पुस्तकातला किडा नसले तरी वाचलेल्या पुस्तकाच्या वर्मावर बोट ठेवणं किंवा पुस्तक आवडलं नसल्यास वर्मी घाव घालणं हे दोन्ही करू शकणारे लोक अजिबात कमी नाहीत.. अशा वाचकांनी एकेका पुस्तकाचा घेतलेला हा धांडोळा, दर पंधरवडय़ाला.
त्याने मनात आणलं तर वेगाच्या बाबतीत विमानालाही मागे टाकू शकतो, त्याने दिवाळीत आकाशात फेकलेली पेटती फुलबाजी सूर्य म्हणून ओळखली जाते, तो न्यायाधीशांच्या पेनातील शाई रिव्हर्स पाठवून न्यायालयाचा निकाल फिरवतो, तो एकाच चेंडूवर दोन षट्कार मारू शकतो, ग्लोबल वार्मिगमुळे वितळत असलेले हिमनगही त्याचे नाव ऐकताच गारठून जातात..
वरील सर्व गोष्टी करू शकणारा एकमेव माणूस या ग्रहावर आहे आणि तो म्हणजे ‘सुपरस्टार’ रजनीकांत. दाक्षिणात्य चित्रसृष्टीचा ‘सुपरहिरो’ असलेल्या रजनीकांतबद्दल इंटरनेट, मोबाइल, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरलेल्या  ‘फॅक्ट्स’ अतिशयोक्त आहेतच, पण यातून व्यक्त होणारी त्याची प्रतिमा निश्चितच अतिशयोक्त नाही.
दक्षिणात्य चित्रपटांचे भलतेच वेडे. तिकडे आजही चित्रपटाच्या पहिल्या शोदरम्यान पैसे फेकून किंवा फुले उधळून स्तुती केली जाते. नटनटय़ांचे साठ-साठ फुटी कटआउट उभारून त्याला दुधाने आंघोळ घातली जाते. सुपरस्टार्सची मंदिरं बांधून पूजा केली जाते. शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांतच्या वाटय़ाला हे सारं आलंच; पण त्याने त्यापेक्षाही खूप काही कमावलं. रजनीकांत हा आज केवळ सुपरस्टार नाही तर,  एक पंथ, एक गाथा, एक अवतार बनला आहे. शिवाजी गणेशनपासून चिरंजीवी कमल हसनपर्यंत सर्वानाच दक्षिणेतल्या सिनेमावेडय़ा प्रेक्षकाने भरभरून प्रेम दिलं, पण रजनीकांतला जे देवपण आणि माया मिळाली, ती क्वचितच अन्य कुणाच्या वाटय़ाला आली.
यामुळेच जेव्हा आपण ‘रजनीकांत : द डेफिनिटीव्ह बायोग्राफी’ हे नमन रामचंद्रन यांनी लिहिलेलं चरित्र वाचायला घेतो, तेव्हा ‘रजनीकांत’ या व्यक्तिमत्त्वाची जादू, तिचा करिष्मा आणि गेली तीन दशकं दाक्षिणात्य समाजमनावर असलेला त्याचा दबदबा याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता मोठी असते. दुर्दैवानं यातलं काहीच या चरित्रात येत नाही. सुमारे ३३ वर्षांपूर्वी बंगलोर ट्रान्स्पोर्ट कॉपरेरेशनच्या श्रीनगर-बंगलोर बसमध्ये तिकीट देणारा कंडक्टर त्या पुढच्या दशकभरात सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गल्ला जमवून देणारा स्टार बनतो, हा प्रवास रामचंद्रन यांनी विस्तृतपणे मांडला आहे. मात्र, तो कसा घडला, हे सांगताना त्यांचे प्रयत्न अपुरे पडलेले दिसतात. उदा., हातातून फेकलेली सिगरेट हवेत फेकून अलगद तोंडात पकडणे, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत मागच्या खिशातून फणी काढून केसांवर फिरवून ती पुन्हा खिशात ठेवणे अशा अनेक ‘रजनी’स्टाइल्स कशा तयार झाल्या, हे एकसंधपणे कुठेही येत नाही. या स्टाइल्सनीच गेल्या तीन दशकांतील तरुणाईला वेड लावलं आहे. त्याबाबत वाचकाची उत्सुकता शमवण्यात रामचंद्रनना फारसं यश आलं नाही.
