गेल्या काही वर्षांत मनोरंजनही ‘ग्लोकाळलंय’.. वाढत्या शहरीकरणाला जागतिकीकरणाची साथ मिळाल्याने अमेरिकी सिनेमाइतकीच लोकप्रियता तिथल्या चित्रवाणी मालिकांनाही जगात अन्यत्र मिळू शकते. या अमेरिकी मालिकांना आजच्याइतकी जगप्रियता नव्हती, त्या काळात छोटय़ा पडद्याच्या मार्गाने संयत पण कणखर यश मिळविलेला अमेरिकी अभिनेता जेम्स गार्नर ‘टॉक ऑफ द टाऊन’ सेलेब्रिटी बनला होता. अमेरिकेत महायुद्धोत्तर काळापासून व्यक्तिवादाचा जो अतिविस्तार झाला, त्याचे काही दशकांनंतर आलेले फळ म्हणजे लग्नसंस्थेचे विघटन.. ही सर्वात मोठी सामाजिक घुसळण होत असतानाच्या काळात, घराघरांत पाय पसरू लागलेल्या टीव्ही नामक खोक्याचा प्रभाव सर्वाधिक होता. फ्रेंच न्यू-वेव्ह सिनेमाने पारंपरिक हॉलीवूडचा सुवर्णअध्याय झाकोळून टाकायला सुरुवात केली होती, परंतु याच काळात जेम्स गार्नर यांची ‘मॅव्हरिक’ ही मालिका अमेरिकी मनोरंजनोत्सुकांचा स्वाभिमान जपण्याचे कार्य करीत होती.
बेफिकीर, टोकाचा व्यक्तिवादी, जुगारी मॅव्हरिकची व्यक्तिरेखा तत्कालीन अमेरिकी समाजासमोर आरसा दाखविणारी असल्याने गाजत होती. एका मित्रासाठी नाटकामध्ये मदत करायला उभ्या राहिलेल्या गार्नर यांनी अभिनयातील बारकावे लक्षात घेतले आणि छोटुकल्या भूमिकांपासून ओळख गिरवायला सुरुवात केली. वॉर्नर्स ब्रदर्सने या कलाकाराला अभिनयाची ऊर्जा पुरविली. त्या बळावर गार्नर यांनी उभी केलेली ब्रेट मॅव्हरिक व्यक्तिरेखा सर्व घरांतली व्यक्ती बनून गेली. मोठय़ा पडद्यावरील कलाकारांइतकीच प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा छोटय़ा पडद्यावरील कलाकारांच्या वाटय़ाला आणणारे गार्नर हे पहिले टीव्ही सेलेब्रिटी होते.
‘द ग्रेट एस्केप’, ‘अमेरिकनायझेशन ऑफ एमिली’, ‘मूव्ह ओव्हर, डार्लिग’ ते अलीकडच्या ‘नोटबुक’पर्यंतच्या ब्लॉकबस्टरी हॉलीवुडी चित्रपटांमधील भूमिका त्यांच्या यशालेखातील सर्वपरिचित बाबी असल्या, तरी त्यांचे कर्तृत्वक्षेत्र छोटा पडदा होते. ‘रॉकफर्ड फाइल्स’ या सलग सहा वर्षे गाजलेल्या डिटेक्टिव्ह मालिकेमुळे ते पुन्हा चिरंतन चर्चेत राहिले. हॉलीवूडच्या दिग्गजांपासून नवख्यांपर्यंत सर्व दिग्दर्शक-अभिनेता-अभिनेत्यांच्या पंगतीमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.
शंभरेक चित्रपट, काही शेकडय़ांच्या घरात टीव्ही मालिका आणि चित्रपट यांतून गार्नर यांच्या अभिनयाचा सूर्य कायम तळपत राहिला. आपल्या कामातून अखंड प्रेरणास्रोत पुरविणाऱ्या या अभिनेत्याचे निधन अतिगुणात्मकतेमुळे प्रचंड स्पर्धेद्वारे कलाकाराला समोर आणणाऱ्या आजच्या अमेरिकेतल्या छोटय़ा आणि मोठय़ा पडद्याला म्हणूनच दु:खद राहील.