आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुकांवरही संशयच घेणारा इम्रान खान आणि व्यवस्थेच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली तिचे खच्चीकरण करू पाहणाऱ्या राजकीय संतांपैकी काद्री, यांचा बोलविता धनी लष्करच. भारताशी चर्चेस नवाझ शरीफ यांची तयारी, हे महत्त्वाचे कारण लष्कराने त्यांच्याविरुद्ध अप्रत्यक्ष आघाडी उघडण्यामागे आहे..  
पाकिस्तानचा विषय निघाला की आपणाकडे बऱ्याच जणांचे भान हरपते. इतके की, यातील अनेकांच्या दूरदृष्टीला पाकिस्तानातही भारताप्रमाणे लोकशाही असल्याचा साक्षात्कार होतो आणि तो देशही कसा शांततेच्या मार्गानेच निघाला असल्याचे हे विचारवंत आपणास सांगत असतात. परंतु या स्टुडिओविलसित विचारवंतांना वास्तवाचे भान नाही. ते किती नाही हे पाकिस्तानात जे काही सध्या सुरू आहे, त्यावरून कळू शकेल. गेले जवळपास दोन आठवडे पाकिस्तानात अनागोंदी असून पंतप्रधान नवाझ शरीफ यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश येण्याची शक्यता नाही. पंतप्रधान शरीफ हे पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुले बनत असून ते त्या देशातील लोकशाही कशी आणि किती कचकडय़ाची आहे, हेच दाखवणारे आहे. वरवर पाहता या सध्याच्या अनागोंदी नाटय़ात दोन खेळाडू प्राधान्याने दिसतात. एक म्हणजे ‘पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ’ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि कॅनडास्थित सूफी संत ताहिर उल काद्री. पंतप्रधान शरीफ यांच्या विरोधात या दोघांनी आघाडी उघडली असून तीमागे योगायोग नाही, असे म्हणता येणार नाही. या दोघांना उघडपणे सामील नसलेला परंतु अंतिमत: अत्यंत महत्त्वाचा असा आणखी एक घटक या मागे नि:संशय आहे. आणि तो म्हणजे पाकिस्तानात अत्यंत शक्तिमान असलेले लष्कर. त्या देशातील सद्य:स्थितीचे विश्लेषण करताना या तिघांच्या भूमिकेचा एकत्रितपणे आणि त्याच वेळी स्वतंत्रपणे विचार करावयास हवा. यांपैकी पहिल्याचे हितसंबंध राजकीय आहेत, दुसऱ्याचे धर्मराजकीय आणि तिसऱ्यास रस आहे तो संपूर्ण नियंत्रणात.
इम्रान खान हे पंतप्रधान शरीफ यांच्या विरोधातील लढय़ाचा चेहरा असले तरी ते या तिघांतील सर्वात हलके खेळाडू. क्रिकेटपटू म्हणून नावारूपास आलेले मदनबाण इम्रान यांच्या खेळास उतरण लागल्यावर त्यांच्या राजकीय इच्छांना धुमारे फुटले. देशात आमूलाग्र परिवर्तन करायची इच्छा बाळगणाऱ्या इम्रान यांनी १९९६ साली स्वतंत्रपणे तेहरिक ए इन्साफ या पक्षाची स्थापना केली. म्हणजे त्यांच्या पक्षास नुकतीच १८ वर्षे पूर्ण झाली. कायदेशीरदृष्टय़ा वयात आलेल्या या पक्षास राजकीय यश मिळाले ते गेल्या निवडणुकीत. इतके दिवस राजकारणातील मनोरंजनाची जबाबदारी सांभाळणारा हा पक्ष गेल्या वर्षीच्या, २०१३ सालच्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकांत पाकिस्तानी परलमेटमधला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. इतकेच काय तर खबर पख्तुनवा राज्यात या पक्षाची स्वतंत्रपणे सत्ताच आली. परंतु त्यामुळे या पक्षास स्वत:विषयी भलताच भ्रम झाला. आपल्याकडे आम आदमी पक्षाचा बेडूक जसा मध्यंतरी फुगला होता, तसेच या मदनबाण इम्रान यांच्या पक्षाचे झाले. आपण खरे तर राष्ट्रीय पातळीवरच विजयी ठरलो असतो, परंतु नवाझ शरीफ यांच्या पक्षाने लांडय़ालबाडय़ा केल्यामुळे केंद्रीय सरकार स्थापन करण्याची आपली संधी हुकली असे त्यांना वाटू लागले. वास्तविक हा शुद्ध कांगावा आहे. पाकिस्तानच्या गेल्या वर्षीच्या निवडणुका या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली लढल्या गेल्या आणि इम्रान खान यांना वाटते त्याप्रमाणे तितके गैरव्यवहार झाल्याचे कोणालाही आढळले नाही. तेव्हा इम्रान खान जे काही म्हणतात तो केवळ भ्रम आहे. तो जोपासण्यात इम्रान खान यांचा राजकीय स्वार्थ दडलेला आहे. त्याचमुळे त्यांनी पंतप्रधान शरीफ हटाव मोहीम सुरू केली आणि पाकिस्तानी स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्टपासून राष्ट्रीय आंदोलन छेडले. त्यांना साथ मिळाली ती संत म्हणवून घेणाऱ्या ताहीर काद्री यांची. अलीकडे तिसऱ्या जगातील अशक्त व्यवस्थांमधून हे आणि अशा राजकीय संतांचे पेवच फुटलेले दिसते. संत म्हणवून घ्यायचे आणि राजकारणात लुडबुड करायची ही यांची खासियत. आपणास राजकारणात वा सत्ताकारणात रस नाही असे हे सूफी संत म्हणतात. त्यांना हवी