेकांना त्याची ही शैली पचनी पडली नाही, पण त्याला विरोध करणाऱ्या चंद्रशेखर, मोहन धारिया यांच्यासारख्यांची त्या वेळच्या अन्य प्रमुख विरोधी नेत्यांबरोबरच थेट तुरुंगात रवानगी झाली, तर महाराष्ट्राच्या विधिमंडळातील ‘हेडमास्तर’ म्हटले जाणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यासपीठाच्या पायऱ्या चढताना संजयच्या पायातून निसटलेला जोडा उचलल्याने बदनामी पदरी घेतली.
आणीबाणीनंतरचे पहिले सुमारे सहा महिने प्रशासकीय शिस्त आणि स्थानिक पातळीवर कामांचा निपटारा वेगाने होत असल्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळे आणीबाणी म्हणजे प्रशासकीय प्रतिक्रिया असल्यासारखं वाटत होतं, पण लवकरच इंदिराजींची एकूण कारभारावरची पकड ढिली पडत गेली आणि या प्रतिक्रियेचं सुडाच्या राजकारणामध्ये रूपांतर झालं. संजयच्या भोवती खुषमस्कऱ्यांचे घोळके जमू लागले. अंबिका सोनी, रुखसाना सुलताना यांसारख्या महिला अचानक सर्वत्र चमकू लागल्या. तत्कालीन संरक्षणमंत्री बन्सीलाल आणि माहिती व नभोवाणीमंत्री विद्याचरण शुक्ल हे दोघे तर संजयच्या धुडगुसाला अशा प्रकारे साथ देऊ लागले की, त्यानंतर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांमध्ये ‘आणीबाणी के तीन दलाल- संजय, शुक्ला, बन्सीलाल’ ही घोषणा एकदम हिट झाली. त्या निवडणुकांमध्ये इंदिराजींचा दारुण पराभव झाला.
‘गुंगी गुडिया’ म्हणून पंतप्रधानपदाची कारकीर्द सुरू केलेल्या इंदिराजींनी पाकिस्तानबरोबर १९७१ च्या निर्णायक युद्धात धारण केलेला दुर्गावतार त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कणखरपणाचा उत्तुंग आविष्कार होता. त्यानंतरच्या दोन वर्षांत मात्र देशातील राजकीय वातावरण झपाटय़ाने बदलत गेलं. त्यावर उपाय म्हणून इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली, पण हा उपाय रोगापेक्षा जालीम ठरला.
१९७७ च्या निवडणुकांनंतर काही काळ त्या अगदी एकाकी पडल्या, पण त्यांची हिंमत हरली नव्हती. जनता पक्षाचा पोकळ डोलारा अपेक्षेनुसार लवकरच (जुलै १९७९) कोसळला आणि जानेवारी १९८० मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये इंदिराजींनी पुन्हा सत्ता काबीज केली. त्यानंतर जेमतेम सहा महिन्यांनी २४ जून १९८० रोजी झालेल्या विमान अपघातात संजय गांधींचं आकस्मिक निधन झालं. हा धक्का केवळ इंदिराजींना नव्हता, तर तत्कालीन राष्ट्रीय राजकारणालाही त्यातून कलाटणी मिळाली.
राजकीयदृष्टय़ा अतिशय अडचणीच्या काळात पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या संजयच्या अकाली निधनाचं दु:ख इंदिराजींनी मोठय़ा धीरानं पचवलं. आपण मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, या अपराधीपणाच्या भावनेतून संजयच्या अनेक गैर गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, पण नियतीचा हा घाव जास्त खोलवर होता.
संजयच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार होत असतानाच, २५ जून १९८० रोजी संध्याकाळी दिल्लीत पोचलो होतो तेव्हा सर्वत्र विचित्र तणावाचं वातावरण होतं. त्यानंतरचे आठ दिवस ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांच्या सहकार्याने राजधानीत लालकृष्ण अडवाणी, यशवंतराव चव्हाण, पिलू मोदी, समर मुखर्जी ते अगदी संजयच्या खास गोटातील अंबिका सोनींपर्यंत अनेकांच्या गाठी-भेटी घेत ‘संजयनंतरच्या दिल्ली’चा साप्ताहिक ‘माणूस’साठी कानोसा घेत फिरत होतो. त्याच्या अकाली, अपघाती निधनाबद्दल सर्वाच्या बोलण्यात खेद जरूर होता, पण त्याचबरोबर १९७५ ते ८० या काळातील त्याच्या वादळी व वादग्रस्त राजकीय कार्यशैलीला कशा प्रकारे तोंड द्यावं, असा सर्वपक्षीय ज्येष्ठ राजकीय नेत्यांना पडलेला पेचही पुढे येत होता. संजयच्या अकाली जाण्याने तो परस्पर सुटला होता आणि त्याबद्दलचा सुटकेचा छुपा नि:श्वास त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. कारण ही सर्व नेतेमंडळी इंदिराजींशी राजकीय सामना करण्याच्या मानसिकतेची होती, पण संजयने ती राजकीय काळाची चौकटच (political time frame) विस्कटून टाकल्याची त्यांची भावना होती. आता ही चौकट पुन्हा जागेवर आली होती.
