मराठय़ांनी विकसित केलेल्या संस्कृतीच्या आधारस्तंभ असलेल्या संस्था म्हणजेच चार फड होत. भजन-कीर्तनाचा फड, राजकीय आणि आर्थिक बाबींचा विचार व सांभाळ ज्या ठिकाणी होत असे त्यालाही फडच म्हणत. शारीरिक बळाची जोपासना करणारा जो आखाडा तोच कुस्त्यांचा फड आणि कलेच्याच माध्यमातून मनोरंजन करून लोकांना प्रफुल्लित ठेवणारा चौथा तमाशाचा फड.
एखादा समाज पुढे जातो, मागे पडतो किंवा ‘जैसे थे’ परिस्थितीत राहतो, असे आपण सहजपणे म्हणतो खरे, तसे का होते याची चर्चाही प्रसंगी होत असते. या चर्चेत निरनिराळ्या कारणघटकांचा संदर्भ देण्यात येतो. ते अभ्यासक व्यक्तिवादाचा (Individualism) स्वीकार करतात. ते त्याची जबाबदारी त्या समाजाचा घटक असलेल्या व्यक्तींवर ढकलतात. त्या व्यक्तीच्या स्वभाववैशिष्टय़ांचा आधार घेतला जातो. पूर्वी जपानी, तर आता इस्रायली समाजाच्या बाबतीत असे घडल्याचे दिसून येते.
व्यक्ती हाच समाजाच्या जडणघडणीचा अंतिम घटक असल्यामुळे या विचारसरणीचा स्वीकार करण्यात अडचण येत नाही; पण येथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. व्यक्तींचे विचार आणि कृती चालू असतात ते सहसा आपण एका व्यापक समूहाचे घटक आहोत या जाणिवेतून नव्हे. जपानी माणूस एखादे कर्म करतो ते आपण जपानचे नागरिक आहोत या जाणिवेतून नव्हे, तर तो त्या समाजातील ज्या लहान-मोठय़ा संस्थेचा, यंत्रणेचा हिस्सा असतो, त्या संस्थेशी वा यंत्रणेशी असलेल्या साक्षात बांधीलकीतून.
ज्या समाजात अशा सक्षम संस्था आणि यंत्रणा पुरेशा कार्यरत असतात तो समाज टिकून राहतो, पुढे जातो, असे म्हणायला हरकत नाही. ज्या समाजात अशा संस्थांचा व यंत्रणांचा अभाव आहे किंवा असलेल्या संस्था, यंत्रणा कार्यक्षम नाहीत तो मागे पडतो. आधुनिक काळात इंग्लंड हे राष्ट्र एकदम पुढे आले त्याचे एक कारण तेथे अशा प्रकारच्या संस्थांची व यंत्रणांची बांधणी व्यवस्थित झाली होती, असे देता येते. या कारणामुळेच कदाचित एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी महाराष्ट्रात वेगवेगळ्या संस्था अथवा मंडळे निघायला सुरुवात झाली. या प्रक्रियेला इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मंडळीकरण असे नाव दिले. स्वत: राजवाडय़ांना या प्रक्रियेत कमालीचे स्वारस्य होते. त्यांनी स्वत: अशा काही संस्था काढल्या, काही संस्था काढण्याची सूचना केली. वस्तुत: अशा संस्था वा संघटना चालवण्याची त्यांची पिंडप्रकृती नव्हतीच, पण तरीही त्यांना तशी उत्कट इच्छा व्हावी व त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न करावा यातच सर्व काही आले. अशा यंत्रणांची उभारणी करण्यासाठी जी सोशीकता व धीर लागतो त्याचा राजवाडय़ांकडे अभाव होता. याउलट न्या. म. गो. रानडे यांच्याकडे हे गुण प्रकर्षांने होते. त्यामुळे या बांधणीच्या कामात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले, असे इतिहास सांगतो.
