समाजात भावना, अस्मिता, श्रद्धा अशा गोष्टींचे वजन बुद्धी आणि तर्कनिष्ठा यांहून वाढू लागले की वैचारिक अराजकाला  प्रारंभ झालाच म्हणून समजा. या अराजकात या ना त्या प्रकारे पहिली शिकार ठरतात ती माध्यमे. काही माध्यमे भावना व अस्मितेच्या लोकानुनयी पुरात गटांगळ्या खातात. काही त्याविरोधात पोहण्याचे धाडस दाखवितात. ती गुदमरून जातात. यात अंतिमत: नुकसान सामाजिक शहाणपणाचेच होत असते. किरटा धर्मवाद, राष्ट्रवाद, जमातवाद यांना अशा परिस्थितीत उधाण येते आणि त्याविरोधात बोललेला साधा शब्दही सहन करण्याच्या मन:स्थितीत समाज राहत नाही. याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान. तेथील जीओ टीव्हीची मनोरंजन वाहिनी आणि एआरवाय न्यूज या दोन वाहिन्यांवर नुकतीच बंदी घालण्यात आली. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियंत्रण प्राधिकरण तेथील माध्यमांवर   नियंत्रण ठेवण्याचे काम करते. ही सरकारी संस्था. तिने जीओच्या मनोरंजन वाहिनीवर ३० दिवसांची, तर एआरवायवर १५ दिवसांची बंदी घातली असून या दोन्ही वाहिन्यांना प्रत्येकी १ कोटी     रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. याचे कारण तसे साधे आणि सोपे आहे. जीओ टीव्ही नेटवर्क या समूहाची भूमिका ही    सातत्याने उदारमतवादी राहिलेली आहे. सरकार, लष्कर, ‘आयएसआय’ आणि धर्मगुरू ही पाकिस्तानातील सत्ताकेंद्रे. त्यांचे वाभाडे काढताना जीओ न्यूजने कधीही मागेपुढे पाहिले नाही. अशा माध्यमाला मोकळे सोडणे सत्ताधीशांना परवडणारे नसते. काही महिन्यांपूर्वी या वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यामागे ‘आयएसआय’चे प्रमुख    जहीर-उल-इस्लाम यांचा हात असल्याचा आरोप मीर यांच्या बंधूने केला होता. त्याला प्रसिद्धी दिल्याबद्दल या वाहिनीवर कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणी वाहिनीला जाहीर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. आता याच समूहाच्या मनोरंजन वाहिनीवर अभिनेत्री वीणा मलिक संदर्भातील एका कार्यक्रमातून धर्माची बदनामी केल्याचा आरोप ठेवून तिचा परवाना महिनाभरासाठी रद्द करण्यात आला आहे. एआरवाय न्यूजची चूक त्या तुलनेत कमी. या वाहिनीने न्यायव्यवस्थेवर टीकारोप केले   होते. त्यामुळे तिची सुटका १५ दिवसांच्या बंदीवर झाली. ही झाली तत्कालीन कारणे. परंतु यावर समाजमाध्यमांतून उमटलेल्या पाकिस्तानी प्रतिक्रिया पाहिल्या की तेथील वैचारिक अराजकाचा पत्ता लागतो. पाकिस्तानातील मोठय़ा समाजगटाचा आज        जीओ न्यूजला विरोध आहे. ही वाहिनी राष्ट्रद्रोही (म्हणजे भारताच्या बाजूची!) असल्याचा त्यांचा दावा आहे. वस्तुत: ही वाहिनी काही भारतधार्जिणी नाही; परंतु जो आपली भाषा बोलत नाही,    जो आपल्यावर टीका करतो तो देव, देश आणि धर्म यांचा द्रोही असे मानले की मग बाकी काही समजून घेण्याची गरजही उरत नाही. जीओ न्यूज किंवा पाकिस्तानातील आंग्लभाषिक माध्यमांचा सूर हा बहुतांशी मवाळ असतो. अगदी  पंधरवडय़ापूर्वी भारत-पाक सीमेवरील चकमकींच्या वेळीही हे दिसले. तेथील ‘डॉन’ या इंग्रजी दैनिकाने सीमेच्या दोन्ही बाजूंना झालेल्या नुकसानीच्या बातम्या व छायाचित्रे प्रकाशित केली होती. हा उदारमतवाद स्थानिक भाषेतील माध्यमांत अभावानेच दिसतो. राजकीय अस्मितावादी आणि धार्मिक प्रतिगामी यांचा इंग्रजी माध्यमांवर अनेकदा रोष दिसून येतो, तो त्यांच्या बहुतांशी मध्यममार्गी दृष्टिकोनामुळेच. याचा अर्थ सर्व अन्य भाषिक माध्यमे वाहवत जाणारी असतात असे नव्हे. याचा अर्थ एवढाच की, जी वाहवत जात नाहीत त्यांना समाजाच्या संतापाचा सामना करावा लागतो. पाकिस्तानात आज तो जीओ टीव्ही आणि एआरवाय यांना करावा लागत आहे, एवढेच.