संजयच्या निधनानंतर राजकारणाबाबत काहीसे उदासीन असलेल्या ज्येष्ठ चिरंजीव राजीव यांना इंदिराजींनी नव्या दमाने राजकारणाचे धडे देण्यास सुरुवात केली. वैमानिक राजीव हळूहळू जमिनीवरच्या दाहक राजकीय वास्तवाला सरावत होते, पण त्यावर भक्कम पकड येण्याआधीच ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झालेल्या इंदिराजींच्या हत्येमुळे ते अनपेक्षितपणे राष्ट्रीय राजकारणाच्या मध्यभागी ढकलले गेले. मुळात त्यांच्या राजकारण प्रवेशाला पत्नी सोनिया यांचा विरोध होता, पण नियतीचे फासे अशा काही वेगाने आणि विचित्र पडत गेले होते की, राजीवना मागे फिरणं शक्य नव्हतं. आपल्या आजोबांपेक्षाही लोकसभेच्या जास्त जागा जिंकून १९८५ मध्ये सत्तेवर आलेले राजीव गांधी संजयपेक्षा खूपच वेगळे, सौम्य, सभ्य व्यक्तिमत्त्वाचे होते. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांनी पंजाब, आसामच्या प्रश्नांना हात घातला. पंजाबचे तत्कालीन नेमस्त नेते संत हरचरण लोंगोवाल आणि आसामच्या युवा आंदोलनाचे नेते प्रफुल्लकुमार महंत यांच्याशी त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी करार केले. श्रीलंकेत शांतिसेना पाठवण्याचा त्यांचा निर्णय (१९८७) मात्र चुकला. त्यांनी त्यामध्ये दुरुस्ती करत सेना माघारी घेतली, पण पुढे याच चुकीपायी त्यांना आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे राजीव गांधी त्या वेळच्या तरुण पिढीचे खरेखुरे प्रतिनिधी होते आणि या पिढीच्या आकांक्षांचा नेमका वेध घेत राजीवनी सॅम पित्रोदा यांना मुक्त संधी देत देशात प्रथम माहिती व तंत्रज्ञानाचा भक्कम पाया घातला, पण त्यांचा स्वकीयांनीच घात केला. त्यांच्याबरोबर डून स्कूलमध्ये शिकलेले अरुण सिंग, अरुण नेहरू यांसारख्या सवंगडय़ांनी उत्तर प्रदेशातील ‘राजासाब’ विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याशी हातमिळवणी करून राजीवना घेरत राजकीय बळी घेतला. त्यानंतर डाव्या-उजव्यांच्या कुबडय़ा घेऊन सत्तेवर आलेलं विश्वनाथ प्रताप सिंह यांचं सरकार १९७७ च्या जनता पक्षाप्रमाणेच अंतर्विरोधांमुळे डळमळू लागलं. त्यातच मंडल-कमंडलूचा संघर्ष पेटला आणि ही आवळ्या-भोपळ्याची मोट फुटली. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी चंद्रशेखरांचं औट घटकेचं राज्यही राजीव गांधींविरोधात हेरगिरीच्या संशयकल्लोळातून कोसळलं. पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांशिवाय पर्याय उरला नाही. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच राजीव गांधींची हत्या झाली. २१ व्या शतकाचं खऱ्या अर्थाने स्वप्न पाहणाऱ्या, सद्हेतूने प्रेरित तरुण राजकीय नेतृत्वाचा तो शोकात्म शेवट होता !
राजीवच्या हत्येनंतर सात-आठ र्वष राजकारणापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या सोनियाही गेल्या शतकाच्या अखेरीस त्या वावटळीत ओढल्या गेल्या. दीर, सासूबाई आणि पतीची राजकीय कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली होती. देश आणि भाषेचे अडथळे निग्रहपूर्वक ओलांडत, सत्तेच्या पदापासून अंतर राखत सोनियांनी काँग्रेसला सलग दोन निवडणुका जिंकून दिल्या आणि आता राहुल गांधी हा झेंडा घेऊन पुढे निघाले आहेत. काका आणि आजीबद्दल त्यांच्या मनात एखाद्या बालकाच्या पातळीवरच्या आठवणी आहेत. राजीव यांचं निधन झालं तेव्हाही ते जेमतेम विशीत होते. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाकडूनही राजकीय धडे त्यांना मिळू शकलेले नाहीत. मात्र या पूर्वसुरींच्या परंपरेचं मोठं ओझं त्यांच्या खांद्यावर आहे. सोनियांकडून त्यांनी घेतलेला, सत्ता विषासारखी असते, हा संदेश तात्त्विकदृष्टय़ा मोलाचा असला तरी व्यवहारत: पचवायला अतिशय कठीण आहे. संजय-इंदिराजींचा काळ तर सोडूनच द्या, गेल्या दशकातसुद्धा देशाचं राजकारण कमालीचं गुंतागुंतीचं होत गेलं आहे. जयपूरच्या चिंतन शिबिरात राहुलनी केलेलं भाषण हृदयाला जरूर भिडलं, पण त्यात मेंदूसाठी फारसं खाद्य किंवा दिशा नव्हती. शिवाय, आत्तापर्यंतची त्यांची प्रतिमा अनुत्साही राजकारणी (reluctant politician) अशी राहिलेली आहे आणि आपला करिश्मा दाखवण्यासाठी त्यांच्या हातात जेमतेम एक वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. आजीने रुजवलेल्या आणि काका, आई-वडिलांनी जोपासलेल्या इंदिरा काँग्रेसचा वृक्ष राहुलना केवळ जगवायचा नाही, तर फुलवायचा आहे. त्या दृष्टीने या ताज्या दमाच्या आणखी एका गांधीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.