जैविक पद्धतीचा अवलंब करून सांगायचे झाले, तर व्यक्ती या समाजपुरुषाच्या शरीरातील पेशी, तर उपरोक्त संस्था, संघटना, यंत्रणा म्हणजे त्याचे अवयव असे म्हणता येईल. पेशी या अंतिमत: शरीराच्याच असल्या व म्हणून त्यांचे कार्य शरीराच्या भरणपोषण रक्षणासाठीच चालले असले तरी त्या पहिल्यांदा शरीराच्या कोणत्या तरी अवयव घटक असतात (जसे मेंदू) व त्या अवयवाच्या माध्यमातून त्यांचे शरीराचे व शरीरासाठी कार्य चालू असते. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांच्या प्रभावाने म्हणजेच युरोपियन संस्कृतीच्या अनुकरणाने सुरू झालेली आपल्या समाजाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया १९५० मधील संविधानाच्या स्वीकाराने पूर्ण झाली, असे म्हणता येते. (ती कितपत यशस्वी झाली आहे हा मुद्दा वेगळा, कारण अजूनही जात पंचायतींची दहशत जारी आहे. पाश्चात्त्यांच्या धर्तीवर उभारलेल्या संस्थांचा व यंत्रणांचा कौशल्याने केला जाणारा दुरुपयोग हा तर नित्याच्या अनुभवाचा भाग!) साहजिकपणे आपल्याच समाजाचा अभ्यास करणारे संशोधक- अभ्यासकही चर्चा करताना युरोपात वापरली जाणारी प्रारूपे, मॉडेल्स, पॅरेडाइम्स, संकल्पना-चौकशी यांच्या आधारेच बोलत असतात.
याचा अर्थ असा घ्यायचा का, की पूर्वी म्हणजे उदाहरणार्थ यादवकाळात, शिवकाळात, पेशवाईत आपल्या समाजात संस्था, संघटना, यंत्रणा नव्हत्याच? पण मग आपण जो प्रचंड व्याप असलेल्या सामाजिक, राजकीय उलाढाली केल्या त्या कशाच्या जोरावर? कोणत्या आधारावर? अशा काही संरचना अस्तित्वात असतील, तर निदान इतिहासकालीन समाजाची चर्चा करताना त्यांचा संदर्भ घ्यायला नको का? शिवाय त्यांचा संदर्भ त्यानंतरच्या म्हणजे आजच्या समाजाची चर्चा करताना, तो समजावून घेताना दिला, तर त्यात काही प्रमाद तर घडणार नाही ना? की अगदी आजच्या समाजातसुद्धा जुन्या संस्था-संघटनांचे अवशेष टिकून असतील, तर असे संदर्भ उपयुक्त ठरतील?
आपल्या म्हणजेच मराठी समाजाच्या स्थितिगतीची चर्चा करताना ज्या संस्था अशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतात त्यांच्यात सर्वात अधिक महत्त्व आहे ते फडाला!
मराठय़ांनी विकसित केलेल्या संस्कृतीच्या आधारस्तंभ असलेल्या संस्था म्हणजेच चार फड होत. भजन-कीर्तनाचा फड ही पहिली संस्था होय. या फडामध्ये समाजाच्या आत्मिक आणि नैतिक अंगाची जोपासना केली जाई. राजकीय आणि आर्थिक बाबींचा विचार व सांभाळ ज्या ठिकाणी अथवा कचेरीत होत असे त्यालाही फडच म्हणत. शारीरिक बळाची जोपासना करणारा जो आखाडा तोच कुस्त्यांचा फड आणि कलेच्याच माध्यमातून मनोरंजन करून लोकांना प्रफुल्लित ठेवणारा चौथा तमाशाचा फड. मराठी समाजाची धारणा करणारी ही संस्थात्मक रचना होय. खरे तर तिला मराठी समाजाची चतुर्धा प्रकृती म्हणायला हरकत नाही. मराठय़ांच्याच काय, पण कोणत्याही समाजाच्या स्थितिगतीची चिकित्सा या प्रारूपाने करता यावी. (त्यासाठी फड हाच शब्द वापरण्याचा आग्रह असायचेही कारण नाही.) समाजाच्या निकोप प्रकृतीसाठी म्हणजेच स्वास्थ्यासाठी या चार घटकांचे संतुलन किंवा समतोल असणे गरजेचे असते. हे संतुलन बिघडले, की विकृती-अस्वास्थ्य ठरलेले आहे.
मराठय़ांच्या इतिहासातील या चार फडांमधील परस्परसंबंध हा महत्त्वाचा विषय होऊ शकतो. आर्थिक-राजकीय अंगाशी म्हणजे ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ शी संबद्ध असलेली सरकारी कचेरी विशेषत: पेशवाईत बरेच महत्त्व प्राप्त करून बसली. मराठय़ांचे राज्य हिंदुस्थानभर पसरल्यामुळे चारी दिशांकडून येणारा महसूल, त्यांचा हिशेब आणि इतर राजकीय पत्रव्यवहार यांचा निपटारा या फडातून होऊ लागला. नाना फडणीस / फडणवीस हे नाव त्यामुळे सर्वतोमुखी झाले. नानांना सखारामबापूंसारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धीही होते, पण हा फड म्हणजे नुसती कारकुनी किंवा नुसता हिशेब नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. त्याला मुत्सद्देगिरीची जोड अवश्य हवी.
