उच्च न्यायालयीन वर्तुळात तब्बल पाच दशके कार्यरत असलेल्या मोजक्याच वकिलांपैकी अधिक शिरोडकर हे एक व्यक्तिमत्त्व. अखेपर्यंत कार्यरत राहिलेले, विलक्षण तल्लख, हजरजबाबी, युक्तिवादात नर्मविनोदाची पेरणी करीत आपले मुद्दे न्यायाधीशांच्या मनावर बिंबविणारे.. शिरोडकरांची अशी अनेक वैशिष्टय़े सांगता येतील. फौजदारी कायद्यात निष्णात असलेल्या शिरोडकरांनी अनेक गुन्ह्य़ांमधील आरोपींची बाजू मांडली, महिलांवर अत्याचार किंवा बलात्कार करणाऱ्याचा बचाव त्यांनी कधीही केला नाही. सामाजिक भान ठेवून आयुष्यात काहीतरी पथ्य पाळले पाहिजे. आपण चांगले नागरिक आणि व्यक्ती या नात्याने समाजात वावरले पाहिजे, निव्वळ पैशांना महत्त्व न देता स्वत:ला काहीतरी शिस्त असली पाहिजे, अशी त्यांची यामागची भूमिका होती. शिरोडकर पूर्ण अभ्यास व तयारी करूनच न्यायालयात युक्तिवाद करीत. त्यांची शैली व विनोद करीत दिलेले अनेक दाखले, यातून तरुण वकिलांनाही बरेच काही शिकता येत असे. शिरोडकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक विश्वासू सहकारी होते. राजकारणात बऱ्याचदा वादळ निर्माण केलेल्या बाळासाहेबांवर अनेक फौजदारी स्वरूपाचे खटलेही दाखल झाले. त्या वेळी शिरोडकरांनीच शिवसेनाप्रमुखांची न्यायालयीन बाजू भक्कमपणे सांभाळली. शिवसेनेने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले. दांडगा अभ्यास, कोणताही विषय सहजपणे आत्मसात करण्याचे कौशल्य यामुळे त्यांनी राज्यसभेत चांगले काम केले. ते राज्यसभेच्या तालिकेवरही होते. बाळासाहेबांनी मृत्युपत्र केले, त्यावर अ‍ॅड. शिरोडकरांची स्वाक्षरी होती. न्यायालयासारख्या रूक्ष वातावरणात काम करताना आणि कायद्याचा कीस काढण्याचे काम करीत असताना शिरोडकर हे निसर्गामध्ये रमत असत. या दोन्हींचा मेळ फारच कमी व्यक्तिमत्त्वांमध्ये आढळून येतो. वन्यजीव छायाचित्रण (वाइल्ड लाइफ फोटोग्राफी) हा  छंद त्यांनी अखेपर्यंत जपला. वन्यजीव छायाचित्रणासाठी फारच संयम बाळगावा लागतो. जनावर आपल्या छायाचित्रणाच्या टप्प्यात येईपर्यंत तासन्तास वाट पाहावी लागते. वयपरत्वे संयम कमी होत जातो, पण शिरोडकरांच्या बाबतीत तसे काही झाले नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये त्यांनी भरपूर छायाचित्रण केले आणि छायाचित्रांची अनेक प्रदर्शने भरविली. त्यासाठी ते आफ्रिकेतील जंगलांमध्येही मनमुरादपणे फिरले. वन्यप्राणी आणि जंगलांमध्ये रमणारे शिरोडकर, कायद्याचे शिक्षण घेत असताना नाटकांतही काम करत. त्यांचे वाचन दांडगे होते.. मराठी कवितांपासून सॉक्रेटिसपर्यंत सर्व विषयांवर. याची झलक त्यांच्या युक्तिवादांमध्ये कायम दिसून येत असे. हे बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्त्व शनिवारी कॅमेऱ्याच्या क्लिकसारखेच अचानक काळाच्या पडद्याआड गेले.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हेच आजच्या भारतीय लोकशाहीचे वास्तव
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?