पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील शिक्षकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना वर्गातही बंदूक घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पेशावरमधील शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा वाढविण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे.
प्रत्येक शिक्षकाने बंदूक घेऊन वर्गात जाणे बंधनकारक नाही, मात्र ज्यांना शाळेत शस्त्रे घेऊन जाण्याची इच्छा आहे त्यांना परवाने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या प्रांताचे शिक्षणमंत्री आतिफ खान यांनी सांगितले.
सदर प्रांताचे माहितीमंत्री मुश्ताक घनी यांनी याला दुजोरा दिला आहे. सदर प्रांतातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांना पोलीस संरक्षण देणे अशक्य असल्याचे घनी म्हणाले. या परिसरात जवळपास ३५ हजार शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे असून त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांची संख्या अपुरी आहे आणि त्यामुळेच शिक्षकांना शस्त्रे देण्याची परवानगी देण्यात आली आहे.