‘मी  लग्न केलेले नाही, त्यामुळे माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी नाही. पुढच्या पिढय़ांसाठी मालमत्ता मागे ठेवण्याचे मला कारण नाही. तुम्ही तमाम जनताच माझे कुटुंबीय आहात आणि तुम्हा सर्वाना आनंदी ठेवणे हेच माझ्या राजकारणाचे ध्येय आहे. निवडून आल्यावर मी एखादी आई जसा आपल्या कुटुंबाचा सांभाळ करते तसा मी देशाचा कारभार करीन’ असे सांगत पार्क ग्येन-हाई या ६० वर्षांच्या महिलेने दक्षिण कोरियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतली अन् तिच्या देशबांधवांनी भरभरून प्रतिसाद देत तिला द. कोरियाची पहिली महिला अध्यक्ष म्हणून निवडून दिले. देशातील आर्थिक असमतोल, शेजारील आक्रमक उत्तर कोरियाचा लष्करी धोका याबाबत धोरणात आमूलाग्र बदल करण्याचे आश्वासन एकीकडे विरोधी उमेदवार मून जै-इन यांनी दिलेले असतानाही मतदारांनी पार्कबाईंच्या मातृत्वशाली नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. दक्षिण कोरियाचे वादग्रस्त माजी हुकूमशहा पार्क चुंग-ही यांची कन्या असलेल्या पार्क ग्येन-हाई यांना वडिलांचा अत्याचारी इतिहास अडसर ठरू शकला नाही याचे कारण त्यांनी तत्त्वे व मूल्यांबाबत कणखर अशी स्वत:ची प्रतिम करून दिली. अभियांत्रिकी व साहित्याची पदवी घेतलेली असतानाच त्यांना घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाले. पार्क चुंग-ही यांनी १९६१ ते १९७९ असा प्रदीर्घ काळ द. कोरियावर राज्य केले. १९७९ मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर पार्क ग्येन-हाई राजकारणात सक्रिय झाल्या. १९९८ मध्ये प्रथम व नंतर सलग पाच वेळा नॅशनल असेंब्लीत निवडून आल्या. देशातील पुरुषसत्ताक राजकारण मोडून काढण्याच्या प्रयत्नांत पार्क ग्येन-हाई यांनी कणखर भूमिका घेतली. ऐन निवडणुकीच्या काळात, वडिलांनी केलेल्या अत्याचारांबाबत जाहीरपणे माफी मागण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. मार्गारेट थॅचर आणि राणी एलिझाबेथ यांना आदर्श मानणाऱ्या पार्क ग्येन-हाई यांच्यासमोर आता द. कोरियाच्या अर्थव्यवस्थेला लोकशाही चेहरा देतानाच बडय़ा उद्योग घराण्यांना काबूत ठेवण्याचे आव्हान आहे. उत्तर कोरियाच्या लष्करी आगळिकीला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांना सज्ज व्हावे लागणार आहे. वडिलांच्या कारकीर्दीत देशात पडलेली उभी फूट सांधण्यासाठी त्यांना आपल्या प्रेमळ प्रतिमेचा आधार आहे.