आहे ती स्वच्छ राजवट. परंतु म्हणजे काय, हे त्यांना माहीत नाही. परंतु निष्कलंक व्यक्तींच्या हातीच पाकिस्तानची सूत्रे असावीत असा त्यांचा आग्रह आहे. तो वरकरणी रास्त वाटला तरी ही त्यांना हवीत ती निष्कलंक माणसे आणायची कोठून? आणि ती केवळ हा बोगस संत म्हणतो म्हणून निष्कलंक मानावयाची काय? आणि एखादा वा एखादी केवळ निष्कलंक आहे, म्हणून राज्य करण्यास योग्य ठरतो की काय? असे अनेक प्रश्न असून त्याचे कोणतेच उत्तर देण्याची या काद्रीबाबांची तयारी नाही. तरीही शरीफ यांना हटवायलाच हवे असा मात्र त्यांचा आग्रह आहे. या काद्रीबाबांचा अहं इतका मोठा की शरीफ यांना सत्ता सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत त्यांनी दिली असून त्या काळात ते पदावरून उतरले नाहीत तर देश पेटवून देण्याचा त्यांचा मानस आहे. ते तसे करू शकतील यात तिळमात्रही शंका नाही. ज्या देशांची संस्थात्मक उभारणी कच्ची आहे त्या देशांत अशा व्यवस्थाबाह्य़ बोगस बुवांना महत्त्व येते. आपल्याकडेही असे अधेमधे होतच असते. व्यवस्थाशुद्धीकरणाचा दावा जरी अशा मंडळींकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडून व्यवस्थेचे खच्चीकरणच होत असते. सुदैवाने आपल्याकडे लोकशाही व्यवस्था मजबूत असल्यामुळे संतमहंतांच्या माध्यमवादळांचा फक्त धुरळा उडतो. काही पडझड होत नाही.
पाकिस्तानात मात्र तसे नाही. त्या देशात अजूनही लष्करच सर्वशक्तिमान असून मदनबाण इम्रान आणि हे काद्रीबाबा या दोघांचाही बोलविता धनी लष्करच आहे. गेल्याच आठवडय़ात लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी विद्यमान संघर्षांत मध्यस्थी करून याची चुणूक दाखवून दिली. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा पूर्णपणे लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले. त्या निवडणुकांत लष्कराला फारशी भूमिका नव्हती. १९९९ साली ज्या लष्कराच्या हातून शरीफ यांना सत्ता गमवावी लागली त्याच लष्कराच्या नाकावर टिच्चून ते पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ झाले. परंतु या प्रक्रियेत निष्प्रभ होणे मान्य नसल्यामुळे लष्कराने शरीफ यांच्या अडचणी वाढवण्यास सुरुवात केली. सध्याच्या व्यवस्थेवर म्हणजेच पंतप्रधान शरीफ यांच्यावर लष्कर नाराज आहे. त्याची प्रमुख कारणे तीन. एक म्हणजे शरीफ यांनी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांच्या विरोधात आघाडी उघडली आणि त्यांना तुरुंगात डांबले. याच जनरल मुशर्रफ यांनी शरीफ यांच्या विरोधात बंड करून सत्ता हस्तगत केली होती. तेव्हा तो हिशेब शरीफ यांना /चुकता करायचा आहेच. खेरीज, दुसरे कारण म्हणजे शरीफ यांनी भारताशी सौहार्दाचे संबंध राहावेत यासाठी प्रयत्न सुरू केले. भारतविरोध हे पाकिस्तानी लष्कराच्या अस्तित्वाचे कारण असून तोच मावळला तर आपण करावयाचे काय, हा प्रश्न लष्करास पडणे साहजिकच आहे. तेव्हा शरीफ यांचे हे मवाळ धोरण लष्करास पसंत नाही. याच्या जोडीला तिसरे कारण म्हणजे अफगाणिस्तान. पाकिस्तानच्या सीमेस लागून असलेल्या अफगाणिस्तान आणि परिसरावर आपलेच नियंत्रण असावे असा पाक लष्कराचा आग्रह असून त्याचमुळे या परिसरात लष्कराकडून अनेक उद्योग केले जातात. अमेरिकेने या परिसरातून माघार घेण्यास सुरुवात केल्यापासून पाक लष्कराच्या या परिसरातील उचापतींत वाढ झाली असून पंतप्रधान शरीफ यांना ते मंजूर नाही. घरचे झाले थोडे.. अशी अवस्था असताना पाकिस्तानने आपल्या भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही आघाडय़ांवर शांतता राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा असे शरीफ यांचे मत आहे. हे त्यांचे अनुभवातून आलेले शहाणपण लष्करास मंजूर नाही.
त्याचमुळे शरीफ यांच्या विरोधात मिळेल त्या मार्गाने अस्थिरता तयार करून त्यांची राजवट खिळखिळी करण्याचे उद्योग लष्कराकडून सुरू आहेत. तेव्हा अंतिमत: याची परिणती लष्कराने सत्ता ताब्यात घेण्यात झाली तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मदनबाण इम्रान वा काद्रीबाबा ही केवळ प्यादी आहेत. लष्कराच्या हातातील. अशा तऱ्हेने पाकिस्तान हा प्यादीग्रस्त झाला असून अशा वेळी या प्याद्यांना जमेल त्या मार्गाने बळ देणे गरजेचे आहे. या पाश्र्वभूमीवर या प्यादीग्रस्त सरकारशी चर्चा न करण्याचा आपला निर्णय अयोग्य ठरतो. त्याने केवळ पाक लष्कराचे समाधान झाले. आपण ते देण्याची गरज नव्हती.