गणरायाच्या रुबाबात भर घालणारी ‘चिक मोत्याची माळ’ मागे पडली असून त्याऐवजी विविध धातु, त्यावर सोन्याचा मुलामा असलेल्या दागिन्यांची भुरळ गणेशभक्तांना पडली आहे. सोन्याचा मुलामा असलेली विविध आभुषणे तुलनेत कमी किंमतीत उपलब्ध होत असल्याने त्यांना विशेष मागणी आहे. चांदीच्या धातुतील सुकामेव्याचा नैवेद्य, पूजा साहित्य व आभुषणांचा एकत्रित संच असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
विविध पातळीवर सुरू असलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत बहुतांश गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रबोधनामुळे शाडू मातीच्या मूर्तीना जशी मागणी वाढली, तशीच इतर साहित्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले. धार्मिक कार्यात सोन्याला असणारे महत्व पाहता त्याचा भाव उत्सवात वधारला आहे. गणेशभक्तांची बदलती अभिरूची लक्षात घेता अस्सल सोन्याचा पारंपारिक गणपती, दगडुशेठ हलवाई आणि आता नाशिकच्या श्री सिध्दीविनायकाच्या गणेशमूर्ती बाजारात आहेत. या शिवाय ग्राहकांनी काही डिझाईन दिल्यास त्यांच्या मागणीनूसार हव्या त्या वजनात गणरायांची मूर्ती साकारली जात असल्याचे टकले ज्वेलर्सचे विजय चंद्रात्रे यांनी सांगितले. अस्सल सोन्याऐवजी चांदीच्या उपकरणांसह गणेश मूर्तीकडे ग्राहकांचा कल आहे. गणरायांबरोबर गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठेत चांदी तसेच सोन्याचे, सोन्याचा मुलामा दिलेले दागिने उपलब्ध आहेत.
यंदा चांदीचे गणपती आणि गौरीसाठी विविध आकारातील १५ हून अधिक मुकूटाचे प्रकार, याशिवाय कमळहार, चक्रीहार, २१ किंवा ११ मोदकांचा हार, ११ किंवा २१ मोदकांचा संच, सोन्याचा मुलामा असलेला मोदक एक हजारापासून उपलब्ध आहे. तसेच, दुर्वा, दुर्वाचा हार ११ किंवा २१ च्या जुडीप्रमाणे सोन्याचा मुलामा दिलेला हारासाठी १२०० ते १६०० रुपये मोजावे लागतात. चांदी व सोन्यातील गणरायाचा शेला, रामराज्य तोडे, उंदीर, परशु, जाणवे, सुपारी, विडय़ाचे पान, केवडय़ाचे पान, केळी, जास्वंद, कंठीमाळ असे विविध आभूषणे, पूजेची उपकरणे वजनाप्रमाणे उपलब्ध आहेत.
यंदा प्रथमच गणरायाला ‘सुकामेव्याचा नैवेद्य’ हा चांदीच्या धातुत तयार करण्यात आला आहे. ग्राहकांची या नैवद्याला विशेष मागणी आहे. पूजेच्या उपकरणात चौरंग, पूजेचा तांब्या, तबक, पंचपाळी आदी सामानही उपलब्ध आहे. सोन्याच्या भावात चढ-उतार असला तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे. दरम्यान, कुठलेही एक उपकरण, आभूषणे यापेक्षा कमी किंमतीत तसेच सवलतीच्या दरात आभुषणे किंवा पूजा साहित्याचा संपुर्ण संच ग्राहकाला उपलब्ध करून देत विक्रेत्यांनी ‘पॅकेज’ स्वरूपात अनेक पर्याय दिले आहेत. सोने, चांदीच्या दागिन्यानंतर मोत्याच्या कंठीहार, कंबरपट्टा, बाजूबंद आदी आभूषणांना ग्राहकांची पसंती आहे.