अमेरिकेच्या माजी परराष्ट्र अधिकारी रॉबिन राफेल यांच्यावर हेरगिरीचा संशय असून एफबीआयतर्फे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यात तसे विशेष काही नाही. एक तर, राफेलबाईंच्या कारकिर्दीची सुरुवातच सीआयएमधून झाली होती. दुसरे म्हणजे परराष्ट्र खात्यातील एखादा अधिकारी गुप्तहेर असणे ही तशी सर्वाना माहीत असलेली गोष्ट आहे. विदेशात काम करण्यासाठी गुप्तहेरांना आपल्या दूतावासातील असे एखादे पद चांगलेच उपयोगी पडते. तेव्हा राफेलबाई गुप्तहेर होत्या यात काहीच नवल नाही. धक्का निराळाच आहे. या बाई पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याचा संशय आहे. त्याच कारणावरून गेल्या २१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घर आणि कचेरीवर एफबीआयने छापा घातला. अनेक कागदपत्रे हस्तगत केली. भारतीय परराष्ट्र आणि हेरखात्यातील अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांसाठी ही आनंददायकच घटना म्हटली पाहिजे. याचे कारण या बाई कट्टर पाकमित्र होत्या. १९९१ मध्ये नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासात राजकीय सल्लागार म्हणून काम करीत असताना या बाईंनी काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारताला प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीरचे सामीलीकरण, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, सिमला करार या सगळ्यालाच त्यांचा विरोध होता. या बाई अमेरिकेचे अध्यक्ष बिल िक्लटन यांच्या जवळच्या, ‘बिल बॉइज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटातल्या. त्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशांतील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी िक्लटन यांनी जेव्हा खास गट स्थापन केला, तेव्हा त्याच्या पहिल्या सहायक सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेथे तर त्यांनी कहरच केला. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वापरले गेलेले डिटोनेटर्स आणि इतर पुरावे वॉिशग्टनला पाठविण्यात आले. तेच गायब करण्यात आले. एकदा तर ‘भारताने पाकिस्तानातील रॉच्या कारवाया थांबवाव्यात, नाही तर भारताला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करू’ अशी धमकीच त्यांनी दिली. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी थेट अमेरिकेवरच दहशतवादाकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे तसे शांत स्वभावाचे, पण तेही वैतागले. राफेलबाईंची वक्तव्ये भारत-अमेरिका संबंधांसाठी साह्य़ करीत नाहीत, अशी गíभत धमकी त्यांनी दिली. काश्मीरमधील हुरियतच्या निर्मितीतही त्यांचा हात असल्याचे मानले जाते. या बाईंचा हा भारतद्वेष कोठून आला हे येथे समजून घेणे गरजेचे होते. जनरल झिया ज्या विमान अपघातात मारले गेले, त्याच विमानात राफेल यांचा पती होता. हा अपघात रॉने केल्याची अफवा आहे. अशा गोष्टींचा परिणाम माणसाच्या विचारसरणीवर होत असतो. या बाई २००५ मध्ये परराष्ट्र विभागातून निवृत्त झाल्या. २००९ मध्ये त्यांची पाकिस्तानातील मदतकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती झाली. गेल्या महिन्यापर्यंत त्या परराष्ट्र विभागात अफगाण-पाकिस्तान विशेष प्रतिनिधी कार्यालयात काम करीत होत्या. त्यांचे कारनामे अमेरिकेला माहीतच नसतील असे नाही. तेव्हा त्यांच्यावर आताच कारवाई का झाली हे कोडेच आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात योगायोग नावाची गोष्ट असते असे गृहीत धरले, तर यातील एक योगायोग पाहण्यासारखा आहे. गेल्या महिन्यात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी एक गौप्यस्फोट केला- पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी तालिबानला मदत करावी, असे राफेल यांनी सांगितले होते! ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर तीनच दिवसांत राफेल यांचा ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ काढून घेण्यात आला. ही त्यांच्यावरील कारवाईची सुरुवात होती. त्याची दिशा अजून नेमकी स्पष्ट झालेली नाही. एक मात्र खरे, की अमेरिकेसाठी अत्यंत लाजिरवाणे असेच हे प्रकरण आहे.