रजनीकांत पहिली २०-२५ र्वष अत्यंत सामान्य आयुष्य जगत होता, मात्र, त्यातही प्रत्येक वेळी ‘रजनीकांत हा सुपरस्टारच आहे’ हे जाणवून देण्याचा अट्टाहास खटकतो. एखाद्याला देवत्व बहाल केलं तर त्याचं सारं काही श्रद्धेय होतं, तसंच काहीसं या चरित्राचं झालं आहे. त्यामुळे सामान्य रजनीकांत आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यात असलेला कमालीचा फरक पुस्तकात पुसट होतो.
रजनीकांतचे चित्रपटक्षेत्रातील गुरू के. बालचंद्रन, त्याचे वडील बंधू सत्यनारायणन, अन्य कुटुंबीय, दिग्दर्शक, सहकारी कलाकार आणि खुद्द रजनीकांत यांच्याशी बोलून तसेच रजनीकांतच्या सर्व चित्रपटांचा अभ्यास करून हे चरित्र लिहिलं आहे. त्यामुळे ‘डेफिनिटिव्ह’ अर्थात आतापर्यंतचे सर्वात खरे चरित्र हा दावा योग्य मानता येईल.
याशिवाय रजनीकांतचं बालपण उलगडणारे सत्यनारायणन, त्याच्या कंडक्टरकीचे साक्षीदार राजा बधार, सिनेसृष्टीतले त्याचे गॉडफादर बालचंद्रन आणि त्याचे साधेपण सांगणारे सहकलाकार यांना बोलतं करून रामचंद्रन यांनी रजनीकांतच्या विविध पैलूंचा कोलाज चितारायचा प्रयत्न केला आहे.  दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांमध्ये दोन उभे गट पाडणाऱ्या ‘रजनीकांत विरुद्ध कमल हसन’ या स्पर्धेबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. पण अशी कोणतीही स्पर्धा आमच्यात नाही, हे दोघे कलाकार आवर्जून सांगतात. रजनीकांतनं तर ‘कमल हसन नसता तर मी अभिनेताच बनू शकलो नसतो’ असं सांगून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या दोघांच्या मैत्रीचा हळवा अध्याय लेखकानं प्रभावीपणे मांडला आहे.
रजनीकांतच्या सर्व चित्रपटांची यादी हे या चरित्राचं एक वैशिष्टय़ मानता येईल. ‘शिवाजी द बॉस’ या अलिकडच्या काळातील चित्रपटात तिशीतल्या अभिनेत्याची भूमिका करणारा रजनी त्याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या खऱ्याखुऱ्या, कोणताही मेकअप नसलेल्या अवतारात लुंगी आणि शर्ट घालून येतो, हेच त्याच्या साधेपणाचं उदाहरण आहे. तो साधेपणा, त्याची धार्मिक ओढ, समाजप्रेम, दानशूरपणा या गुणवैशिष्टय़ांवरही रामचंद्रन यांनी नेमका प्रकाश टाकला आहे.  
दुसरं वैशिष्टय़ म्हणजे, रजनीकांतची जडणघडण मांडतानाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे केंद्र असलेल्या तामिळनाडूतील राजकीय व सामाजिक बदलांचाही वेध घेतला आहे. गेल्या ३५ वर्षांत ज्या राज्याचा मुख्यमंत्री या ना त्या कारणाने चित्रपटसृष्टीशी जोडला गेला आहे, त्या राज्यातील स्थित्यंतराचा आढावा रजनीकांतच्या अनुषंगाने घेण्याची कल्पना अभिनव आहे.
दक्षिण भारतासह जगभरात रजनीकांतचे करोडो चाहते आहेत, पण बॉलिवूडमध्ये तो यशस्वी का ठरू शकला नाही, याचं उत्तर लेखकानं खुबीने टाळलं आहे! ‘अंधा कानून’मधून हिंदीत झळकलेल्या रजनीच्या नावावर एकही ‘सोलो हिट’ का नाही, याची कारणमीमांसा होणं गरजेचं होतं.
रजनीकांतचा गरीब हवालदाराच्या मुलापासून चित्रपटसृष्टीच्या हुकमी एक्क्यापर्यंतचा रोमांचक प्रवास रेखाटणारा हा ‘रजनी एन्सायक्लोपीडिया’ म्हणता येईल. थोडक्यात रजनीकांतचं ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिमत्त्व उमटवण्यात हे चरित्र काही प्रमाणात नक्कीच यशस्वी झालं आहे.