अशाच सरकारी फडावरील नोकरी सोडून भजन-कीर्तनाच्या फडात प्रवेश केलेल्या ज्योतिपंतदादा महाभागवत यांनी भागवतावर निरूपणे करता करता शेकडो विठ्ठल मंदिरांची उभारणी केली. पेशवाईतील प्रभाकर (दातार) आणि आंग्लाईतील पठ्ठे बापूराव (कुलकर्णी रेठरेकर) हे जातीने ब्राह्मण, पण पहिल्याने फडावरील कारकुनीचा त्याग करून थेट तमाशा काढला, तर दुसऱ्याने कुलकर्णी सोडून शाहू छत्रपतींच्या कुस्तीच्या फडात कौशल्य दाखवून मिळालेल्या दोनशे रुपयांची गुंतवणूक करून तमाशाचा फड उभारला. उलट राम जोशी आणि अनंत फंदी हे तमाशाच्या फडावर रंगलेले उच्चवर्णीय अनुक्रमे मोरोपंत आणि अहल्याबाई यांच्या उपदेशाने कीर्तनाकडे वळले. मुळात हरिदासी कीर्तनकार असलेल्या माणकेश्वरावर पेशवा रावबाजीची मर्जी बसली आणि तो नानासारखा राजकीय मसलतीच्या फडाचा कारभारी बनला. ब्रिटिश राजवटीत हा फड कायमचा निकालात निघाला. तमाशाला आश्रय देणाऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने लावण्यांना ओहोटी लागली. मराठी सैनिक बेकार झाल्यामुळे बलोपासना आणि युद्धकर्म यांच्यातील अन्योन्यसंबंध संपुष्टात येऊन कुस्ती, दांडपट्टा, बोथाटी ही कौशल्ये उत्सवी प्रदर्शनापुरती उरली.
महाराष्ट्रात हरिकीर्तनाच्या फडाची सुरुवात संत नामदेवांनी केली असे दिसते. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ हे त्यांचे ब्रीदवाक्यच होते. नामदेवांचे वर्णन करताना तुकोबांनी ‘शिंपियाचा पोर एक खेळिया नामा। तेणे सतंतर फड जागविला रे।।’ असे म्हटले आहे ते यामुळेच. पण भजन-कीर्तनाच्या या फडावर केवळ अध्यात्माची आणि परमार्थाची चर्चा व्हायची असे समजायचे कारण नाही. तेथे समाजाची नैतिक समीक्षाही होत असे. विशेषत: इतर तीन घटकांनी आपापल्या मर्यादा सोडू नयेत व संतुलन बिघडवू नये यासाठी त्यांना ईश्वरी सत्तेचा धाक दाखवणे हे भजन-कीर्तनाच्या फडाचे काम होते. या फडावरील चर्चा फक्त अध्यात्मापुरती संकुचित झाली ती नंतर ब्रिटिश राजवटीत! पण त्याची सुरुवात उत्तर पेशवाईत म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातच झाली होती. निळोबा पिंपळनेरकर हे वारकरी परंपरेतील अखेरचे संत. त्यानंतर कोणी संत झाला याचा अर्थच मुळी समाजाची नि:स्पृह आणि निरपेक्ष नैतिक समीक्षा थांबली असा होतो, पण त्यामुळे समाजाची आर्थिक, राजकीय, बलात्मक आणि कलात्मक अंगे स्वतंत्रपणे किंवा निरंकुश स्वैरपणे वाढीस लागली हेही ध्यानात घ्यायला हवे. अलीकडच्या काळातील महाराष्ट्राची आर्थिक, राजकीय व्यवस्था सहकारी कारखानदारीच्या अंगाने विकसित झाली. त्यामुळे आर्थिक, राजकीय फड उसाच्या फडावर अवलंबून राहू लागला. त्यातून झालेल्या विकासाची फळे चाखणाऱ्या तरुणांचा वर्ग ‘कलाकेंद्र’ यांसारख्या नावाने चालणाऱ्या तमाशाच्या फडाकडे आकृष्ट होऊ लागला. तेव्हा या केंद्रांवरच र्निबध घालण्याची पाळी राज्यकर्त्यांवर आली, हा आपला ताजा इतिहास आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण